कहाणी आगंतूक वास्तुपुरुषाची!

संतुलित विकासात प्राधान्य कशाला याबाबत गोंधळ दिसतो आहे.

ulhas-rane

डोंगरातल्या गुहांपासून ते महानगरातल्या उत्तुंग रहिवासकुलापर्यंत झालेली घरकुलांची व मानवी समाजाची उत्क्रांती.. त्याबरोबरच उभे ठाकलेले पर्यावरणाचे प्रश्न या विषयांवर संतुलित विकासाची सर्वागिण बाजूंनी, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वेगळ्या ढंगाने चर्चा करणारे सदर..
ऐका सुजनहो, आटपाट नगरीची- ‘सुंदरवाडी’ परिसराची कहाणी. सह्य़ाद्री पर्वताच्या पायथ्याशीचा, तळकोकणचा वेंगुर्ला, मालवणपर्यंत अगदी समुद्राला जाऊन भिडलेला परशुराम निर्मित हिरवागार परिसर. तिथली परिसर विविधता- टेकडय़ा, उथळ दऱ्या, नद्या, ओढे, धबधबे, खाडय़ा, जांभ्या दगडाचे काप/ सडे, पठारं, सुपीक शेतजमिनी, खडकाळ आणि वालुकामय समुद्रकिनारे. त्यातून फुलणारी जैवविविधता- मिश्र- आद्र्र- पानगळीची जंगलं; सडे-पठारावरील झुडपं व पावसाळी वनस्पती; आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागा; खाडीकिनारची तिवरांची जंगलं आणि या सर्वातून विहरणारे कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर आणि वन्य प्राणी. इथे आहेत परशुरामाला पडलेली सुंदर स्वप्नं- या हिरवाईत लपलेल्या देवराया.
सुंदरवाडीचा नरेंद्र डोंगर ओलांडून पश्चिमेकडे वळलं की लागतो वाघेरीचा डोंगर गच्च हिरवाईने घेरलेला. ही आहे वाघाची देवराई आणि इथला ‘वाघोबा’ आहे या परिसराचा तारणहार. त्यालाच लागून पूर्वेकडे आहे क्षेत्रपाळेश्वर देवराई तर दक्षिणेला आहे उपराळकर देवराई. ‘क्षेत्रपाळेश्वर’ आहे थोरला- गावचा राखणदार, तर उपराळकर आहे धाकला, परिसरातल्या शेतकऱ्यांचा, गोसाव्यांचा, किरीस्तावांचा देवचार- रक्षणकर्ता.
ही कहाणी आहे ‘उपराळकर’ देवचाराची आणि या उपराळात आगंतुक शिरलेल्या ‘वास्तुपुरुषा’ची.
पौष पौर्णिमेची पहाट. कडाक्याची थंडी. गावावर धुक्याचं पांघरूण, तर शेतातील हिरवाईवर दवबिंदूंची पखरण. मधूनच पिंगळ्याचा हाकारा शांतताभंग करत होता, तर शिंजीरांचा थवा ‘काकड आरती’ करत फिरत होता. शेवटी बुलबुलांच्या मधुर भूपाळीला भुलून रविकिरणांची आभा पूर्वेकडच्या नभांगणात पसरली. अशा शुभमुहूर्तावर वास्तुपुरुषाने दाट धुक्यातूनच आपली वाटचाल नदीकिनाऱ्यावरील शेतांतून गावाकडे संथ गतीने सुरू केली.
नदीवरील छोटे बंधारे, त्या साठलेल्या पाण्यावर पावसानंतरही शेतात फुलवलेली वायंगणं आणि पहाटेपासूनच शेतात काम करणाऱ्या उत्साही शेतकऱ्यांना पाहून वास्तुपुरुष खुशीत आला. अध्र्या चड्डीतले किडकिडीत पुरुष पाटाने पाणी देत होते, शेतात युरिया शिंपडत होते, तर एक तरुण शेतकरीण कासोटा मारून पायपंपाने कीटकनाशकाची फवारणी करत होती. बाजूलाच त्यांच्या दोन मुली पंजाबी वेशात मोकळेपणाने मस्त खेळत होत्या, अधूनमधून आई-वडिलांना मदत करत होत्या.
