माणुसकीचा ओलावा जपणारं घर

बालपण गिरणगावात गेलेल्या त्या जेष्ठ अभिनेत्याचं जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेण्याआगोदर या वास्तूमध्ये वास्तव्य होतं.

यशाची शिखरे काबीज करताना यशस्वी अष्टपलू अभिनयपटू विजयदादा यांच्यामधला पडद्यामागच्या कलाकारांशी, श्रमिकांशी आस्था, आपुलकीने वागत माणुसकीचं नातं जोडणारा माणूस शेवटपर्यंत कायम राहिला आणि आपल्या घराशीही जोडत राहिला. ते राहत असलेल्या रामचंद्र भुवन या वास्तूच्या माणुसकीची परंपरा वैशिष्टय़े त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली.

बालपण गिरणगावात गेलेल्या त्या जेष्ठ अभिनेत्याचं जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेण्याआगोदर या वास्तूमध्ये वास्तव्य होतं. सुमारे चाळीस वर्षे मराठी रंगभूमी आणि चित्रपट, मालिका यांत सहज सुंदर अभिनयाने  स्वत:चं स्थान निर्माण करणारे आणि विविध पुरस्कारांनी गौरविले गेलेले- आणि याच पुरस्कारांमुळे त्या वास्तूला सौंदर्य आणणारे विजय चव्हाण यांचे वास्तव्य असलेले ते आगळे घर.

रजनी अशोक देवधर

घरं असतात घरांसारखी

चार भिंती वर छप्पर

काही साधी ओबडधोबड

काही देखणी सुंदर

काही घरांचे दरवाजे बंद

मिटून घेतात स्वत:ला घट्ट

काही घरांचे सताड उघडे

माणसांना बोलावतात ‘या इकडे’

घरा घरांच्या किमती बाजारमूल्य वेगळे

काही घरांतील माणसांनी जपलेले मूल्य आगळे..

सन  १९३५. मुलुंड हे मुंबईचे शांत, तुरळक वस्तीचे उपनगर. अंतरा अंतरावर एखाद्दुसरी घरे, वाडय़ा. ‘रामचंद्र भुवन’ ही मुलुंड येथील वास्तू सुमारे ८५ वर्षांपूर्वीची. लहान वयात कोकणातून मध्यप्रदेश, नागपूर, मुंबई अशी पोटासाठी भटकंती करताना बाळकृष्ण रामचंद्र जोशी यांनी मुंबईच्या मुलुंड या उपनगरात १९३५ साली बांधलेले  टुमदार कौलारू घर. अंगणात पेरू, शेवगा, बेलफळ, राय आवळे, कढीलिंब, कण्हेर, तगर अशी झाडे. मागे तुळशी वृंदावन, कडेला गायीचा गोठा आणि पाण्याची भली मोठी विहीर. घरात पिण्याच्या पाण्याचा नळ आल्यावर ती विहीर म्हणजे आमच्यासाठी स्विमिंग पूल झाली. पट्टीचे पोहणारे शिकाऊ उमेदवारांच्या कमरेला नारळांची सुकड बांधून त्या विहिरीत सोडत आणि पोहायला शिकवत. मुलुंडमध्ये ते घर कोकणातल्यासारखंच होतं. तुरळक वस्ती असलेल्या मुंबईच्या उपनगरात तेव्हा अंगण असलेली कौलारू घरं, वाडय़ा, आणि बठय़ा चाळी असायच्या.  पाण्यासाठी विहीर, आणि आजूबाजूला  लावलेली झाडं.. हे सारं काहीसं रामचंद्र भुवन येथे होतं. मात्र ते घर इतर घरांहून वेगळं होतं. तिथे नव्हती फक्त कुटुंबापुरती मर्यादित परीघ आखून नाती. मी आणि माझे असा संकुचितपणाचा लवलेशही तिथे नव्हता आणि आजही नाही.  तिथे माणसांचा अखंड राबता. अडीअडचणीत सापडलेल्यांना मदत करणं, त्यांचे प्रश्न सोडविणं,  माणुसकीचं नातं जोडणं.. ही तिथली काही वैशिष्टय़े.  काळाच्या ओघात त्या कौलारू वास्तूनं कात टाकली आणि तिचं पाच मजली इमारतीत रूपांतर झालं.  त्या इमारतीतल्या एका घरात असंख्य माणसांना माणुसकीच्या नात्याने जोडलेला, रंगभूमीवर  निखळ विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अवलिया राहत होता. बालपण  गिरणगावात गेलेल्या त्या जेष्ठ अभिनेत्याचं जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेण्याआगोदर या वास्तूमध्ये वास्तव्य  होतं. सुमारे चाळीस वर्षे मराठी रंगभूमी आणि चित्रपट, मालिका यांत सहज सुंदर अभिनयाने  स्वत:चं स्थान निर्माण करणारे आणि विविध पुरस्कारांनी गौरविले गेलेले- आणि याच पुरस्कारांमुळे त्या वास्तूला सौंदर्य आणणारे विजय चव्हाण यांचे वास्तव्य असलेले ते आगळे घर.

