निरोप तुज देता!

होळी पौर्णिमा झाली की वसंताच्या मांडवाखालूनच या फळांच्या राजाचं आगमन होतं

(संग्रहित छायाचित्र)

सुचित्रा साठे

आंब्याचा निरोप घेणं घराला फार जड जातं. घराच्या गृहिणीला वेध लागलेले असतात ते कच्च्या आणि पिकलेल्या आंब्याच्या आठवणींना जपण्याचे. त्याच्या पाऊलखुणा सांभाळण्याचे. तिने हापूस आंब्याच्या फोडींचा साखरंबा गुपचूप करून ठेवलेला असतो. थोडय़ा आमरसाचा जाम ही तिच्या फ्रीजमध्ये जागा पटकावून बसलेला असतो. बाजारातले आंबे अदृश्य झाले की हा सारखंबा पानामध्ये मोठय़ा तोऱ्यात धावत येतो.

आजीच्या पदराला झोंबत तीन साडे तीन वर्षांच्या चिमुरडय़ा सईने ‘अ’ ला काना ‘आ’, ‘ब’ ला काना ‘बा’ आंबा अशी आंब्याची टेप लावली होती. उभ्या उभ्या निरोप सांगायला आलेल्या आपल्या मैत्रिणीला आजी चहाचा आग्रह करत होती. आणि सई‘घरातला आंबा कापून दे म्हणजे मला पण आंब्याची फोड खाता येईल. हे जणू आडवळणानं सूचित करत होती. सईची ही युक्ती आजीच्या लक्षात आली. तिने आंबा कापला. मैत्रिणीबरोबर सईलाही दिला. आंब्याचं ध्यान लागल्यावर सईचा आंबा जप बंद झाला. इतका हा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाना प्रिय असणारा आंबा त्यामुळे पावसाची चिन्ह दिसू लागली आणि आंबा दर्शन,दुर्मीळ व्हायला लागलं की घरातला पाहुणा गावी गेल्यावर जशी हुरहुर लागते तशी हुरहुर ‘तो’ लावतो. सतत आठवणींनी बेचैन करतो.

होळी पौर्णिमा झाली की वसंताच्या मांडवाखालूनच या फळांच्या राजाचं आगमन होतं. भूलोकीचा गंधर्व म्हणजे कोकीळ पक्षी आपला पंचम स्वर लावून वातावरण नादमय करून टाकतो. त्याचवेळी घराच्या अंगणातील आम्रतरू मोहरून येतो. त्या आगळ्या गंधाने अंगण गंधमयी होते. जसजसे दिवस पुढे सरकतात तसे आंब्याच्या झाडाला छोटय़ा छोटय़ा कैऱ्या लगडतात. जत्रेतल्या खेळण्यातल्या लाकडी घोडय़ांच्या पाठीवर बसून त्याची मान घट्ट धरून गोल फिरणाऱ्या शिशुवर्गासारख्या कैऱ्या झाडाच्या फांदीला घट्ट पकडून डुलत राहतात. घर स्वत:च्या वासंतिक महिरपीवर खूश होते. मुलांच्या परीक्षा संपायला आणि झाडावरून कैऱ्या खाली उतरायला अगदी एकच मुहूर्त मिळतो. निसर्गाचंच ‘टाइम मॅनेजमेंट’ ते. त्यामुळे आधी कच्चा आणि मग पिकलेल्या आंबा महोत्सवाचा शुभारंभ होतो.

आपल्यासाठी घरासाठी आंबा हे केवळ फळ नसते तर तो एक वार्षिक उत्सवच असतो. आंब्याचा रंग गंध स्वाद ही आपल्या मर्मबंधातली ठेव असते. आंब्याचा मोसम कसा असेल याची चर्चा आंब्याला मोहोर आल्यापासूनच चालू होते. ‘‘आंबा.. या दराने आज मार्केटमध्ये दाखल. हा भाव गरीबांना, मध्यम वर्गीयांना परवडणारा नाही,’’ अशा शब्दात वर्तमानपत्रात प्रत्येक  वर्षी त्याच्या येण्याचे पडघम वाजतातच. एखादा गर्भश्रीमंत त्याची रसरशीत फोड खाईल तर एखादं रस्त्यावरचं पोर त्याची कोय अगदी पांढरीशुभ्र होईपर्यंत चोखताना आढळेल. आंबा शतकानुशतके असा सामाजिक असल्याने आपल्या संस्कृतीत त्याला मानाचे स्थान आहे. ‘ज्याचे पल्लव मंगळप्रद, छाया जयाची हरी, गंधयुक्त फुले फळेही असती, ज्याची सुधेच्या परि’ असे त्याचे गोडवे गायले जातात. इतके कौतुक इतर कोणत्या फळाच्या किंवा वृक्षाच्या वाटेला येत नाही. दरवर्षी वाजतगाजत आंब्याचा मोसम येतो, चर्चेला उधाण येते आणि मनसोक्त त्याचा उपभोग घेतल्यावर मोसम संपतो. घर आंब्याने भरून गेले की यजमानाला वाढीव काम असते. रोज किती आहेत, सगळ्यांना पोटभर आहेत ना याची दखल घेतली जाते. आंब्याचा मोसम संपल्यावरही अनेक रूपात तो मागे उरत असतो. त्याच्या आठवणी जपल्या जात असतात.

