X

पुन्हा सीरिया..

रशिया व इराण तेथे अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या हिताला बाधक ठरेल..

इस्लामिक स्टेटचा रेटा, असादविरोधी गट, खुद्द असाद यांची राजवट आणि बाह्य़ हस्तक्षेप बघता सीरियातील गुंतागुंत सहज सुटणार नाही. असाद यांची राजवट संपेपर्यंत तेथील लढा चालू राहील हे निश्चित. तसेच रशिया व इराण तेथे अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या हिताला बाधक ठरेल..

इस्लामिक स्टेटच्या वाढत्या दहशतवादी कारवायांनंतर आज जगाचे लक्ष पुन्हा एकदा सीरियावर केंद्रित झालेले दिसून येते. इस्लामिक स्टेटची सुरुवात २००३ च्या इराक युद्धानंतरच्या काळात झाली होती. त्या वेळी ज्याला इराकमधील अल् कायदा म्हणून ओळखले जात होते, त्या गटाचे नेते झरकावी जे बिन लादेनशी निष्ठा ठेवून होते, २००६ मध्ये मारले गेले. पुढे इराकमधील सुन्नी गटांनी अमेरिकेच्या बरोबरीने या गटाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अबु बक्र अल् बगदादीच्या नेतृत्वात हा गट नव्या दमाने पुढे आला. २०११ मध्ये सीरियात असाद सरकारविरुद्ध बंड सुरू झाले तेव्हा बगदादी यांनी त्याचा फायदा घेऊन आपल्या गटाला नवीन स्वरूप दिले. आता हा गट इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया (करकर) म्हणून पुढे आला. सीरियातील या तळाचा फायदा घेऊन आयसिसने आपले भौगोलिक क्षेत्र वाढविण्यास सुरुवात केली. आज आयसिसचा मुख्य तळ हा सीरियात आहे, जेथून त्याच्या लढय़ाचे बरेचसे नियोजन केले जाते. सीरियातील पसरत चाललेल्या नागरी युद्धाचा जसा आयसिस फायदा घेत आहे तसेच तेथील अस्थिरतेला रशिया, अमेरिका, इराण, सौदी अरेबियासारखी राष्ट्रेदेखील जबाबदार आहेत. आता पॅरिसवरील हल्ल्यानंतर फ्रान्सने सीरियास्थित आयसिसविरुद्ध एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.

सीरिया

आजच्या पश्चिम आशियाई राजकारणात सीरियातील घडामोडी या एका पातळीवर निर्णायक ठरणार आहेत. सीरियात आज असाद यांचे सरकार कमकुवत झाले आहे. सीरियाच्या एकूण प्रदेशाच्या सुमारे २५ टक्के क्षेत्रावर त्यांची सत्ता आहे, त्यात दमास्कस, होम्स, हामा व भूमध्य सागराच्या किनारपट्टीच्या भागाचा समावेश होतो. सीरियाच्या बाकी क्षेत्रावर कुर्द, इस्लामिक स्टेट व असादविरोधी गटांचा ताबा आहे. या देशातील अंतर्गत विस्थापितांची टक्केवारी ही त्याच्या लोकसंख्येच्या २० ते २५ टक्के आहे. याव्यतिरिक्त लेबेनॉन, तुर्कस्तान, जॉर्डन आणि इराकमध्ये प्रचंड प्रमाणात निर्वासित आहेत. युरोपमध्ये निर्वासित म्हणून जाणारे मुख्यत या देशांतूनच जात आहेत आणि म्हणूनच प्रश्न विचारला जातो.. सीरियामध्ये पुन्हा एकदा पूर्वीसारखी सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे का?

सीरियातील असाद सरकारला आज रशिया, इराण व हेझबुल्लाह यांचा पािठबा आहे. त्याविरोधात लढणाऱ्या इस्लामिक तसेच ‘सेक्युलर’ म्हणविणाऱ्या गटांना पश्चिम आशियाई राजवटी तसेच अमेरिकेचा पािठबा आहे. अमेरिकेच्या मते असाद हे सीरियाच्या समस्येचे मूळ आहे, त्यांची राजवट संपल्याशिवाय तेथील समस्या सुटू शकणार नाही. रशियाच्या मते असाद सरकार कमकुवत झाले, तर तिथे मूलतत्त्ववादी इस्लामिक गटांचे वर्चस्व निर्माण होईल. जे इथल्या व्यवस्थेला तसेच रशियाला घातक ठरू शकते. रशियाच्या दक्षिणेकडील प्रदेशात इस्लामिक मूलतत्त्ववाद वाढत आहे. रशियाने चेचन्यामध्ये इस्लामिक दहशतवाद्यांविरुद्ध दोन लढाया केल्या आहेत. दागेस्तानमध्ये इस्लामिक मूलतत्त्ववाद पसरत आहे. रशियाच्या मते इस्लामिक स्टेटने किमान दोन हजार रशियन, जे वेगवेगळ्या वांशिक गटांचे असतील, लढवय्ये म्हणून तयार केले आहेत. हे रशियाच्या अंतर्गत व्यवस्थेत दहशतवाद पसरवू शकतात. त्याचबरोबर सीरियाच्या भूमध्य सागरावरील बंदरांचा जो वापर रशिया करीत आहे, त्याला धक्का लागू नये ही रशियाची गरज आहे. दमास्कसमध्ये असाद सरकार जाऊन जर इस्लामिक मूलतत्त्ववादी गट सत्तेवर आले तर रशियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे पुतिन जाणून आहेत. इस्लामिक स्टेटविरोधात जर संयुक्त आघाडी निर्माण करायची असेल, तर त्यात असाद सरकार तसेच इराण व रशियाचा सहभाग असणे गरजेचे आहे. इस्लामिक स्टेटविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेऊन रशियाने एक प्रकारे अमेरिका व नाटोसमोर अडचण निर्माण केली आहे. इस्लामिक स्टेटविरुद्ध लढा देताना आज फ्रान्सला नाटोचा पािठबा अभिप्रेत असणार आहे, त्यात मुख्यत: अमेरिकेचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. नाटोला या कार्यात रशियाबरोबर कारवाई करावी लागणार आहे. रशियाने सुरुवातीला इस्लामिक स्टेटविरोधात हवाईहल्ले करणार असल्याचे जाहीर केले, तेव्हा त्याचे स्वागत करावे की नाही याबाबत संभ्रम होता. रशियाचे सुरुवातीचे हल्ले हे केवळ इस्लामिक स्टेटच्या तळांविरुद्ध नव्हते तर ते असादविरोधी गटांच्या तळावरदेखील केले गेले. रशियाच्या कृतीबाबतची विश्वासार्हताही यामुळे अडचणीत येत होती.

