या चराचरातला प्रत्येक जीवमात्र जन्मतो, जगतो आणि मरतो. मग ती इवलीशी वेल असो, डेरेदार झाड असो वा वृक्ष असो. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पाहता येईल अशा जीवजंतूपासून ते अजस्र पशू वा पक्ष्यापर्यंत कुणीही भूचर, नभचर वा जलचर असो.. आणि या सर्वाच्या जोडीला या सृष्टीत अत्यंत लक्षणीय असलेला माणूस असो! प्रत्येक जण जन्मतो.. जगतो आणि मरतो.. पण आपण का जन्मलो, याच चौकटीत आपल्याला का जगावं लागतं आणि मृत्यूनंतर आपण कुठे असू? किंवा असू की नसू? असे प्रश्न केवळ माणसाला पडत असावेत. जन्म तर सहज लाभला असतो, पण जगणं सहज नसतं. जगण्याची चौकट कोणतीही असो, संघर्ष प्रत्येकाच्याच वाटय़ाला असतो. प्रत्येकालाच जगण्यात काही ना काही न्यून जाणवत असतं. अपूर्णता जाणवत असते. ही अपूर्णतेची सलच पूर्णत्वाची ओढ जागवत असते. अनादि अनंत काळापासून वाहत असलेल्या जीवनप्रवाहातील एक लहानसा तरंग असलेल्या आपल्या जगण्याकडे तटस्थपणे पाहण्याची संधी देत असते. एकूणच जीवनाबद्दल अंतर्मुख होण्याची ही संधी माणसाला क्षणोक्षणी लाभत असते. जगण्यातले अंधारलेले कोपरे प्रकाशानं उजळून टाकण्याची ही संधी प्रत्येकाला मिळत असते. अमावास्येच्या घनगर्द रात्री सुरू होणारा दिवाळीचा प्रकाशोत्सवही हेच सुचवत असतो की या अंधारावर मात करणारा बोधाचा चंद्र अंतर्मनाच्या आकाशात उद्यापासून कलेकलेनं वाढणार आहे!

त्या प्रकाशाचं स्वागत करण्यासाठी आपल्या द्वारी माणूस मिणमिणत्या पणत्या लावतो. रांगोळ्यांची नक्षी रेखतो. जणू तेज आणि सौंदर्याचं स्वागत तो जीवनात करू पाहात असतो. आपल्या इवल्याशा जीवानिशी त्या पणत्याही माना उंचावत त्या स्वागतासाठी वाऱ्याच्या सोबतीनं डुलत असतात. रांगोळ्यांच्या नक्षीत भरलेले गडद रंगही दु:खाला फिकं करू पाहात असतात. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे खरं तर दिवाळीचे दिवस आणि इतर दिवस काही वेगळे नसतात. यंदा अमुक तारखेला दिवाळी येत आहे, असं आपण म्हणतो तेव्हा गेल्या वर्षी ती वेगळ्या तारखेलाही आलीच असते. म्हणजे दिनदर्शिकेवरचे दिवाळीचे दिवस दरवर्षी वेगवेगळे असतात.. तरी दिवस तर तेच असतात.. तेच वार, तोच आठवडा.. तरी इतर दिवसांपेक्षा दिवाळीचे दिवस वेगळे वाटतात. आपण त्या दिवसांना आनंदाचे दिवस मानतो. आनंद निर्माण करतो, दुसऱ्यांमध्ये वाटतो आणि दुसऱ्यांकडून मिळवतोही.. मग जर हाच आनंद इतर दिवशी का जाणवू नये? प्रत्येक दिवस प्रकाशाचा.. अंधार दूर करणारा आणि म्हणूनच प्रकाशाचा का असू नये? मनाच्या दाराशी सद्विचाराची पणती का तेवू नये? सद्विचाराची रांगोळी का रेखू नये?

Mahashivratri 2024 Date time shubh muhurat puja vidhi signification
Mahashivratri 2024: महाशिवरात्री ८ की ९ मार्चला? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी
Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
29 February Horoscope Marathi
२९ फेब्रुवारी, गुरुवार पंचांग: चार वर्षांतून एकदा येतो ‘हा’ खास दिवस! कसे असेल बारा राशींचे ग्रहमान, पाहा
sankashti ganesh chaturthi 2024 shubh muhurat puja vidhi and mantra dwipriya falgun ganesha chaturthi
सर्वार्थ सिद्धी योगातील संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ

