सुचित्रा साठे

घरातल्या लहानथोरांशी गोडगोड बोलून ती घराची स्वच्छतामोहीम राबवते. साहजिकच नीटनेटकेपणामुळे घरात प्रसन्नतेचा शिडकावा होतो. ज्यांच्या घरी नवरात्र असते त्यांच्या घरात देवीची आसनव्यवस्था, अखंड नंदादीप, रोज ताज्या फुलांची माळ, पूजा, नैवेद्य, सुवासिनी, कुमारिका, पूजन-उपासना, त्यानुसार सगळ्या साहित्याने घर भरून जातं. घरातील आसनव्यवस्थेतही बदल घडवून आणला जातो.

बाप्पाच्या विसर्जनानंतर आलेलं रिकामपण जरी खायला उठत असलं तरी बाप्पाची छोटी मूर्ती आणून पर्यावरणरक्षणातील खारीचा वाटा आपण उचलला, या आनंदाने मन भरून गेलेलं असतं. दिवस नकळत पुढे सरकतात. काळाच्या पडद्याआड गेलेल्या घरातील ज्येष्ठांच्या स्मृतीची पानं फडफडतात. त्यांची ‘जेवणं’ आटोपली की घराला नवरात्राचे वेध लागतात. खरं तर प्रत्येक घरी नवरात्र साजरं करण्याची परंपरा असतेच असं नाही. पण घरात नवरात्र असो किंवा नसो, घर नवरात्रासाठी तयार होत असतं. दिनदर्शिकेतील घटस्थापनेची तारीख लक्ष वेधून घेत असते. कोणीही भेटलं की, अमुक अमुक तारखेपासून नवरात्र सुरू होतंय हा विषय निघतोच. याला कारण आपली उत्सवप्रियता. त्यातून नवरात्र हा शक्तिदेवतेचा उत्सव. घराचं बारूप जरी दगडमातीचं असलं तरी अंतरंग हे स्त्री-शक्तीनेच खुलत असतं. स्त्रीशक्तीच्या आविष्काराने नटत असतं. किंबहुना अष्टभुज अष्टावधानी स्त्रीच घराच्या केंद्रस्थानी असते. तिच्या वावरण्यातून  तिची विविध रूपं समोर येत असतात. पोळ्या करता करता बाजूच्या गॅसवर तापत ठेवलेल्या दुधाकडे तिची एक नजर असते. गृहपाठ करणाऱ्या मुलाकडेही तिचं लक्ष असतं. कचरा घेऊन जाणाऱ्या बाईने बेल वाजवताच कचरा बाहेर ठेवणं हे काम तिचंच असतं. सासूबाईंच्या हाकेला ‘ओ’देत खडीसाखरेचा डबाही द्यायला तिच धावते. मधूनच मोबाईलच्या रिंगटोनकडे तिचा कान असतो. संध्याकाळी खायला काय करायचं, त्यासाठी फ्रिजमध्ये काय काय आहे ते आठवून, बाहेर जाणऱ्यांना काय काय आणि किती, केव्हा आणायचं याची यादी मनात तयार करत असते. या घरकामांबरोबरच मुलांना वाचण्याची सवय लागावी म्हणून ती स्वत: वाचून दाखवते. म्हणजे ती जणू ‘सरस्वती’च असते. पोहायला न जाणाऱ्या श्यामला जबरदस्तीने पाठवणाऱ्या ‘श्यामच्या आई’सारखी ती प्रसंगी दुर्गावतारही धारण करते. नोकरी करत असल्यामुळे ती लक्ष्मीही होते. अतिथीधर्म निभावताना गृहलक्ष्मी होते. घरातल्यांचे जिभेचे चोचले पुरवताना, त्यांच्यावर भरभरून प्रेम करताना, नात्यात मोकळेपणा राखून आधारवड होताना संतोषी माता होते. ही सगळी तिचीच रूपं असतात. त्यामुळे नवरात्र आलं की तिच्या सगळ्या रूपांना उत्साहचं उधाण येतं. वेगवेगळ्या मार्गानी ती नवरात्राशी जोडून घेते. दैनंदिन व्यवहारांव्यतिरिक्त काहीही करायचं म्हटलं की, घरात चैतन्य निर्माण होतंच.