या महोत्सवाच्या सुरुवातीला कैऱ्या हळूच ‘गृह’ प्रवेश करतात. वसंत पेयाने सगळ्यांना तरतरी येते. उकडलेल्या कैऱ्यांचा मेथांबा, बाळकैऱ्यांचे, किसलेल्या कैरीचे लोणचे, कैरीकांदा चटणी, कैरीचे सार अशा वेगवेगळ्या रूपात हा कच्चा आंबा पानांत सतत डोकावत राहतो आणि जीभेचे चोचले पुरवत राहतो. ‘आंबा पिकतो, रस गळतो’ अशा स्वप्नसृष्टीत  दंग असतानाच फळबाजाराचा रस्ता सुगंधित होतो. ‘केशरी’ आंबा सर्वाचे लक्ष वेधून घेतो. किंमत खिशाला परवडत नसते, तरी मोह आवरता येत नाही. ‘चला थोडेसे आंबे घेऊन सुरुवात तर करू या’ हा विचार पक्का होतो. आणि मधुर चवीचे आंबे महाराज घरांत पाऊल टाकतात. हापूसला तर घरात अगदी मानाचं पान. पानातल्या डाव्या उजव्या बाजूंना डावलून आंबा केंद्रस्थानी विराजमान होतो आणि गृहिणीच्या पोळ्यांची चळत हा हा म्हणता डब्यांचा तळ गाठते.

फुटकळ आणून खाल्ल्यासारखं थोडंच वाटतं म्हणून घरात आंब्याची पेटी येते. तिच्यासाठी विचार करून जागा ठरवली जाते. एका निवांत कोपऱ्यात गवताच्या बिछान्यावर सगळे हिरवे आंबे गवताचे पांघरून घेऊन पहुडतात. रोज ‘आज काय परिस्थिती आहे’ हे बघण्यासाठी पांघरुणात डोकवायचा सगळ्यांना चाळा. पिकलेल्या आंब्याच्या ‘दर्शनमात्रे’ ही तोंडाला पाणी सुटलेलं. मग पिवळ्याधमक आंब्यांचे नाकाने खोल वास घेत स्वयंपाक घरात उचलबांगडी. मग ते धुवायचे, पुसायचे, दाबून दाबून मऊ करायचे, डेख काढून सर काढायचा, यांत सगळ्यांचा ‘हात’भार. मधूनच गोड केशरी पिचकारी अंगावर उडायची. हास्याची खसखस पिकायची. तयार झालेला साली कोयींचा ढीग चोखायला बच्चे कंपनी हजर. कपडय़ावर डाग पडतील म्हणून गृहिणींचा जीव कासावीस. पण या दिवसात प्रत्येक कपडा केशरी टिळा लावून मिरवतोच. रंगलेलं तोंड नाकाचा शेंडा, हाताच्या कोपरापर्यंत आलेले ओघळ आणि कोय सुळकन् हातातून निसटल्यामुळे अवतीभवती केशरी छाप. आंब्याचा स्वाद घ्यावा तर याच कंपनीने. कोकणच्या राजाला मनसोक्त न्याय दिल्यावर बाकीच्यांची वर्णी. रसाळ पायरी, माणकूर शर्यतीत पुढे येतात. त्यांच्या अवीट गोडीने आणि अघळपघळ वृत्तीने रसनातृप्ती होते. घर समाधानाने तृप्त होतं.

मृग नक्षत्र लागलं आणि पावसाने हजेरी लावली की जादूची कांडी फिरवावी तसा हापूस चोरपावलाने नजरेआड होतो. पोळी आणि आमरस यांचं घट्ट समीकरण मनातून सुटता सुटत नाही. तोतापुरी, दशहरा, लंगडा अशा उशिरा येणाऱ्या/ जातीत ‘ती’ चव आपण शेवटपर्यंत शोधत राहतो. आंब्याचा निरोप घेणं घराला फार जड जातं. पोळीशी काय, हा प्रश्न मोठा ‘आ’ वासून समोर उभा राहतो. हातात न मावणारा राजापुरी, दुधाची तहान ताकावर भागवते. दोन्ही टोकाला निमुळता असलेला तोतापुरी आणि ‘रस नावालाच आणि कोय मोठी’ अशा बिटक्या चालवून घेतल्या जातात.

