‘वास्तुरंग’मधील मनोज अणावकरांचा ‘ज्येष्ठालय’ हा लेख वाचला. मी नुकताच एका वृद्धाश्रमाचा अनुभव गाठीशी बांधला. त्याबद्दल विचारमंथन सुरू झाले. मुंबईपासून जवळच असलेल्या या वृद्धाश्रमामध्ये चार दिवस राहण्याचा योग आला. वृद्धाश्रमांची नावं फार काव्यमय, उत्साहवर्धक असतात, पण शेवटी शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे नावात काय आहे? नाव कितीही गोंडस असले तरीही समाजाची ‘दुर्दैवी’ बाजूच असं म्हणावं लागेल, निदान भारतीय संस्कारानुसार.
मी अनुभवलेल्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाविषयी मनात संभ्रम निर्माण होण्याचे प्रयोजन नाही. उलट वृद्धाश्रमाची देखरेख, व्यवस्थापन, ते सर्व सेवकवर्ग खरोखरच कौतुकास पात्र आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून आलेल्या वृद्धांची दिवसाचे २४ तास हसतमुखाने सेवा करणं म्हणजे व्रताचरण. पण कोणतीही संस्था म्हटली की नियमांचा बांधीलपणा आला आणि नियमांचे काटेकोर पालन. संस्था असो वा व्यक्ती- शिस्तपालनाला पर्याय असू शकत नाही, असू नये. व्यवस्थापनाच्या सचोटी, पराकाष्ठा याबद्दल दुमत नाही. पण तरीही मनातले विचार कागदावर उतरवावे असं वाटलं.

खटकल्या दोन गोष्टी

ज्यांना वृद्धाश्रमांमध्ये राहण्याची पाळी येत नाही अशा सुदैवी लोकांनी अशा संस्थांकडे विचारपूर्वक आणि पुरेशा गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. वृद्धाश्रमाकडे ‘विरंगुळा’ अथवा पिकनिक स्पॉट या दृष्टीने पाहू नये. आम्ही तिकडे होतो त्या सुमारास कसली तरी मोठी सुट्टी होती. काही जण ‘टाइमपास’ म्हणून तात्पुरते इथे राहावयास आले होते. वृद्धाश्रम म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचे चरण नाहीत अथवा चारधाम यात्रा नाही, ज्यामुळे भक्तियोग घडावा. वृद्धाश्रम म्हणजे महाराजांच्या दूरदृष्टीचे, पराक्रमाचे स्मारक नाही, की जिथे जाऊन अभिमानाने नतमस्तक व्हावे. वृद्धाश्रम म्हणजे मनाला भुरळ घालणारा ताजंतवानं करणारा सृष्टीचा चमत्कार नाही. त्यामुळेच असं वाटतं की, वृद्धाश्रम म्हणजे समाजाची दुर्दैवी बाजू. कोणी कितीही नाकारलं तरी हे छिद्र, ही घुसमट लपून रहात नाही. आपल्या घरकुलात राहणारी माणसं- आम्ही अगदी खूश आहोत. आनंदी आहोत असं दुसऱ्याच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करताना आढळत नाहीत. मग इकडे राहणाऱ्या बऱ्याच जणांना या मानसिक आधाराची गरज का भासते? आपलं घरकुल ही भावनाच किती सुखावह, सुरक्षिततेची जाणीव निर्माण करणारी असते.
– छाया प्रधान, मुंबई