घरातल्या लहानथोरांशी गोडगोड बोलून ती घराची स्वच्छतामोहीम राबवते. साहजिकच नीटनेटकेपणामुळे घरात प्रसन्नतेचा शिडकावा होतो. ज्यांच्या घरी नवरात्र असते त्यांच्या घरात देवीची आसनव्यवस्था, अखंड नंदादीप, रोज ताज्या फुलांची माळ, पूजा, नैवेद्य, सुवासिनी, कुमारिका, पूजन-उपासना, त्यानुसार सगळ्या साहित्याने घर भरून जातं. घरातील आसनव्यवस्थेतही बदल घडवून आणला जातो.

घरात नवरात्रं नसलं तरी एखादी भजनमंडळात जात असते. नवरात्राच्या निमित्ताने तिचे नऊ घरी नऊ वार लागतात. त्यासाठी भजनांची निवड, रियाज, क्रम याकडे जातीनं लक्ष दिलं जातं. कुणाकडे कसं – केव्हा जायचं, त्यासाठी रिक्षा पार्टनर कोण याची चर्चा ‘घरात’ घडत राहते. मोबाईल वाजत राहतो. तिचं रेडिओस्टेशन कामं करता करता चालू राहतं. रोज दुपारी तीनचा ठोका पडला की जामानिमा करायला सुरुवात करावी लागणार, जोशात भजन होणार, त्यानंतर खास डिशही मिळणार. सगळं आटपून येईपर्यंत दिवेलागण होऊन जाणार. आपल्या पोटाची सोय होणार, पण घरच्यांचं काय, हा प्रश्न एखादी चतुरा उत्तम नियोजनाने सोडवून टाकते. डिंकाचे लाडू, चिवडा, चकल्या यांनी ‘पारदर्शक’ बरण्या भरून टाकते. तोंडं सतत हलत राहिली की घरची आघाडी शांत राहते. साहजिकच भजन ‘भाव’ चांगला उमटतो.

एखाद्या सहनिवासात हौशी गायक-वादकांचा ग्रुप असतो. ‘नवरात्रीतील एखादा दिवस एकाच्या घरी भक्तिरंगात’ रंगूलागला की अचानक फतवा निघतो. मग तालमीची आवर्तनं प्रत्येकाच्या उपलब्ध वेळेनुसार अचानक आलटून पालटून प्रत्येकाकडे होत राहतात. सगळ्यांकडून सरस्वतीची उापसना घडते. साहजिकच कलेतील प्रगतीचा, नैपुण्याचा, सादरीकरणाचा आलेख उंचावू लागते. आपुलकीच्या नात्यांचा उत्सव रंगतो.

एखादं आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करणारं अभ्यास मंडळ नवरात्राच्या निमित्ताने शंकराचार्याच्या नादमधुर शब्दवैभवाने नटलेल्या स्तोत्रांचं सामूहिक पठण घरोघरी करतं. एकवीस कडव्यांचं महिषासुरमर्दिनी स्तोत्र, अन्नपूर्णा स्तोत्र, अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणताना वाणीला हलकासा व्यायाम घडतो. स्तोत्र-मंत्रांमागील विज्ञान कृतीत आणलं जातं.

काही जणी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या शक्तींचं वर्तमानकाळातील स्त्रियांत दिसणारं रूप शोधण्याचा अभ्यास करतात आणि सार्वजनिक उत्सवांतून मांडतातही. त्यासाठी चरित्रगं्रथांचा शोध घेतात, अभ्यास करतात. ते ‘रूप’ ऐकणाऱ्यांच्या

मनावर ठसवताना योग्य मार्गाने, कष्टाने पैस मिळवणं, आपलं स्वत:चं रक्षण करण्याचं सामर्थ्य अंगी बाणवणं, शिक्षणाचं महत्त्व ओळखणं या आवश्यक बाबींकडे लक्ष वेधून घेतात.

