वेल्डिंग ही बांधकाम, फॅब्रिकेशन, देखभाल आणि दुरुस्ती कामांतील एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. उद्योग, व्यावसायिक इमारती, पायाभूत सुविधा आणि निवासी प्रकल्पांमध्ये वेल्डिंगचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र अग्निसुरक्षेच्या दृष्टीने वेल्डिंग ही अत्यंत धोकादायक प्रक्रिया आहे. कारण यामध्ये अतिशय उच्च तापमान, उच्च ( high value) विद्युत प्रवाह (current), वितळलेले धातू आणि ठिणगी (sparking) यांचा एकत्रित प्रभाव असतो. योग्य खबरदारी न घेतल्यास वेल्डिंग सहजपणे गंभीर विद्युत आगीचा स्रोत बनू शकते.
वेल्डिंगचा विद्युत आगीशी थेट संबंध आहे, कारण वेल्डिंगदरम्यान वेल्डिंग केबल्स, इलेक्ट्रोड आणि अर्थिंग यातून अतिशय उच्च विद्युत प्रवाह (current) वाहतो. वेल्डिंग आर्कचे तापमान काही हजार अंश सेल्सिअसपर्यंत जाते, जे बहुतेक कुठलेही ज्वलनशील पदार्थ तत्क्षणी पेटवू शकते. वेल्डिंग करताना वितळलेल्या धातूचे थेंब आणि ठिणगी (sparking) अनेक मीटर अंतरापर्यंत उडतात. हे गरम कण बराच काळ तप्त (glowing contact) स्थितीत राहू शकतात आणि वेल्डिंगच्या ठिकाणापासून दूर असलेल्या वस्तूंनाही आग लावू शकतात.
वेल्डिंगशी संबंधित एक अत्यंत धोकादायक आणि दुर्दैवाने खूप सामान्य परिस्थिती म्हणजे विद्युत शाफ्टमध्ये किंवा त्याच्या जवळ वेल्डिंग करणे. विद्युत शाफ्टमध्ये प्रामुख्याने राइजिंग मेन, फीडर केबल्स, मीटर वायरिंग, पॅनेल्स आणि केबल्स असतात. शाफ्टच्या उघड्या भागाजवळ वेल्डिंग केल्यास गुरुत्वाकर्षणामुळे ठिणगी आणि वितळलेले धातूचे कण खाली पडतात. हे गरम कण थेट केबल्स, मीटर बोर्ड, वितरण पॅनेल्स किंवा शाफ्टमध्ये साचलेल्या धुळीवर पडू शकतात. शाफ्ट चिमणीसारखे वागत असल्यामुळे आग वेगाने उभ्या दिशेने पसरते आणि अनेक मजल्यांवर परिणाम होतो. वरच्या मजल्यावर वेल्डिंग चालू असताना, कोणतीही दृश्य लक्षणे (visible signs) न दिसता खालच्या मजल्यावरील मीटर रूम किंवा पॅनेलमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
विद्युत पॅनेल्स, केबल ट्रे आणि स्विचगिअरजवळ वेल्डिंग करणे हा आणखी एक मोठा धोका आहे. पॅनेलमधील वायुवीजन छिद्रे, ग्लँड प्लेट्स किंवा केबल एन्ट्री पॉईंट्समधून ठिणगी आत जाऊ शकते. पॅनेलच्या आत असलेले वायर इन्सुलेशन, प्लास्टिक घटक, धूळ आणि साचलेला कचरा सहज पेट घेतो. एकदा पॅनेलला आग लागली की उच्च फॉल्ट एनर्जी आणि सततचा वीजपुरवठा यामुळे आग झपाट्याने वाढते.
वेल्डिंग केबल्स आणि अर्थिंग (earthing) यांची भूमिका अग्निसुरक्षेत अत्यंत महत्त्वाची आहे. अयोग्य अर्थिंग किंवा वेल्डिंग मशीनचे चुकीचे सायझिंग झाल्यास वेल्डिंगचा विद्युत प्रवाह (current) संरचनात्मक स्टील, केबल ट्रे, पाइपलाईन किंवा RCC रॉड्समधून पर्यायी मार्ग शोधतो. या अनपेक्षित मार्गांवर जोड (joint) आणि संपर्क बिंदूंवर स्थानिक (localized) तापमान वाढते. ही उष्णता सहसा लक्षात येत नाही आणि नंतर आग लागते. जर अर्थिंग वायर (wires) किंवा रिटर्न केबल कमी क्षमतेची किंवा जोडणी सैल (loose connection) असेल, तर ती गरम होऊन इन्सुलेशन वितळते आणि केबल स्वतः जळू शकते.
वेल्डिंग मशीनला वीजपुरवठा करणारे स्विचगिअर योग्य रेटिंगचे असणे आवश्यक आहे. वेल्डिंग मशीन उच्च स्टार्टिंग आणि ऑपरेटिंग विद्युत प्रवाह (current) घेतात. जर MCB, केबल्स, प्लग किंवा सॉकेट्स कमी रेटिंगचे असतील किंवा बायपास केलेले असतील, तर ओव्हरलोडिंग आणि ओव्हरहिटिंग होते. पॅनेलमधून थेट, कोणत्याही संरक्षणाशिवाय घेतलेल्या तात्पुरत्या वेल्डिंग जोडण्या अत्यंत धोकादायक ठरतात.
