एकदा कपाट आवरायला घेतलं तेव्हा अचानक एक छोटी पेटी हाती आली. उघडली तर आत चॉकलेटच्या अनेक चांद्या होत्या. लहानपणी त्या जिवापाड जपलेल्या.. आता कचरा म्हणून क्षणार्धात फेकून दिल्या! मग वाटलं आज आपण जिवापाड ज्या गोष्टी जपतो आहोत त्यांचं खरं मोल आपल्याला तरी कळतं का? अंतरंगात आसक्तीचा आणि आसक्तीपायी किती कचरा साठला आहे, तो जाणवतो का?

आध्यात्मिक ज्ञान काय केवळ कुणा ज्ञानी माणसाच्या बोलण्यातूनच मिळतं का हो? केवळ पुस्तकं वाचूनच मिळतं का? नाही. जर डोळे आणि कान नीट उघडे असतील तर अवतीभवतीची सृष्टीही खूप काही सहज शिकवत असते. आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या अनोळखी माणसांच्या बोलण्यातूनही खूप काही गवसत असतं. अगदी तद्दन मनोरंजक वाटणारं एखादं नाटक किंवा चित्रपटही आध्यात्मिक जाणिवेचा संस्कार नकळत करून जातो. जर आपल्या मनात आध्यात्मिक चिंतनाची ओढ असली तर अशा नित्य घडणाऱ्या या गोष्टी संस्कारांचं वेगळंच बीज रुजवून जातात..

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा

मागे हॉटेलातल्या मुलांची गोष्ट सांगितली होतीच ना? सुट्टीचा एक दिवस हा हॉटेलातल्या या मुलांचा आनंदाचा आणि कधी कधी उधळपट्टीचा दिवस असायचा. काही वेळा त्यांच्या आनंदात आणि उधळपट्टीत मीही सहभागी व्हायचो. ‘गजनी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाची गोष्ट. काही मुलांनी चित्रपटाला जायचा बेत परस्पर ठरवला आणि माझंही तिकीट काढलं. जाणं भागच होतं. अर्थात मलाही चित्रपट, नाटकं पाहायला आवडतातच. तर चित्रपट पाहून हॉटेलामध्ये परतलो, तर आणखी काही मुलांनी त्याच चित्रपटाची संध्याकाळची तिकिटं काढली होती आणि त्यात मलाही गृहीत धरलं होतं! आता ‘गजनी’सारखा चित्रपट एकाच दिवसात दोनदा पाहायचा म्हणजे जरा अवघडच होतं. पण मुलं ऐकेनात! ‘त्यांच्याबरोबर तेवढे तुम्ही सिनेमाला गेलात आणि आम्हाला नाही कसं म्हणता,’ असा त्यांचा युक्तिवाद होता. अखेर जाणं भागच झालं. मग मीही मनाशी ठरवलं की जणू प्रथमच हा चित्रपट आपण पाहात आहोत, असंच मानायचं आणि नव्या नजरेनं चित्रपट पाहायचा.. आणि खरंच या मुलांमुळे एकाच दिवसात दुसऱ्यांदा पाहावा लागलेला हा चित्रपट मला आधीपेक्षा अगदी वेगळा दिसला! चित्रपटाची कथा तर सगळ्यांनाच माहीत आहे. संजय हा उद्योजक कल्पना या संवेदनाक्षम पण अवखळ  तरुणीच्या प्रेमात पडलेला असतो. तिची हत्या होते तेव्हा तिला वाचविताना झालेल्या भीषण मारहाणीत त्याला अशी व्याधी जडते की दर पंधरा मिनिटांनी तो आपण कोण आहोत, हेच विसरू लागतो. आपल्या प्रेयसीच्या मारेकऱ्यांचा बदला घ्यायचा, हे त्याच्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट झालेलं असतं. त्या उद्दिष्टाचं स्मरण विस्मृतीच्या किंवा अल्पकालीन स्मरणाच्या या रोगामुळे लोपू नये म्हणून त्यानं भिंतीवर तिची अनेक छायाचित्रं चिकटवलेली असतात. स्वत:च्या शरीरावरही अनेक नोंदी गोंदवून ठेवलेल्या असतात.. भिंतीवर चिकटवलेली अनेक छायाचित्रं, वाक्यं आणि स्वत:च्या शरीरावर गोंदवलेले ते टॅटू यांचा आधार घेत तो आपल्या जीवन उद्दिष्टाचं स्मरण टिकवायची धडपड करायचा.