इराण

सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या बठकीदरम्यान ओबामा व पुतिन यांचे सीरियाबाबतचे भिन्ना दृष्टिकोन पुढे आले होते, परंतु त्यानंतर अमेरिकेने आपल्या भूमिकेत थोडा बदल केला. सीरियाच्या समस्येबाबत जेव्हा कोफी अन्नान यांनी मध्यस्थी केली होती तेव्हा त्यांनी चच्रेसाठी सर्व राष्ट्रांचा सहभाग असण्यावर भर दिला होता. त्यात मुख्यत: रशिया व इराणच्या समावेशाबाबत ते आग्रही होते. आज ओबामा व्यवस्थापित संक्रमणा(ेंल्लंॠी ि३१ंल्ल२्र३्रल्ल) बाबत बोलत आहेत. या संदर्भात ज्या राष्ट्रांच्या सहभागाची अपेक्षा आहे त्यात अमेरिका, रशिया, इराण, सौदी अरेबिया, कतार, तुर्कस्तान आणि युरोपीय राष्ट्र असणार आहेत. सीरियातील कारवाईसंदर्भात इराणबद्दल नेहमीच वाद होता. इराणचे असाद राजवटीशी असलेले जवळचे संबंध, येमेनमधील नागरी युद्धात हौथी गटाला असलेला पािठबा, इराकवर वाढत चाललेले प्रभुत्व, हेझबुल्लाहला दिलेला पािठबा यामुळे इराणबाबत अमेरिकेत, इस्रायल तसेच सौदी अरेबियात राग होता. मध्यंतरीच्या काळात अमेरिकेने इराणशी संवाद सुरू केला आणि इराणच्या आण्विक धोरणांच्या संदर्भातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने अमेरिका व इतर आण्विक राष्ट्र व इराणदरम्यान समझोता झाला. त्यानंतर इराणच्या मध्य आशियाई राजकारणातील प्रवेशाची दारे उघडली गेली. इराणचे या क्षेत्रातील महत्त्व हे आता उघडपणे मान्य केले जाऊ लागले आहे. सीरियन समस्येच्या चच्रेत इराणचा समावेश हा आवश्यक होता त्याला आता अधिमान्यता मिळाली.

सीरियातील कारवाईत इराणला सहभागी करण्यासाठी रशिया बरीच मदत करीत असल्याचे वृत्त आहे. तेहरान आणि सीरियातील लताकिया क्षेत्र, ज्याचा वापर रशिया हवाई दळणवळणासाठी करीत आहे यादरम्यान हवाई वाहतूक होत असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर इराणने इस्लामिक क्रांतीचे लढवय्ये सीरियात पाठविल्याचे बोलले जाते, अर्थात इराणच्या सन्याने येथे हस्तक्षेप केल्याचे दिसत नाही.

आज इराण, रशिया, हेझबुल्लाहव्यतिरिक्त इतर राष्ट्रांची किंवा गटांची भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे. या क्षेत्रातील कुर्दवांशिक गट जो सीरिया, इराक व तुर्कस्तानमध्ये आहे, तो एका वेगळ्या पातळीवर लढताना दिसून येतो. एकीकडे त्याला स्वातंत्र्याची स्वप्ने दिसत आहेत तर दुसरीकडे ते इस्लामिक स्टेटविरुद्ध खऱ्या अर्थाने लढत आहेत. तुर्कस्तान असादविरोधात उभा आहे, इस्लामिक स्टेटविरोधात लढायला तयार आहे; परंतु तसे केल्याने कुर्द गटाची समस्या निर्माण होईल हे तो जाणतो. सौदी अरेबिया व कतार मात्र असादविरोधात लढत आहेत. अमेरिका असादविरुद्धच्या लढय़ाला पािठबा देत आहे; परंतु प्रत्यक्षात लष्करी बळाचा वापर करताना हात राखताना दिसून येत आहे. इस्लामिक स्टेटचा रेटा, असादविरोधी गट, खुद्द असाद यांची राजवट आणि बाह्य़ हस्तक्षेप बघता सीरियातील गुंतागुंत सहज सुटणार नाही हे निश्चित. असाद यांची राजवट संपेपर्यंत हा लढा चालू राहील हे निश्चित. तसेच रशिया व इराण अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या राष्ट्रहिताला बाधक ठरेल. म्हणूनच इथे राजनयाचा वापर करून व्यवस्थापित संक्रमण साध्य करावे लागेल.

लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संरक्षण व सामरिक शास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.

त्यांचा ई-मेल

shrikantparanjpe@hotmail.com

  • Tags: terrorism,