काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सात दिवसांचा एक सेमिनार होता. साधारणपणे दुपारनंतरचे सत्र काहीसे कंटाळवाणे होत होते. पहिले एक-दोन दिवस कसेबसे सहन केल्यावर तिथेच माझी ओळख माझ्याच वयाच्या एका मुलीशी झाली. तिला देखील दुपारच्या सत्रातून काही वेळाची मुक्ती हवी होती. मग आम्ही दोघींनी मिळून ती मुक्तता शोधली. कुठे? तर रेस्ट रूम अर्थात टॉयलेटमध्ये!
ऐकून विचित्र वाटले ना? पण चिंता नका करू, कारण हे टॉयलेट नाकाला रुमाल लावून आत जावं असं नव्हतं बरं. आत जाण्याच्या मुख्य दरवाजापासूनच सौंदर्य जाणवत होतं. आत शिरल्यावर तयार होण्यासाठी लावलेले मोठे मोठे आरसे आणि भिंतींवर लावलेली उंची पेंटिंग्ज नजरेत मावत नव्हती. त्यात भरीस भर म्हणून रिलॅक्स होण्यासाठी ठेवलेला आलिशान सोफासेट.
कसं वाटलं वर्णन वाचून? बरेचदा बाथरूम किंवा टॉयलेट या शब्दांशी निगडीतच त्याचं रूपही आपल्या मनात कोरलेलं असतं. शॉवर, डब्लू सी, वॉश बेसिन आणि त्यांच्याशी निगडित तांत्रिक बाबी याही पलीकडे आधुनिक बाथरूमचे अस्तित्व आहे.
गेले काही भाग आपण बाथरूम आणि त्यासंबंधित बऱ्याच गोष्टींचा उहापोह केला, पण त्या चर्चेत मुख्यत्वे करून आपण मध्यम आकाराच्या आणि तुलनेने सर्वसाधारण अशा बाथरूमचाच विचार जास्त केला. मध्यम किंवा मर्यादित आकाराच्या बाथरूमचे डिझाईन करणे त्या मानाने कमी कटकटीचे. एकदा का त्यात शॉवर, डब्लू सी, आणि वॉश बेसिन जगाच्या जागी गेले की झाले. परंतु आव्हान तेव्हा असते, जेव्हा बाथरूम खूपच मोठे असते किंवा अगदी लहान.
आज आपण मोठय़ा आणि लहान अशा दोन्ही प्रकारच्या बाथरूमचा विचार करूयात. आधी मोठय़ा आकाराच्या बाथरूमविषयी बोलू. जेव्हा आपण मोठय़ा आकाराच्या बाथरूमविषयी बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, बाथरूममधे लागणाऱ्या आणि वापरात येणाऱ्या सर्व गोष्टी सामावल्या नंतरही बरीच जागा शिल्लक राहणारे बाथरूम.
आलिशान फ्लॅट किंवा बंगल्यांमध्ये बऱ्याचदा अशी बाथरूम पहायला मिळतात. मोठे बाथरूम म्हणजे बिनधास्त कसेही डिझाईन करा असे नसून, असे बाथरूम डिझाईन करताना बाथरूमच्या मूळ संकल्पनेला कुठेही धक्का न लावता जास्तीची जागा अधिकाधिक कल्पकतेने आणि परिणामकारकतेने हाताळण्याची विशेष खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळेच बाथरूम असो वा किचन या दोन्ही जागा डिझाईन करताना प्रॅक्टिकल अॅप्रोच असणे सर्वात महत्त्वाचे.
जसा की, मागे एकदा आपण बोललो होतो बाथरूम मोठे असल्यास बाथटब बसविण्याचा विचार आपण करू शकतो, पण या प्रकारचे बाथरूम डिझाईन करताना व्यवस्थित योजना नसेल तर विस्कळीतपणा येण्याची शक्यता असते. म्हणूनच याची योजना करताना शॉवर क्युबिकल, बाथटब, डब्लू सी व वॉश बेसिन यांच्या जागा अशा तऱ्हेने निश्चित कराव्यात की उरलेली जागा ही शक्यतो सलग वापरता यावी.