मलाही जाणवलं माणसाला तर हाच अल्पमुदतीच्या स्मरणाचा रोग जन्मापासून जडला आहे! आपण कशासाठी नेमकं जन्मलो, हेच माणसाला कळेनासं झालं आहे. कारण माहीत नसलं तरी आपण अखंड टिकणाऱ्या आनंदाच्या प्राप्तीसाठीच जन्मलो आहोत, हे आपल्या प्रत्येक कृतीतूनही जाणवतंच ना? कारण आपली प्रत्येक कृती ही केवळ आपल्याला आनंद मिळावा, सुख मिळावं याच हेतूनं तर असते. हा आनंद परम तत्त्वाच्या आधारावर मिळतो, असं संत सांगतात आणि म्हणूनच विविध साधना मार्गापैकी आपल्याला जवळच्या भासणाऱ्या मार्गानं हा आनंद मिळवण्याचा प्रयत्नही आपण करीत असतो. मात्र असं असलं तरी आपल्याला मध्येच या उद्दिष्टाचा विसर पडतो. आपल्याच मनोवेगांनुसार जगत आपण कधी स्वत:च स्वत:ला दुखावतो कधी दुसऱ्याच्या दु:खाचं कारण बनतो. तेव्हा जीवनाच्या मूळ हेतूचं स्मरण राहावं म्हणूनच तर आपणही त्या ‘गजनी’तल्या नायकाप्रमाणे देवीदेवतांची किंवा सत्पुरुषाची चित्रं भिंतीवर टांगली आहेत! बोधवचनं डोळ्यांसमोर ठेवलेली आहेत. ही चित्रं, ही बोधवचनं पाहून आणि वाचून मध्येच आपल्याला थोडी जाग येते.

कृष्णाच्या आई या फार मोठय़ा साधक आहेत. त्यांना तर अवतीभवतीच्या प्रत्येक गोष्टीतून आध्यात्मिक बोधच जाणवतो. मागे मी सांगितलंच आहे. एकदा त्यांच्याकडे गेलो होतो तर घरात एक मांजर होती. बरं तीही धष्टपुष्ट नव्हती तर अगदी मरतुकडी होती. पण सारखी येऊन माझ्या मांडीवर उडी मारून बसे आणि बोलण्यात व्यत्यय आणत असे. तिला उचलून खाली ठेवताना मनात आलं की, ही नसती तर किती बरं झालं असतं! माझ्या मनात हे येताच कृष्णाच्या आई हसून म्हणाल्या, ‘‘घरात खूप उंदीर झालेत. आता ही मांजर तुम्ही पाहताय ना कशी आहे? तिच्यात म्हणावं तर शक्तीही नाही. तरी तिच्या नुसत्या क्षीण स्वरातल्या ‘म्यांव’नं बलिष्ठ उंदीरसुद्धा दबून राहतात. तशी उपासना हवी. भले ती या मांजरासारखी तोडकीमोडकी का असेना, पण तेवढय़ानंही विकारांचे उंदीर दबून राहतील!’’

सद्गुरूंचं जेव्हा दर्शन झालं नव्हतं तेव्हा आजूबाजूच्या जगाकडूनही असा आध्यात्मिक बोध कसा ग्रहण करायचा, हे भाऊ घरत यांनीच प्रथम शिकवलं. मग अवतीभवती वावरणारी परिचित-अपरिचित माणसं, त्यांचं बोलणं, पाहिले जाणारे चित्रपट, नाटकं, वाचनात येणारी पण आध्यात्मिक नसलेली पुस्तकं या साऱ्यातून आध्यात्मिक ज्ञानच गवसू लागलं. मग मला एकदम आठवलं की अरे या निर्जीव वस्तूंमध्ये किती कहाण्या दडल्या आहेत हे प्रथम आपल्या लहानग्या पुतण्या आणि पुतणीनंच तर आपल्याला जाणवून दिलं आहे! त्याचं असं झालं, दोघं लहान होते तेव्हा रोज त्यांना नव्या नव्या गोष्टी सांगाव्या लागत. सर्व छापील गोष्टी संपल्यावर त्यांनीच हट्ट धरला की, ‘‘काका आता न ऐकलेल्या गोष्टी सांग.. हवं तर तूच तयार करून सांग.’’ मग असं होऊ  लागलं की खोलीतल्या एकेका वस्तूकडे त्यांनी लक्ष वेधावं आणि ‘याची गोष्ट सांग,’ असं म्हणावं! मग उत्स्फूर्तपणे गोष्टी जन्माला यायच्या. कधी पंख्याची गोष्ट गिरक्या घेत अवतरायची, कधी टय़ूबलाइटची गोष्ट प्रकाशमान व्हायची, कधी खिडकी आणि तिच्या पडद्याची गोष्ट डोकावून जायची, कधी दरवाजाची गोष्ट धडका देत उघडायची, कधी दोन पानांच्या ‘छत्री’सकट घरात आलेल्या पेरूची चविष्ट गोट पिकायची! खोलीतल्या आणि घरातल्या सर्व वस्तू संपेपर्यंत हा ‘कथासरित्सागर’ पसरला होता! ती सवय मग मला अध्यात्मातही साथ देऊ  लागली. अवतीभवतीची प्रत्येक गोष्ट अनेक जीवनसत्यं उघड करू लागली.

