आजच्या काळात व्यावसायिक स्पर्धा प्रचंड वाढली आहे. बाजारात गेल्यानंतर अनेकदा आपण पाहतो की, अगदी किराणामालाच्या दुकानांपासून ते सराफाच्या दुकानांपर्यंत एकाच प्रकारची दुकानं शेजारी शेजारी असतात. पण नेहमीचे ग्राहक दुकानांच्या त्या गर्दीतून हुडकून काढून नेमक्या आपल्या त्या नेहमीच्याच दुकानाची पायरी चढतात. रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंच्या बाबतीतही हेच निदर्शनाला येतं. एखाद्या दुकानात गेल्यावर एकाच प्रकारचं उत्पादन वेगवेगळ्या कंपन्या तयार करत असतात. मात्र, ग्राहकाचा विश्वास हा विशिष्ट कंपनीच्या उत्पादनावरच असतो. मग ते साबण असोत, सौंदर्यप्रसाधनं असोत, की अगदी बिस्किटं किंवा चॉकलेट्स. का घडतं असं? मालाचा दर्जा हे त्यामागचं एक प्रमुख कारण असलं, तरी आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जाशी तडजोड करणं कोणत्याच कंपनीला परवडणारं नाही, त्यामुळे उत्पादन तयार करायचं तंत्रज्ञान एकसारखंच असूनही विशिष्ट ग्राहकांना आकर्षित करण्यात इतर जे घटक कारणीभूत आहेत, त्यांच्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे या वेगवेगळ्या दुकानांमधली ग्राहकांना आकर्षून घेणारी रंगसंगती किंवा उत्पादनांच्या बाबतीत सांगायचं झालं, तर उत्पादनांच्या पॅकेजिंग अर्थात वेष्टनांची रंगसंगती! मोठमोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्केटिंग अर्थात विपणन विभागांना उत्पादनाच्या खपावर परिणाम करणाऱ्या घटकांबाबत संशोधन करताना हे आढळून आलंय. त्याला अनुसरूनच मग विशिष्ट उत्पादनांच्या वेष्टनांमध्ये विशिष्ट रंगांचा वापर केला जातो. त्यामुळेच केक किंवा आइस्क्रीम तयार करणाऱ्या काही विशिष्ट कंपन्या त्यांच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना विशिष्ट पद्धतीची अंतर्गत सजावट आणि रंगसंगती वापरणं बंधनकारक करतात. कारण अशी दुकानं दिसलीत की, ती त्या विशिष्ट केक किंवा आईस्क्रीम कंपनीची ओळख असते आणि मग त्या उत्पादनांच्या नेहमीच्या ग्राहकांचे पाय आपसूकच त्या दुकानांकडे वळतात.

* चेहऱ्याला लाली आणणारे ब्लशेश, लिप्स्टिक्स किंवा केसाला लावायचं कलप अशा सौंदर्यप्रसाधनांच्या वेस्टनांमध्ये काळा रंगाचा वापर हा प्रामुख्याने केलेला दिसून येतो.

* निळा रंग हा बहुधा बऱ्याच जणांना भावणारा असतो, त्यामुळे तो विश्वास आणि अवलंबित्व यांचं प्रातिनिधित्व करत असल्यामुळे बऱ्याच बँकांच्या किंवा वित्तीय संस्थांच्या नावांच्या किंवा आर्थिक अथवा गुंतवणूकविषयक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये या रंगाचा वापर केलेला आढळतो. एल्सिव्हिअर या सुप्रसिद्ध संशोधन समूहाच्या सायन्स डायरेक्ट गटाच्या जरनल ऑफ बिझिनेस रिसर्च या संशोधन नियतकालिकाने २००३ साली केलेल्या पाहणीत कंपन्यांनी नारिंगी रंगाऐवजी निळ्या रंगाचा वापर केला, तेव्हा अशा कंपन्यांकडे आकर्षित होणाऱ्या ग्राहकांची संख्या १५ टक्क्यांनी वाढल्याचं आढळून आलं.

* इंग्रजीत बरगंडी रंग म्हणजे गडद लालसर जांभळा किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वी आपले फॅमिली डॉक्टर ज्या रंगाच्या औषधाचा डोस तापावर किंवा सर्दीवर द्यायचे, त्या रंगाचा वापर हा अशी उत्पादनं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या लोगोमध्ये अर्थात, प्रतिकचिन्हांमध्ये किंवा वेष्टनांमध्ये केलेला दिसतो.

* निसर्गपूरक असल्याचा दावा करणाऱ्या हरित उत्पादनांसाठी ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांचा खप वाढवण्यासाठी बऱ्याचदा कंपन्या हिरव्या रंगाचा वापर नावं रंगवण्याकरिता किंवा वेष्टनांकरिता करतात.