यांत्रिक बाबीदेखील वेल्डिंगमुळे होणाऱ्या आगीत कारणीभूत ठरतात. दीर्घकाळ वेल्डिंग केल्याने वेल्डिंग टॉर्च, होल्डर आणि केबल्स गरम होतात. हे जर ज्वलनशील पदार्थांच्या संपर्कात आले तर आग लागते. खराब दर्जाच्या वेल्डिंग केबल्समध्ये इन्सुलेशन खराब असल्यास, विद्युत भारावर (on electric load) असताना ठिणगी (sparking) किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकते.
ज्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ असतात त्या ठिकाणी वेल्डिंग करणे अत्यंत धोकादायक आहे. सॉल्व्हेंट्स, पेंट्स, थिनर्स, तेल, वायू, इन्सुलेशन साहित्य, थर्माकोल, पॅकेजिंग मटेरियल, लाकडी संरचना आणि धूळ हे सर्व वेल्डिंगच्या ठिणगीमुळे तत्क्षणी पेट घेऊ शकतात. हे पदार्थ जरी दिसत नसले तरी ते फॉल्स सीलिंग, डक्ट्स, शाफ्ट किंवा क्लॅडिंगच्या मागे असू शकतात. अनेक वेळा वेल्डिंग संपल्यानंतर काही तासांनी धुरकट जळण (smouldering) होऊन आग लागते.
जगभरातील अनेक मोठ्या आगी वेल्डिंग किंवा हॉट वर्कमुळे झालेल्या आहेत. फ्रान्समधील नोट्र-डेम कॅथेड्रलला लागलेली आग दुरुस्ती कामादरम्यान वेल्डिंग किंवा विद्युत देखभालीमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला गेला. अमेरिकेतील USS Bonhomme Richard या नौदल जहाजावर देखभाल कामादरम्यान वेल्डिंगमुळे मोठी आग लागून संपूर्ण जहाज नष्ट झाले. युरोप, आशिया आणि अमेरिकेतील अनेक वेअरहाऊस व शिपयार्ड आगीत वेल्डिंग ठिणगीमुळे केबल ट्रे, इन्सुलेशन किंवा साठवलेला माल पेटल्याचे आढळले आहे. भारतातही पुणे येथे लस उत्पादन कारखान्यात वेल्डिंगमुळे मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
वेल्डिंगमुळे होणाऱ्या आगी गंभीर होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे योग्य अग्नीसुरक्षा व लक्ष नसणे. ठिणगीमुळे पेटलेले साहित्य सुरुवातीला हळूहळू जळते. वेल्डिंग थांबल्यानंतर काही मिनिटांपासून काही तासांनंतरही आग लागू शकते. वेल्डिंगनंतर तपासणी आणि निरीक्षण न केल्यास अशा उशिरा लागणाऱ्या आगी लक्षात येत नाहीत.
सुरक्षित वेल्डिंगसाठी कठोर नियम व शिस्त आवश्यक आहे. विद्युत शाफ्ट, पॅनेल किंवा मीटर रूमजवळ पूर्ण अलगता, अग्निरोधक शिल्डिंग आणि देखरेखीशिवाय वेल्डिंग करू नये. सर्व ज्वलनशील पदार्थ दूर करावेत किंवा संरक्षित करावेत. वेल्डिंग ठिकाणी ‘अग्निशामक यंत्र’ ठेवणे आवश्यक आहे. योग्य अर्थिंग (earthing), योग्य केबल सायझिंग, मजबूत यांत्रिक पकड (firm mechanical grip) असलेले जोड आणि योग्य स्विचगिअर संरक्षण अत्यावश्यक आहे. हॉट वर्क परमिट सिस्टीम, प्रशिक्षित कर्मचारी, अग्निशामक साधने आणि वेल्डिंगनंतर निरीक्षण हे पर्याय नसून गरज आहे.
वेल्डिंग ही केवळ बांधकाम प्रक्रिया नाही; ती एक उच्च-धोका असलेली विद्युत प्रक्रिया आहे. तिच्याकडे हलक्याफुलक्या दृष्टीने पाहिल्यास काही ठिणगी भीषण आगीत रूपांतरित होऊ शकतात.
पुढील लेखात आपण ओव्हरलोडेड पॅनेल्स आणि वितरण फलकांमुळे कशी आग लागते आणि अनियंत्रित विद्युत भारवाढ कशी गंभीर धोका निर्माण करते यावर चर्चा करू. आज दुर्लक्षित केलेली एखादी ठिणगी उद्याची मोठी दुर्घटना ठरू शकते.
ajitnkulkarni@yahoo.com
(लेखक वीजविषयक सल्लागार आहेत.)