मुळात मोठी जागा असल्याने इथे शॉवर एरिया आणि बाथटब सोडल्यास इतर भाग ओला राहण्याची शक्यता जवळपास मावळते. याचा फायदा घेऊन काही प्रमाणात लाकडी फर्निचरचा वापर देखील इथे करायला हरकत नाही. विशेषत: वॉश बेसिन काउंटर.
वॉश बेसिन काउंटर साठी मार्बल, ग्रॅनाईट किंवा काच देखील वापरलेली आपण पहिली असेल. पण आपल्याकडे पुरेशी जागा आहे आणि काही वेगळे करण्याची इच्छा देखील आहे, अशावेळी लाकडाचा वापर करून वॉश बेसिन काउंटर बनवले तर? यासाठी तर जुन्या फर्निचरचा देखील वापर होऊ शकतो. घरात जर एखादे जुन्या पद्धतीचे दोन अडीच फूट उंचीचे लाकडी कपाट किंवा कन्सोल असल्यास त्यातच थोडेफार फेरफार करून छानसे अँटिक वॉश बेसिन काउंटर आपण सहज बनवू शकतो. याच सोबत लहानशी पुस्तकांची मांडणी किंवा अतिरिक्त टॉवेल तसेच अंतरवस्त्रांसाठी एखादे लाकडी कपाट देखील बाथरूमची शोभा वाढवून जाईल.
मोठय़ा बाथरूमच्या फ्लोरिंग तसेच भिंतींवरील टाईल्समधे देखील आपण वैविध्य जपू शकतो. शॉवर एरियामधे एक प्रकारच्या तर इतर ठिकाणी थोडय़ा वेगळ्या प्रकारच्या किंवा दोन रंगांच्या फ्लोअर टाईल्स लावून आपण फ्लोअरिंगमधे वेगळेपण आणू शकतो. तसेच जमिनीवरील कोरडय़ा भागात जर एखादे कार्पेट टाकले तर शॉवर मधून बाहेर पडल्यावर पाय कोरडे करण्यासाठी त्यावर उभेही राहता येईल. त्याच सोबत बाथरूमला थोडा वेगळा लुक देता येईल. भिंतींवरील टाइल्सबाबतदेखील थोडे वेगळेपण जपण्यासाठी फक्त शॉवर एरियामधे जिथे पाण्याचा थेट संबंध येतो तिथे वॉल टाईल्स लावून इतर ठिकाणी वॉटरप्रूफ पेंट लावायचा. या ठिकाणी एखादा छानसा टेक्श्चर पेंट घेऊन त्यावर फोटो फ्रेम्स डकवल्या की झाले काम. बाजारात लहान लहान टाईल्स एकत्र करून त्या प्रकारच्या मोझाईकच्या बारा इंच बाय बारा इंचांच्या तयार टाईल्सदेखील उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून बाथरूम मधे एखादे छान चित्र (म्युरल) देखील चितारता येईल. त्यातूनही हे मोठे बाथरूम जर एखाद्या बंगल्याचे असल्यास कल्पनेच्या वारूला खुशाल उधळू द्यावे. बाथरूमच्या बाहेर जर थोडी मोकळी आणि कमी वर्दळीची जागा असेल तर बिनधास्त बाहेरून एक कंपाउंड वॉल बांधून घ्यावी. आता बाथरूमच्या आत घेतलेल्या त्या मोकळ्या जागेवर सुंदर बगीचा फुलवावा आणि मग आपल्या आलिशान अशा बाथरूममध्ये बागेच्या बाजूने मस्त जाकुझी किंवा सेल्फ स्टँडिंग बाथटब ठेवून बागेची आणि बाथरूमची दोहोंची मजा लुटावी.