शेतं ओलांडून तो आता विखुरलेल्या वाडय़ांतून, नागमोडी पाणंदीतून बाजारपेठेच्या दिशेने निघाला. कुटुरग्याचं ‘कुटुर्र, कुटुर्र’ आणि हळद्याचा ‘कुकारा’ कानावर पडताच त्याला मगासपासून चुकल्या-चुकल्यासारखं का वाटतं होतं ते लक्षात आलं. सूर्योदय होऊन गेला तरी सूर्याचं स्वागत करणारी कोंबडय़ाची ललकारी अजून कानावर आली नव्हती. गाई- गुरांच्या घुंगुरांची किणकिण, गुराख्यांचे हाकारे अणि बासरीची सुरावटही गायब होती. काहीसा हिरमोड झालाच. बाजारपेठेत काहीशी हलचल सुरू झाली होती. पहिली बस नुकतीच वेंगुल्र्याकडे गेली होती तर एक-दोन रिक्षा प्रवाशांना घेऊन सावंतवाडी रेल्वे स्थानकाकडे ‘घरघरत’ निघाले होते. दोन दिवसांपूर्वीच्या साप्ताहिक बाजाराचा उरलेला कचरा आणि प्लास्टिक पिशव्या, बाटल्या इकडे-तिकडे अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसत होत्या. बस स्थानकाजवळचं चहापाण्याचं दुकान काहीसं कार्यरत दिसत होतं, गॅस शेगडीवर एका बाजूला चहा रटरटत होता तर दुसऱ्या बाजूला कांदा भजी रसरसत होती. वास्तुपुरुषाची नजर बाहेरच्या वळचणीकडे गेली. पूर्वीच्या ‘इतरां’साठी ठेवलेल्या करवंटय़ा दिसत नव्हत्या. ताजी ‘बटर- बिस्किटा’ विकणारी किरीस्तावाची बेकरी गायब होती. जवळच बीअर बार मात्र सकाळीच उघडलेला होता. बाजूलाच दूध गाडी आली होती आणि काही शेतकरी दूध मोजून देत होते- बेळगाव, कोल्हापूरच्या डेअरीसाठी. उरलंसुरलं दूध गावकरी नेत होते. चुकल्या-माकलेल्यांसाठी बाजूच्याच दुकानात दूध पिशव्याही होत्याच. गाव बरंच सुधारलेलं दिसतंय!
वास्तुपुरुष आता गाव पाहणीला निघाला. विखुरलेल्या वाडय़ा, त्यांमधून टेंबावरच्या आमराया- हापूस, पायरी, माणकूर, फर्नार इत्यादींची आठवण देणाऱ्या; सडय़ावरच्या काजूच्या घनदाट जाळ्या; अधूनमधून फणस, रातांबे, करवंद आणि इतर वन्य वनस्पती. काजू मोहरला होता आणि मंद गंध परिसरात मुरला होता. एका आमराईत काही पिवळ्या-निळ्या रंगांची रिकामी पाकिटं पडलेली दिसली. नुकतीच फवारणी झाल्याच्या खुणा होत्या त्या. मधल्याच एका सडय़ाच्या उतारावर मोठय़ा जागेत जंगल सफाई केलेली दिसत होती, शिवाय खोलवर सपाटीकरण केलेलंही दिसत होतं. बुलडोझर पुढील आज्ञेच्या अपेक्षेत बाजूला उभे होते. तारेच्या कुंपणाआत कोणता तरी मोठा प्रकल्प हिरवाईच्या मध्यावर येऊ घातलेला दिसत होता. गावात विकासाची चिन्हं दिसायला लागली होती!