घराच्या गृहिणीला वेध लागलेले असतात ते कच्च्या आणि पिकलेल्या आंब्याच्या आठवणींना जपण्याचे. त्याच्या पाऊलखुणा सांभाळण्याचे. तिने हापूस आंब्याच्या फोडींचा साखरंबा गुपचूप करून ठेवलेला असतो. थोडय़ा आमरसाचा जाम ही तिच्या फ्रीजमध्ये जागा पटकावून बसलेला असतो. बाजारातले आंबे अदृश्य झाले की हा साखरंबा पानामध्ये मोठय़ा तोऱ्यात धावत येतो. आंब्याच्या अनुपस्थितीत डबा खायचा या कल्पनेने वेडीवाकडी झालेली तोंडे डबा उघडल्यावर आंबा जॅम बघून एकदम खुलतात. त्याचा स्वाद, रंग आणि चव आंबा भेटीचा, पुन: प्रत्ययाचा आनंद मिळवून देतो. विरघळणारी आंबा पोळी, आंबा बर्फी आंब्याच्या आठवणींना पुन:श्च उजाळा देतात.

आंब्याचा विरह सहन करायचा आणखीन एक उपाय घराच्या पोटात असतो. चटपटीत डावी बाजू. पावसाची एक सर धावून गेली की लोणच्याच्या आणि मोरंब्याच्या मोठय़ा कैऱ्या बाजारात लक्ष वेधून घेतात. सगळ्यांची पावले आपोआप तिकडे वळतात. गृहिणी हाताने दाबून बघत घट्ट टणक अशा कैऱ्या लोणच्यासाठी निवडते. मोरंब्याच्या मोठय़ा कैऱ्याही दाटीवाटीने पिशवीत बसून घरी दाखल होतात. आवश्यक ती काळजी घेऊन लोणचे घालण्याचा कार्यक्रम पार पडतो. घरभर सुटलेल्या लोण्याच्या वासाने तोंडाला पाणी सुटते. लोणच्याच्या मसाल्यात घोळवलेल्या कैरीच्या फोडी खाण्याची मजा काही औरच. मग काय, ताज्या लोणच्यावर सगळे तुटून पडतात. मिटक्या मारत कैरीची फोड खाऊन टाकतात. हात पुढे पुढे येत राहतात. ‘जरा बेतानं खा’ मातोश्रींचा सावधगिरीचा सल्ला येतो. ‘खाऊ दे गं भरपूर, खाण्याचं वय आहे. पुरवून पुरवून कशाला खायचं? मग उरवून काय त्याचं लोणचं घालायचय!’’ जास्त अनुभवी शब्दे पुढे येतात. एखादी गृहदक्ष गृहिणी लोणचं घातल्यावर कोयी तासून (किसून) ‘किसाचे लोणचे’ घालते. शिवाय काही कोयींना आमटीत पोहायला लावते तर काहींना कुकरमध्ये उकडून त्याच्या गराचा वापर कुशलतेने करून आंबा दर्शन घडवत राहते.

कैरीच्या लोणच्याच्या बरणीला दादरा बांधल्यावर केशर वेलचीयुक्त कैरीच्या किसाचा आंबटगोड साखरंबा आणि लवंगांच्या स्वादाचा फोडींचा गुळंबा आपल्या खास रंगाढंगाने त्यात लपलेल्या ‘आंबा’ या शब्दाने सर्वाच्या गळ्यातला ताईत बनतो. शिवाय आमरसाचे हवा बंद डबे, मँगो पल्पच्या बाटल्या आंबाप्रेमाने फ्रीजमध्ये दाटीवाटीने बसतात. आम्रखंड, फ्रुटसॅलड, आंबा आइस्क्रीम यात उपस्थिती दाखवून घराची शोभा वाढवतात. वाळलेली आंबोशी स्वयंपाकात हळूच डोकावते. आंब्याची लोकप्रियता अशीच आहे. त्याच्या चवीच्या महाजालातून आपण चटकन् बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे विसरू म्हणता विसरेना अशी आपली अवस्था होते.

परदेशवारी करून तिथेही आपल्या रूपागुणाने सर्वाना मंत्रमुग्ध करणाऱ्या या आंब्याची आठवण, त्याची उपस्थिती सदैव आपल्या पानांत दिसावी म्हणून कितीही प्रयत्न केले, तो पुढच्या वर्षी नक्की घरी येणार याची खात्री असते. तरी निरोपाची घटिका मनाला हुरहुर लावतेच ना!

suchitrasathe52@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vasturang article by suchitra sathe

ताज्या बातम्या