लहानपणापासून मला मुळातच पानाफुलांची खूप आवड. गोष्टींच्या पुस्तकात राजकन्या बागेत तिच्या मत्रिणींबरोबर खेळायची, विहार करायची असे मी जेव्हा वाचायचे, तेव्हा राजकन्येची किती मजा असते, असे मला वाटायचे. आपली छोटीसी का होईना, पण घराभोवती बाग असावी अशी माझी मनोमन इच्छा होती. प्रथम सुमारे चाळीस वर्षांपूर्वी आम्ही डोंबिवलीला तळमजल्यावर राहायचो तेव्हा आमच्या घराशेजारच्या जागेत आम्ही लावलेला पांढरा व पिवळा सोनटक्का बहरून यायचा आणि दारासमोर पांढरा व मधेच गुलाबी छटा असलेला गुलाबअंगभर फूलं घेऊन उभा असायचा. ही फुले रस्त्यावरून जाणाऱ्या सगळ्या माणसांचे लक्ष वेधून घ्यायची.

माझे लग्न झाल्यावर आम्ही डोंबिवलीला तिसऱ्या मजल्यावर राहायला आल्यावर तेथेही कुंडय़ांमध्ये काही फुलांची झाडे लावली. कालांतराने आम्ही नेरळला एका हिरव्यागार माळावरील बारा प्लॉटपकी एक प्लॉट घेतला. माझ्या पतींनाही झाडांची आवड असल्यामुळे आम्ही घर बांधायच्या आधीच कल्याणच्या पाठारे नर्सरीत जाऊन चिक्कू, फणस, प्राजक्त वगैरेंची रोपं आणून आमच्या प्लॉटमध्ये लावली. माझ्या पतीचं किंवा आमच्या दोघांचंही आठवडय़ातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा फेऱ्या व्हायच्या. प्रथम आजूबाजूच्या या खड्डय़ांत साचलेले पाणी प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणून झाडांना घालायचो. त्या माळरानावर कोणीच नसल्यामुळे प्राजक्ताचे झाड वगळून सर्व झाडे कोणीतरी नेली. नंतर तेथे पाणी नसल्यामुळे बरोबर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतले पाणी आम्ही त्या जिद्दीने टिकून राहिलेल्या प्राजक्ताच्या झाडाला घालायचो. काही दिवसांनी तिथे विजेची व पाण्याची सोय झाल्याने घर बांधले. हळूहळू तिथे वस्तीही वाढली. आम्ही तो प्लॉट घेण्याच्या आधीपासूनच आमच्या बंगल्याच्या कंपाऊंडमध्ये स्वागतासाठी असलेले सुरूचे झाड ख्रिसमस ट्रीची आठवण करून देते. कालांतराने दोन हापूसची रोपे, दोन नारळाची आणि प्रत्यकी एक पेरू, चिक्कू आणि जांभळाची झाडे लावली. प्रत्येक वेळी नेरळला जाताना मध्येच कल्याणला उतरून पाठारे नर्सरीतून वेगवेगळया रंगाची आणि वासाची गुलाबं, जाईजुई, चमेली, चाफा, मदनबाण, मोगरा, शेवंती, अबोली, अनंत अशी फुलझाडेही आणली. या झाडांसाठी दोनदा चागंली माती घेतली. गोठय़ात जाऊन गाईचं शेण मागवलं. चांगली खतं आणली. कधीकधी कीटकनाशके फवारली. दर दोन, तीन दिवसानं माझे पती सकाळी डोंबिवलीहून लवकरची गाडी पकडून नेरळला जाऊन झाडांना पाणी घालून मुंबईला ऑफिसला वेळेवर जायचे. तसेच प्रत्येक सुट्टीत झाडांना पाणी घालायला जायचे. एकदा चहावाल्याकडून उकळलेली चहापत्ती गुलाबांच्या झाडांना घालत असू. दोन वर्षांनी आम्ही ठिबक सिंचनाचा पाइप लावून घेतला. त्यामुळे झाडांना नियमित पाणी मिळायला लागलं. अजूनही वेळ मिळेल तेव्हा किंवा दर सुट्टीला नेरळला जाऊन माझे पती झाडांना पुरेसं पाणी घालतात. आम्ही लावलेली झाडं वाढताना पाहून एक सुखद अनुभव यायचा. आमच्या कष्टाचे चीज झाल्यासारखं वाटायचं. झाडांमुळे येणारा नैसर्गिक वारा अंगाला सुखावायचा. प्रदूषणमुक्त जागेत छान वाटायचे. आता दारातच लावलेले हापूसचे झाड डौलाने वाढत आहे व गोड आंबे देत आहे. तसेच स्वयंपाकाच्या खिडकीतून रायआवळा डोकावतो. आमटी करताकरताच खिडकीतून कढीपत्ता घेता येतो. सकाळी झोपेतून जाग येताच वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. प्राजक्ताचा सडा पडलेला असतो. जागे झाल्यावर सर्वप्रथम त्याचा सुगंध बेडरूमच्या खिडकीतून आत येताना मन प्रसन्न होतं. घराबाहेर आल्यावर पक्ष्यांचं दर्शन घडतं. फुलांभोवती बागडणारी सुंदर फुलपाखरं छान दिसतात. आता पपई, पेरू, चिक्कू, आंबा अशी फळे खायला मिळतात. दारातील फळे हाताने तोडून खाताना एक वेगळीच मजा येते. चहा पिताना पातीचहाचा वास आल्यावर पाहुण्यांकडून त्याची लागलीच विचारणा होते आणि जाताना कढीपत्ता, पातीचहा, फुलं, पपया भेट देता येतात.

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

दरवेळी पावसाच्या सुरुवातीला भेंडी, चवळी, माठ, पालक, मिरच्या अशा वेगवेगळया प्रकारची भाजी लावून दारातील कोणत्या ना कोणत्या भाजीची चव चाखायला मिळते.

मला राजकन्येएवढी मोठी बाग मिळाली नसली, तरी लहानपणीची स्वप्नातील आवडती बाग मला मिळाली आहे. माझ्या बंगल्याभोवतालचा कोपरा न् कोपरा हिरवा असून तो मनाला भुरळ घालणारा झाला आहे

madhurisathe1@yahoo.com