वरच्या वाडीतून जाता जाता कौलारू घरांशी स्पर्धा करणारी ‘मुंबई’ छापाची स्लॅबची रंगीबेरंगी घरं दिसायला लागली. घराघरात शोष खड्डय़ांचे शौचालय आले होते. एका घराच्या बाजूची विहीर त्या शौचालयाकडे तडफडत्या नजरेने पाहात होती. आता विहिरींवर गजबज नव्हती. घरं दुपारी नळाने पाणी येण्याची वाट बघत होती. स्त्रिया काहीशा समाधानात दिसत होत्या. अचानक दुरून समूह गायनाचा आवाज आला, तोही इंग्रजीत. वास्तुपुरुषाचे पाय त्या दिशेला वळले. एका आधुनिक इमारतीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पटांगणात पाश्चात्त्य गणवेशात मुलं-मुली ‘साऊंड ऑफ म्युझिक’मधील गाणं गात होती. वास्तुपुरुषाची छाती भरून आली, पण काही वेळेपुरतीच! तो खालच्या वाडीत वळला आणि सरकारी शाळेची कौलारू इमारत समोर आली. तिरंग्याने आणि देशप्रेमाने भरलेल्या सुभाषितांनी रंगलेली. पण आज शाळेला सुट्टी असावी. अगदी सामसूम दिसत होती. समोरच्या खिडकीतून तो आत डोकावला. एक शिक्षिका दोन-तीन मुलांचा अभ्यास घेत होती. सरकारी मराठी शाळा ओस पडली होती. हताश वास्तुपुरुष रस्त्याकडे आला आणि फटफटीवरील एक चलाख तरुण त्याला सामोरा आला. ‘‘कुठे निघालात? चला सोडतो. पाच रुपये किलोमीटरला. माझी स्वत:ची ‘टॅक्सी’ आहे ही.’’ वास्तुपुरुषाने हसत हसत नकार दिला, पण तरुणाची चौकशी केली, ‘‘अरे तू या गावचाच ना? शेती-वाडी नाही कसत? ही फटफटी चालवून काय मिळणार तुला?’’ तरुणाने छद्मी हास्य करत फटफटीला ‘किक’ मारली, ‘‘शिरा पडो! मला वेड नाही लागलंय मातीत मरायला. चला येतो.’’ गाव नक्कीच ‘स्मार्ट’ बनायला लागलंय!
वास्तुपुरुषाने आपला मोर्चा वाघेरी डोंगराच्या दिशेने वळवला. आता सूर्य वर चढला होता, ऊन तापायला लागलं होतं. काजींना आता तारांची कुंपणं पडली होती. ती ओलांडत, हलका चढ चढताना मधली वाडी लागली. अगदी शांत वसली होती. एका कौलारू घराच्या पडवीत छोटेखानी दुकान थाटलेलं होतं, पण दुकानात कोणीच नव्हतं. वास्तुपुरुषाने घराच्या दारातून हाक मारली, ‘‘कोणी आहे का? थोडं पाणी मिळेल का प्यायला?’’ परकर पोलक्यातली एक चुणचुणीत मुलगी बाहेर आली. दुकानातील फ्रिजमधून एक पाण्याची बाटली तिने बाहेर काढली आणि ती पुढे करून म्हणाली, ‘‘२० रुपये द्या.’’ बाटली उघडून थंडगार पाणी पिताना बरं वाटलं, पण पूर्वी कोणत्याही घरात प्रेमाने मिळणाऱ्या तांब्यातल्या पाण्याबरोबरच्या गुळाच्या खडय़ाचीही आठवण अस्वस्थ करून गेली. भूकही लागली होती. त्याने विचारलं, ‘‘काही खायला मिळेल का? उसळ -वडे, पेज, मूगाचे लाडू? काहीही चालेल.’’ परकरी मुलगी दुकानातून काहीतरी घेऊन पटकन घरात गेली आणि ‘दोन’ मिनिटात प्लास्टिकच्या ताटलीत प्लास्टिकचाच डबा व चमचा घेऊन बाहेर आली. मसाला ‘कप नुडल’वर ‘ताव’ मारून, हिशेब चुकता करून वास्तुपुरुषाने वाघेरीकडे नजर टाकली. हिरवाईत लपलेला भला मोठा खडक आणि बाजूने हळूच डोकावणारा कळस खुणावत होता.
तापलेली पाऊलवाट काही क्षणातच थंडगार हिरवाईत शिरली आणि सर्व वातावरणच बदललं. कारवीच्या गंधाने त्याला हळवं केलं, तर पक्ष्यांच्या ‘‘कुजनाने मन प्रसन्न केलं. मध्येच लागलेल्या एका आम्रवृक्षाच्या गर्द छायेत बसून परिसर न्याहाळता न्याहाळता त्याला डुलकी लागलीच. आता ग्रामविकासाची स्वप्नं मन:पटलावर तरळायला लगली.