* जरनल ऑफ ऑर्थो मॉलिक्युलर सायकिअ‍ॅट्री या मूलत: स्कीझोफ्रेनिआ अर्थात छिन्नमनस्कता किंवा मनोभाजन या आजारावरती संशोधन करणाऱ्या आणि आता मनोविकारांवरच्या औषधोपचारांवर संशोधन करणाऱ्या आतंरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या आधारे पिंक अर्थात गुलाबी रंगाचा वापर केला, तर इंडोक्राइन सिस्टम्स अर्थात मेंदूतल्या अंत:स्राव प्रणालीचा वेग कमी होऊन मनावरचा ताण कमी व्हायला मदत होते. त्यामुळे मन शिथिल असलं की, त्यातून मनाला मिळणाऱ्या प्रसन्नतेमुळे वस्तू खरेदी करायला गेलेल्या ग्राहकाचा हात आणि खिसा मोकळा होतो, असं आढळून आलंय.

* पांढऱ्या रंगाचा वापर हा त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीत केलेला दिसून येतो. कारण तो स्वच्छतेशी निगडित आहे.

* पिवळ्या रंगाचा वापर हा ऊर्जा उत्पन्न करायला कारणीभूत ठरत असल्यामुळे तो भूक चाळवतो. म्हणूनच जेवणाच्या वेळी महामार्गवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या नजरेला या रंगातल्या हॉटेलच्या पाटय़ा दिसल्या की, आपोआपच वाहनचालकाचे पाय ब्रेकवर जाऊन गाडी हॉटेलच्या आवारात शिरण्याकरिता ते पूरक ठरतं.

परंतु केवळ उत्पादनांच्याच बाबतीत हे रंगशास्त्र लागू पडतं असं नाही, तर याआधी सांगितल्याप्रमाणे या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी ती विकणाऱ्या दुकानांच्याही रंगसंगती त्याला पूरक असणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, केवळ हॉटेलच्या नावाची पाटीच पिवळी असणं पुरेसं नाही, तर छायाचित्र १ मध्ये दाखवल्याप्रमाणे आतली रंगसंगतीही पिवळ्या रंगाचा वापर प्रामुख्याने होतो. तसंच याआधी सांगितल्याप्रमाणे मन शांत करणारा गुलाबी रंग हा बहुतेक वेळा बाळांच्या किंवा लहान मुलांच्या कपडे, वस्तू विकणाऱ्या दुकांनांमध्ये वापरलेला दिसतो. इंग्रजीत या रंगाला बेबी पिंक असंही संबोधलं जातं. छायाचित्र २ मध्ये असंच एक लहान मुलांच्या वस्तूंचं दुकान दाखवलं आहे. शैक्षणिक साहित्य विकणाऱ्या दुकानांमध्ये तांबडय़ा, हिरव्या आणि निळ्या रंगांचा वापर प्रामुख्याने केलेला दिसतो. संगणकाच्या मॉनिटरच्या क्रीनचे किंवा टीव्हीच्या क्रीनचे हे तीन रंग प्राथमिक रंग आहेत. ही दोन्ही साधनं प्रामुख्याने लोकशिक्षणाचं काम उत्तम करू शकतात. त्यामुळेच बहुधा शैक्षणिक साहित्यासाठी या रंगांचा वापर केलेला दिसून येतो (छायाचित्र ३ पाहा.) शिवाय शिक्षणासाठी आवश्यक असलेला तांबडय़ाचा तजेलदारपणा, नवं काही शिकण्यासाठी मनाला लागणारा हिरव्या रंगाचा टवटवीतपणा आणि अभ्यासासाठी लागणारी एकाग्रता निळ्यातून मिळते, हेही या तीन रंगांच्या वापरामागचं कारण आहे. पिवळा रंग हा चतन्यदायीही आहे, तसंच नारिंगी रंग हा आनंदीपणाचं प्रतीक आहे. व्यायाम करताना मन आनंदी असणं आणि व्यायामातून चतन्य मिळणं आवश्यक असल्यामुळे या दोन्ही रंगांचा वापर हा व्यायामाची साधनं विकणाऱ्या दुकानांमध्ये केलेला आढळून येतो.

थोडक्यात, आजच्या या स्पर्धेच्या युगात जर उद्योगाला चालना देऊन खप वाढवायचा असेल, तर लहान दुकानदारांपासून ते मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत सर्वच व्यावसायिक आस्थापनांना रंगसंगतीचा हा महत्त्वाचा घटक विचारात घेणं गरजेचं आहे. व्यवसायाच्या बाकीच्या बाजू यशस्वीपणे सांभाळल्यानंतर जर याही घटकाला न्याय दिला, तर निश्चितच ते व्यवसायाला पूरक ठरू शकतं, हेच संशोधनाअंतीही सिद्ध झालंय.

मनोज अणावकर

(इंटिरियर डिझायनर) – anaokarm@yahoo.co.in