हे सगळं तर झाल आलिशान बाथरूम विषयी, पण बाथरूम जशी मोठी असतात तशीच ती बरीच लहान देखील असतात. तुम्ही कधी पॉवडर रूम विषयी ऐकलंय का? निरनिराळ्या बाथरूम विषयी बोलत असताना पॉवडर रूमला वगळून चालणार नाही. आधी आपण पॉवडर रूम या संकल्पनेची थोडी ओळख करून घेऊ . पॉवडर रूम म्हणजे एक प्रकारे कॉमन बाथरूम. होतं काय हल्ली की फ्लॅट असो व बंगला बाथरूम हे शक्यतो बेडरूमला जोडलेले असते. अशा वेळी जर कोणी बाहेरचे पाहुणे आले असतील तर त्यांना टॉयलेट वापरायचे झाल्यास बेडरूम मधून नेणे थोडे अवघडल्यासारखे वाटते. पण पॉवडर रूम मात्र बैठकीच्या खोलीला लागून असल्याने बाहेरच्या माणसांना वापरण्यासाठी तसेच जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी देखील पॉवडर रूम सोयीची पडते.
पॉवडर रूमला गमतीने घरातील ज्वेल बॉक्स असे देखील म्हटले जाते. आश्चर्यचकित होऊ नका, पण त्याला कारणही तसेच आहे. सर्वसाधारणपणे लहान किंवा मध्यम आकाराचे बाथरूम डिझाईन करताना कमीत कमी किंवा एकाच प्रकारची रंगसंगती वापरण्यावर भर दिला जातो. डब्लू सी व वॉश बेसिन देखील पांढऱ्या किंवा तत्सम रंगाचे घेतले जाते, की जेणेकरून बाथरूम फार बोजड वाटू नये. परंतु पॉवडर रूम डिझाईन करताना मात्र नेहमीचे सर्व रूढ संकेत अगदी धाब्यावर बसवावेत. प्रामुख्याने पाहुण्यांसाठी वापरली जात असल्याने दिखाऊपणा थोडा जास्तच हवा. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की पॉवडर रूम मधे शक्यतो शॉवरची सोय नसते. अगदीच अंघोळीची सोय करायची झाल्यास फार तर हॅन्ड शॉवर पर्यंतच ती मर्यादित ठेवावी. जर अंघोळीची सोय करण्याची आवश्यकता नसेल तर भिंतींना पारंपरिक टाईल्स ऐवजी पेंट किंवा वॉलपेपरचा देखील आपण उपयोग करू शकतो. थोडे भडक अथवा मेटॅलिक कलर्स त्यातही कॉपर व गोल्ड हे आपल्या पॉवडर रूमचे सौंदर्य जास्त खुलवतात. पॉवडर रूममधील सॅनिटरी फिटिंग्स जसे की डब्लू सी, वॉश बेसिन हे डिझाईनच्या दृष्टीने अद्ययावत असावेत. कपल डब्लू सी आणि पेडेस्टल असणारे वॉश बेसिन अशा ठिकाणी शोभून दिसतात. इतर अॅक्सेसरीज मधे नॅपकिन होल्डर, टिश्यू पेपर होल्डर या गोष्टी डिझाईन करताना चोखंदळपणे निवडल्या तर आपली पॉवडर रूम हिट झालीच म्हणून समजा.
मुळात बाथरूम लहान असो वा मोठे, आलिशान बंगल्यातील असो वा वन बी एच के मधील काही नियम हे सगळीकडे सारखेच लागू होतात. तेव्हा आपल्या घरातील बाथरूम डिझाईन करताना सर्वात आधी दर्जा मग प्लॅनिंग आणि नंतर डिझाईन या सर्व बाबतीत जागरूक रहा. आपल्या गरजांची आधी माहिती करून घ्या आणि त्या प्रमाणे काम होऊ द्या. शक्यतो अद्ययावत वस्तू आणि तंत्रज्ञान वापरण्यावर भर द्या. गेले काही भाग बाथरूम या विषयावर बऱ्यापैकी सांगोपांग चर्चा झाली असल्याने पुढील भागात थोडे दुसऱ्या विषयाकडे वळूयात. पण काही शंका असल्यास बिनधास्त विचारा उत्तर नक्की मिळेल.
तो पर्यंत हॅप्पी बाथरूम!
गौरी प्रधान
(इंटिरियर डिझायनर)
गौरी प्रधान interiors01@gmail.com