चित्रपट क्षेत्रात प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम पुरस्कार, अखिल भारतीय मराठी महामंडळाचे पुरस्कार, राजीव गांधी अवॉर्ड, दादा कोंडके पुरस्कार.. असे अनेक पुरस्कार त्यांच्या घरातील दिवाणखान्यात कलात्मक रीतीने ठेवलेले आहेत.  विविध पुरस्कारांनी सजवलेला देखणा प्रशस्त दिवाणखाना त्यांच्या  मोठय़ा मनाची, दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देतो.

दैनंदिन आयुष्यातील तोचतोचपणा, रोजचे तेच आणि तसेच प्रश्न, घडय़ाळाच्या काटय़ाबरोबर स्वत:ला बांधून घेत धावणे, शरीर दमविणारा आणि मन आंबविणारा रोजचा प्रवास, खच्चून भरलेल्या गाडीत, बसमध्ये चढणे, उतरणे, गर्दी, ट्रॅफिक, त्याचबरोबर घरातील लहान मुलं आणि वृद्ध यांची देखभाल करताना येणाऱ्या अडचणी सोडवत पोटासाठी धावणे  हे आणि  असेच काहीसे सामान्यांचे, चाकरमान्यांचे दैनंदिन जीवन. काहीसे कंटाळवाणे. ते मरगळलेलेपण सारे विसरायला लावून नाटक या माध्यमातून आपल्या अभिनयसामर्थ्यांवर प्रेक्षकांना हसायला लावलं विजयदादांनी. त्यांनी साकारलेली ‘मोरूची मावशी’ प्रेक्षकांच्या पसंतीची पावती घेत २००० प्रयोगांचे रेकॉर्ड करते. आणि विजयदादा यांची वाटचाल रंगमंचाबरोबरच लहान-मोठा पडदा , मालिका यांत अविरत सुरू राहते. झपाटलेला, पछाडलेला, कशात काय लफडय़ात पाय, टूरटूर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, हयवदन, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची गाजलेली नाटकं. जत्रा, छकुला, आली लहर केला कहर आदी सिनेमे यातून त्यांनी काम करत अभिनयाची शैली निर्माण केली. गेली काही वर्षे प्रकृती साथ देत नव्हती. हातात घेतलेलं काम पूर्ण करायचंच या ध्यासाने त्यांनी श्रीमंत दामोदर पंतच्या शूटिंगच्या वेळी फुप्फुसाच्या आजाराने बेजार असतानाही ऑक्सिजन वापरायला लागत असला तरी काम केलं. यशाची शिखरे काबीज करताना यशस्वी अष्टपलू अभिनयपटू विजयदादा यांच्यामधला पडद्यामागच्या कलाकारांशी श्रमिकांशी आस्था, आपुलकीने वागत माणुसकीचं नातं जोडणारा माणूस शेवटपर्यंत कायम राहिला आणि आपल्या घराशीही जोडत राहिला. ते राहत असलेल्या रामचंद्र भुवन या वास्तूच्या माणुसकीची परंपरा वैशिष्टय़े त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली, असेच म्हणायला लागेल. रंजल्यागांजल्यांचे अश्रू पुसणे हा जसा माणुसकीचा पलू, तसाच विनोदनिर्मितीने माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत आनंद निर्माण करणे हाही माणुसकीचा आविष्कार. बाळकृष्ण जोशी यांच्या या वास्तूमध्ये पुत्र, सुप्रसिद्ध झुंजार कामगार नेते मधू जोशी यांच्या कुटुंबाची धुरा सांभाळणारी त्यांची सहधर्मचारिणी वसुंधरा मधुकर जोशी यांचे  वास्तव्य आहे.. कामगारांचे प्रश्न सोडविणे, माणुसकीच्या नात्याने मदत करणे, हाती घेतलेल्या कामात झोकून देणे  हे ब्रीद असलेले कामगार नेते मधुकर जोशी आणि माणसांच्या चेहऱ्यावर खळखळून हसू फुलविणारे श्रेष्ठ अभिनेता विजय चव्हाण जावई यांची घरे, या दोघांचे वास्तव्य हे या वास्तूचं सौभाग्यच!

deodharrajani@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vijay chavan house