आपला नदी परिसरही ‘साबरमती प्रकल्पा’सारखा दिसायला लागला. नदीकाठी एक आलिशान विश्रामधामही आला होता- तरण तलावासह. गावातली मुलं-मुली तिथे कडक गणवेशात मिरवत काम करत होती. गावातली घरं पक्की, दुमजली- तिमजली झाली होती. गावात घरोघरी ‘आंतर्जाला’चा प्रवेश झाला होता. गावातले रस्ते रुंद झाले होते, त्यांवरून फटफटय़ा, खासगी गाडय़ा फिरत होत्या. रस्त्यांवर दिव्यांची रोषणाई होती, झगागणाऱ्या जाहिराती होत्या. रस्त्याने चालताना तरुण मुलं-मुली भ्रमणध्वनी संवादात गुंग होती. बाजारपेठेला शहरी रूपडं मिळालं होतं. कोणताही पदार्थ सहज उपलब्ध होता. बाजारातली भाषा ‘हिंग्रजी’ झाली होती. एका नवीन चित्रपटगृहावर हिंदी-इंग्रजी चित्रपटांचे जाहिरात फलक झळकत होते. इंग्रजी माध्यमाची खासगी दुमजली शाळा आता अधिक पसरली होती. बाजूलाच चार मजली महाविद्यालय आलं होतं. दुरून येणाऱ्या मोठय़ा जलवाहिनीतून गावाला पाणीपुरवठा होत होता. क्षेत्रपाळेश्वर मंदिर संगमरवरी, बहुरंगी झालं होतं, उत्तुंग कळस झगमगत होते. ग्रामपंचायतीचं कार्यालय चकाचक दिसत होतं. पुढील काचेरी भागातून आतले संगणक, सुरक्षा कॅमेरे, कर्मचाऱ्यांची धावपळ दिसत होती. शुभ्र वेशातील, गॉगलधारी तरुण, धिप्पाड राजकारणीही रुबाबात वावरताना दिसत होते. त्या कार्यालयाच्या गच्चीवरून गावाचं विहंगम दृश्य पाहात असताना अचानक समोर वणवा लागलेला दिसला. वातावरण धुराने भरून गेलं, गावकरी गुदमरून सैरावैरा पळायला लागले.
वास्तुपुरुषाचाही जीव घुसमटला, त्याला जोरदार ठसका लागला आणि धडपडून जाग आली. स्वप्न आणि सत्य यांमधली रेषा धूसर झाल्यासारखी वाटायला लागली. सभोवती संधिप्रकाश पसरला होता. सूर्य मावळतीला वाघेरी डोंगराआड गेला होता. आता परतायला हवं, अंधाराच्या आत. तो उठला पण परतीची पाऊलवाटच सापडेना. मग अंदाजाने दक्षिणेकडे वाटचाल सुरू केली. हिरवाई आता गर्द अंधारत होती. मधूनच अनेक पाऊलवाटा दिसायच्या, कोडय़ात टाकायच्या. बहुधा जंगल- चकवा लागला होता. एका बांबूच्या बेटाआडून पूर्व क्षितिजावर पौर्णिमेचा, लालिमा ल्यालेला चंद्र उगवताना दिसला आणि वास्तुपुरुष सुखावला. पश्चिमेकडून मंद, शीलत झुळकांना सुरुवात झाली होती. वास्तुपुरुषाच्या चालीला वेग आला, पण वाट जग्ांलातच शिरत होती. रातव्यांचं ‘चापुक चापुक’ अंगाई गीत सुरू झालं होतं आणि त्या तालावर आता पावलं झपाटय़ाने पडत होती. अचानक दुरून येणाऱ्या टिटव्यांच्या चित्काराने त्याला दचकवलं. त्या दिशेने पाहात पुढे पाऊल टाकलं तर कसल्यातरी फाशात पाय अडकला आणि भूमीवर लोटांगणच घातलं गेलं. भानावर येताच त्याला कळलं की एका मोठय़ा वेलीत पाय अडकला होता अणि आता कपाळमोक्ष थोडक्यात चुकला होता. बाजूलाच उतारावर पुरलेली एक शिळा त्याच्याकडे रोखून बघत होती. तो धडपडत उठला तर समोर दिसला एक चौथरा आणि त्यावर मिणमिणणारी पणती. त्या ज्योतीतून आकाशात जाणाऱ्या धूम्रवलयांतून एक वेगळाच ‘निराकार आकार’ तयार होत होता आणि त्याच दिशेकडून येणारा एक पहाडी आवाज वास्तुपुरुषाच्या कानात घुमला, ‘‘सुस्वागतम्! पौर्णिमेच्या या चांदराती माझ्या उपराळात वास्तुपुरुषाचं सहर्ष स्वागत. थकलेला दिसतोस. इथेच बाजूला जिवंत झरा आहे, अमृतासारखा. जा, ताजातवाना हो. आता संपूर्ण रात्र पडली आहे आपल्याला गप्पा मारायला. काळजी मुळीच करू नको. मी आहे या परिसराचा राखणदार- देवचार. तुझा आजचा आमच्या गावचा अनुभव आणि तुझे विकासाचे विचार ऐकायला खूप उत्सुक आहे मी. शेवटी वास्तुपुरुषच तू. पूर्वापारपासून मानवाला विकासाची दिशा तूच दाखवत आला आहेस. चल ऊठ.’’