एकदा वीज गेली आणि पंखा फिरायचा थांबला. उकाडय़ानं जीव हैराण झाला. घामाच्या धारा सुरू झाल्या. थोडय़ा वेळानं वीज आली आणि पंखा गरगरा फिरू लागला. सुखद हवा येऊ लागली आणि जिवात जीव आला. तीन पात्यांच्या त्या पंख्याकडे पाहताना वाटलं की, जीवन जेव्हा सत्, रज आणि तम या तीन गुणांमध्ये अडकून पडतं तेव्हा जीव किती घुसमटतो, हे कळत नाही. पण भक्तीच्या ऊर्जेनं जेव्हा या तिन्ही गुणांचा प्रभाव लोप पावू लागतो तेव्हा किती सुखद वाटतं!

एकदा कपाट आवरायला घेतलं तेव्हा अचानक एक छोटी पेटी हाती आली. उघडली तर आत चॉकलेटच्या अनेक चांद्या होत्या. लहानपणी त्या जिवापाड जपलेल्या.. आता कचरा म्हणून क्षणार्धात फेकून दिल्या! मग वाटलं, आज आपण जिवापाड ज्या गोष्टी जपतो आहोत त्यांचं खरं मोल आपल्याला तरी कळतं का? अंतरंगात आसक्तीचा आणि आसक्तीपायी किती कचरा साठला आहे, तो जाणवतो का?

एकदा लहानशा गल्लीतून जात होतो तर समोर दोन माणसं चालत होती. गल्ली लहान होती आणि त्यात लोकांनी आपल्या गाडय़ा लावून ठेवल्यानं चालणाऱ्यांची कोंडी वाढली होती. वाहनांच्या त्या दुतर्फा रांगा पाहून त्या दोघांतला एक जण म्हणाला की, ‘‘आधीच ही गल्ली लहान आणि त्यात लोकांनी वाहनांचं डबल पार्किंग केलंय. मग चालावं तरी कसं?’’ मनात आलं खरंच हे जीवन आधीच थोडंसं. त्यात अनंत इच्छांचं ‘डबल पार्किंग’ झालेलं.. मग ध्येयासाठी खरं चालणं तरी कुठून साधणार?  एकदा माझा वाहनचालक म्हणाला, ‘‘दादा या जगात आपलं असं खरंच काय आहे हो? हे शरीरसुद्धा आपलं नाही. हे केस पांढरे होताना आपली परवानगी विचारत नाहीत की दात पडण्याआधी आपल्याला सांगत नाहीत! डोळ्यांनी दिसेनासं होतं तेव्हा दिसण्याची किंमत कळते. कानांनी ऐकू येईनासं होतं तेव्हा ऐकू शकण्याचं महत्त्व जाणवतं. मग माझं नसलेल्या, पण मला मिळालेल्या शरीराचं मोल मला आजच जाणून घ्यायला नको का?’’

मग वाटू लागलं की खरंच आहे. आपण डोळे असून नीट पाहात नाही, कान असून नीट ऐकत नाही. डोळे नीट उघडले तर मग दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीतलं जीवनसत्य नजरेस पडेल आणि कानावर पडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतला अंत:स्वर ऐकता येईल. अगदी स्वच्छ.. अगदी स्पष्ट!

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com