आई काय लिहितेय ही जिज्ञासा घरामध्ये निर्माण होते. मग काय, घरभर कागद-पुस्तकांचा पसारा, डोक्यात विचारांचा पसारा, मुलांच्या शंकाकुशंकांना उत्तर देण्याचा पसारा, असा पसाराच पसारा होतो. हे सगळं घरात घडल्यामुळे ऐकण्याचा संस्कार होत जातो. नवदुर्गाच्या कौतुक समारंभात जाण्याने काही तरी करण्याची प्रेरणा मिळते.

एखादं घर नुकत्याच दुडुदुडु पावलांनी घरात बागडणाऱ्या स्त्रीशक्तीचं कौतुक करण्यात, तिला नवीन अंगा घालून मिरवण्यात रममाण होतं. वाहन खरेदीचा मुहूर्तही साधला जातो. वयोवृद्धांकडून या पराक्रमाबद्दल कौतुकाची निरांजनं ओवाळली जातात. हार, पेढे, सेल्फीसह सगळ्यांना एक चक्करही मारली जाते. सगळ्या नव्या-जुन्या वाहनांबरोबर अवजारांचीही पूजा होते. सजीव-निर्जीवात देवत्व शोधणाऱ्या आपल्या संस्कृतीचं विलोभनीय रूप प्रकर्षांने दिसून येते.

नवरात्र म्हणजे कुमारिकांचा मान. एखादी नात्यातल्या जवळपासच्या कुमारिकांना बोलावून त्यांचे पाय धुवून, कुंकवाने स्वस्तिक काढून पूजन करते. बांगडय़ा, गळ्यातलं, आवडीचा खाऊ देते. त्या वेळी त्या उमलत्या कळ्यांचे ‘भाव’ टिपणं फारच हृद्य असतं. काहींना कौतुकाने लेकीचा भोंडला करायचा असतो. त्यासाठी गाण्यांच्या झेरॉक्स काढणं, नावीन्यपूर्ण खिरापती करणं, आग्रह करून खायला घालणं यात ती मग्न असते. शिवाय सार्वजनिक भोंडल्यात नऊवारी साडी, खोपा घालून मिरवायचंही असतं. नवरात्र उत्सवातील लक्षवेधी कार्यक्रमांना मुलामुलींना सक्तीने घेऊनही जाते. आवड असूनही ज्यांना अशा कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही, अशा ‘आपल्या’ माणसांना आवर्जून राहायला बोलावते. अष्टमीला घागरी फुंकून महालक्ष्मीची सेवा करण्याचं तिनं योजलेलं असतं. सार्वजनिक रंगाचा नियम पाळण्याकडे तिचा कटाक्ष असतो. तोच रंग टिपणारी वेधक रांगोळीही काढायची असते.

घरात नवरात्र नसलं तरी ती वेगवेगळ्या भूमिकांतून शक्तिदेवतेच्या उत्सवात सहभागी होत असते. त्यासाठी वेळ देत असते. तेही घराचं ‘घरपण’ सांभाळून. त्यासाठी आपली क्षमता, शक्ती वाढवून तो आदर्श पुढच्या पिढीसमोर ठेवत असते. त्यात धन्यता मानत असते. अशा वेळी घरातल्या ज्येष्ठांनी ‘आधी काही तरी खाऊन घे गं, मग काम कर’ अशी मायेने केली सूचना तिला दहा हत्तींचं बळ देऊन जाते. स्वत: आनंदी राहून घराचं अंतरंग हसतखेळत ठेवण्याचा प्रयत्न करते. असं करणं म्हणजेच शक्तिदेवतेचा प्रसाद मिळवण्यासारखं आहे. म्हणूनच ‘करुणा विस्तारी’ म्हणत ती नतमस्तक होते.

n suchitrasathe52@gmail.com