त्या शेवटच्या वाक्याने वास्तुपुरुषाचा अभिमान जागृत झाला. तो उठला, आजूबाजूला बघत झऱ्याकडे वळला. चेहऱ्यावर पाण्याचे दोन-तीन हबके मारताच सर्व शीण पळाला, ओंजळीने काही घुटके घेताच तरतरीही आली. बाजूलाच औदुंबर अंजिरांनी लगडला होता. चार-पाच मधुर अंजीर पोटात जाताच अंगात शक्ती संचारली. आता त्याच्या लक्षात आलं की आपण नकळत उपराळाच्या देवराईत पोचलो आहोत आणि आपल्याला संधी मिळाली आहे, इथल्या देवचाराशी संवाद करायची. ‘‘नमस्कार उपराळकर महाराजा! क्षमा कर, अगदी नकळत, अवेळी आगंतुकासारखा तुझ्या देवराईत शिरलो. पण तुझ्या स्वागताने मनाला खूप उभारी आली आहे. तू म्हणालास ते खरं आहे, रंगवू या रात्र गावाच्या आणि परिसराच्या विकासाची स्वप्नं बघत.’’
‘‘वास्तुपुरुषा, माझ्या मनात तुमच्या या विकासकल्पनांसंबंधी खूप गोंधळ आहे, अनेक प्रश्नही आहेत. मी आहे या परिसराचा राखणदार पण माझी नजर आहे दूरवर. नुसतं महाराष्ट्र राज्य आणि भारत देशच नव्हे तर या संपूर्ण विश्वावर. मला खूप काळजी आहे या सर्व परिसराची, तिथल्या निसर्गाची, वन्यजिवांची आणि बुद्धिमान मानवाची. पण सुरुवात करू या आपल्या या गावापासूनच. मी पाहतो आहे सकाळपासून चाललेलं तुझं या गावाचं निरीक्षण. मग कसा काय वाटतो हा आपला गाव?’’
‘‘उपराळकरा, खरं सांगू? मी खूप समाधानी आहे. नदीच्या पाण्याचा शेतीसाठी पुरेपूर उपयोग, आनंदी शेतकरी, घराघरात नळाने पाणीपुरवठा, शौचालयं, स्वयंपाकासाठी गॅस, समाधानी स्त्रिया. गावातल्या दुधासाठी उपलब्ध बाजारपेठ आणि सर्वाना दूध पिशवीतून मुबलक पुरवठा. बाजारात दिसणारं समानतेचं वातावरण. पक्की घरं. शिवाय ती आधुनिक शाळा आणि इंग्रजी शिकून आधुनिक शिक्षणाकडे वळू पाहणारे विद्यार्थी. शेतीऐवजी इतर व्यवसायांकडे आकर्षित होणारे तरुण. जोडीला आधुनिक पद्धतीने शेती, बागायत करणारे गावकरी. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे नवे येणारे प्रकल्प, उद्योगधंदे. मला वाटतं, गाव योग्य मार्गावर आहे, अगदी माझ्या अपेक्षेच्या खूपच पुढे. आता या विकासाला योग्य दिशा, नियोजन व शिस्त आणायला हवी.’’
‘‘वा, वास्तुपुरुषा! तुझा प्रशस्ती दाखला म्हणजे गावाच्या विकासाला मिळालेला आशीर्वादच! आता माझे काही प्रश्न. नदीतल्या बंधाऱ्यांनी पाणी अडवलं, पण पूर्वी मिळणारे तांबोशी, कोलंब्या इत्यादी खाडीतले मासे कुठे गेले? नदीकिनारी सातत्याने उगवणाऱ्या रानवनस्पती आणि त्यात राहणारे पक्षी कुठे गेले? पाणीपुरवठा झाला, पण सांडपाण्याचं काय? शौचालयं झाली पण भूगर्भातील प्रदूषणाचं काय? जिवंत झऱ्यांच्या विहिरींना तडफडताना पाहिलंस का? डासांचा प्रादुर्भाव तू अनुभवला नसशील, पण घरोघरी हिवताप आणि डेंगीचे रुग्ण दिसू शकतील. त्यात आता नवीन येणारा झिका रोग. आधुनिक शेती, बागायतीतून जमिनीत, हवेत आणि पिकात पसरल्या जाणाऱ्या विषाचं काय? केवळ हापूसच्या मागे लागून गमावलेली आंब्याच्या जातीची विविधता? ग्रामोद्योगाच्या उच्चाटनाचं काय? बाजारपेठेतला कचरा पाहिलास काय, विशेषत: प्लास्टिकचा प्रादुर्भाव? सरकारी मराठी शाळेचं काय झालं आहे ते पाहिलंस ना? आणि खासगी, श्रीमंती, इंग्रजी माध्यमाची शाळा फोफावते आहे. आणि तरीही गावकऱ्यांची आणि सरकारची बेफिकिरी? गावकरी धंदा- व्यवसायात तरबेज होताहेत, पण हरवलेल्या माणुसकीचं काय? आणि इथला सांस्कृतिक वारसा, नीतिमत्ता? यालाच तू ‘विकास’ म्हणतोस काय?’’ या प्रश्नांच्या भडिमाराने वास्तुपुरुष गांगरला पण सावरून म्हणाला, ‘‘देवचारा, गावाच्या विकासाला सुरुवात झाली आहे. आता मागोमाग पर्यावरण विकास होईलच. संस्कृती संवर्धनाचाही प्रकल्प राबवता येईल. आर्थिक सुबत्ता अधिक महत्त्वाची नाही का?’’
‘‘वास्तुपुरु षा, तू सुज्ञ आहेस असा माझा समज होता. संतुलित विकासात प्राधान्य कशाला याबाबत गोंधळ दिसतो आहे तुझ्या मनात. रोगप्रतिकारतेपेक्षा औषधोपचारावर भर दिसतो आहे तुझा! आणि संस्कृती, नीतिमत्ता हे काय तोंडी लावायचं लोणचं आहे? मगासच्या स्वप्नात तू कसा घुसमटलास ते पाहात होतो मीही, मुंबईतल्या कचरा-धुराची आठवण करत. जरा भानावर ये तातडीने आणि माझ्या एकेका प्रश्नाचं विचारपूर्वक उत्तर घेऊन परत ये. आता आपल्या भेटी दर पंधरवडय़ाला, माझं समाधान होईपर्यंत.’’
निरुत्तर आणि भांबावलेल्या वास्तुपुरुषाने गाऱ्हाण्याला सुरुवात केली, ‘‘हे देवा- महाराजा उपराळकरा, आमच्या सर्वाकडून, तुझ्या लेकरा- बाळांकडून झालेल्या चुका पोटात घे. यापुढे प्रत्येक क्षणाक्षणाला आम्ही तुझ्या निसर्गाची, पर्यावरणाची काळजी घेत घेतच विकासाच्या वाटेने जाऊ ही आमची शपथ, रे महाराजा. आम्हा सर्वाना चांगल्या आरोग्यात, सुखा- समाधानात, शांतीत ठेव ही प्रार्थना, महाराजा. होय महाराजा!’’
एक हलकंच स्मितहास्य करून देवचार वास्तुपुरुषाला देवराईतून बाहेर पडायचा मार्ग दाखवत म्हणाला, ‘‘आता इथून तात्पुरता बाहेर पड, पण तुझी इतक्यात सुटका नाही. आता भेटू पुढच्या अवसेला.’’ विचार मंथनात गुंतलेल्या वास्तुपुरुषाने मोकळ्या माळावर बाहेर पडताना मागे वळून पाहिलं तर देवचार कधीच देवराईत विरून गेला होता.
उत्तररात्रीचं चांदणं मात्र हिरवाईतून जमिनीवर झिरपत आशेचा किरण दाखवत होतं.
ulhasrane@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Article on environmental issues

ताज्या बातम्या