अंधार कुणालाच सहसा आवडत नाही. डोळे मिटले तरी त्या अंधारातही माणूस प्रकाशाचाच शोध घेत असतो. म्हणून रोजच्या जगण्यातही अंधार नसावा असं माणसाला वाटतं. पण त्या नादात तो इतका काही कृत्रिम झगमगाटात रमतो की खरा प्रकाशच तो विसरेल की काय, अशी भीती वाटते. अमावास्येच्या रात्रीच दिवाळी सुरू होते.. उद्यापासून बोधचंद्र कलेकलेनं वाढणार आहे, हे सुचवत असते. पण गतिमान जगण्यात माणसाला तेवढी उसंत कुठली? तो कृत्रिम प्रकाशात न्हाऊन जाऊ बघतो. त्या भरात बोधचंद्राचा हा प्रकाश दिसेनासा होण्याचीच भीती असते. गुरुजींचं एक अत्यंत मार्मिक वाक्य आहे की, ‘‘बाहेरच्या झगमगाटानं आतला अंधार अधिकच गडद केला आहे!’’ (बाहर की रोशनीने अंदर के अंधेरे को और गहरा बना दिया है।) बाहेरच्या जगातल्या कृत्रिम झगमगाटापुढे खरा प्रकाशही फिका पडू लागला आहे. अज्ञानाचे दिवे इतके उजळले आणि पाजळले जात आहेत की ज्ञानाची ज्योत अधिकच आक्रसून गेली आहे.

तरीही काही काही ठिकाणी आपल्यातली आत्मज्योत जागी करण्याचे आणि ती तेवत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असतात. ग्रामीण भागात भटकंती करताना असाच एक प्रयोग अनुभवता आला. हा प्रयोग कुठे सुरू आहे, तो कुणाच्या प्रेरणेनं सुरू झाला, या तपशिलात जात नाही. याचं कारण म्हणजे ज्यांनी हा आणि असे बरेच प्रयोग सुरू केले आहेत त्यांनी कटाक्षानं या गोष्टी प्रसिद्धीपासून दूर ठेवल्या आहेत. थोडं काही करताच प्रसिद्धी मिळू लागली, तर मग कार्य आणि त्यामागचा हेतू गौण होत जातो आणि प्रसिद्धीलाच महत्त्व येत जातं, हा त्यांचा भाव असावा. तसंच हा प्रयोग पाहायला म्हणून फुकाची गर्दी होऊ नये, असंही त्यांना वाटत असावं. कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीचं पर्यटन स्थळ बनविण्याची सवय जडली आहे. तेव्हा प्रथमच संबंधितांची पूर्वपरवानगी न घेता, केवळ त्यांच्या उदार आणि क्षमाशील हृदयावर विसंबून जे अनुभवलं, पाहिलं ते मांडत आहे.

काही साधक काही वेळासाठी एकत्र येतात. सत्संग करतात. पण आपआपल्या घरी गेले की पुन्हा सत्संगात जे गवसलं होतं ते विसरून जातात. कितीही इच्छा असली तरी ती धारणा टिकेल असं वातावरण उंबरठय़ाआत किंवा उंबरठय़ाबाहेर मिळतंच असं नाही. काही घरातले तर जवळपास सर्वचजण आध्यात्मिक साधनेला अग्रक्रम देणारे असतात. पण असं काही तासांपुरतं एकत्र येण्याऐवजी कायमसाठीच एकाच भागात एकत्र राहता आलं तर? आता मोठमोठय़ा आश्रमात याच कल्पनेतून काही कुटुंबं राहातात हे खरं. पण त्यांच्या विकासाला त्याचा उपयोग होतो का की एका वेगळ्या गुलामगिरीत ही कुटुंबं ढकलली जातात हे अलीकडच्या काही ‘बाबा’ प्रकरणांवरून दिसलंच आहे. त्यामुळे ही कल्पना नवी नसली तरी निर्धोक मात्र नव्हती. मी जो प्रयोग पहिला तो मात्र सर्वसामान्यपणे एखाद्या निवासी संकुलासारखा होता. १५-२० कुटुंबं तिथं राहात आहेत. प्रत्येक कुटुंब त्याच्या मालकीच्या दुमजली बंगलीत राहात आहे. अर्थात हे बंगले अवाढव्य मात्र नाहीत. खाली दोन खोल्या आणि वर दोन खोल्या, अशी रचना आहे. खालच्या मजल्यावर सासू-सासरे आणि वरच्या मजल्यावर मुलगा व सून असे साधारणपणे राहातात. कोणत्याही घरात दूरचित्रवाणी संच नाही आणि विशेष म्हणजे स्वयंपाकघर नाही. सर्वाचं मिळून एकच स्वयंपाकघर आहे. पाच-सात जणांचा गट एकेका दिवशी एकवेळचा स्वयंपाक करतो. कधी पाच सासवा, कधी पाच सुना आणि रविवार सकाळी तर पाच पुरुष मंडळी स्वयंपाक करतात. पाचच जण स्वयंपाकात गुंततात त्यामुळे उरलेल्या तीस-पस्तीस जणांचा वेळ वाचतो. हा वेळ उपासनेला देता येतो. एकत्रच अन्न रांधलं जात असल्यानं त्याचं प्रमाणही कमी लागतं, नासाडी टळते आणि वेळेची व पैशाची बचतही होते. भल्या सकाळी अगदी वेळेच्या आतच डबेही भरून तयार असतात. त्यामुळे मुलं शाळेला वेळेवर डबा घेऊन जातात, नोकरदार वेळेवर कामावर जाऊ  शकतात.

अध्यात्मातली अगदी सुरुवातीची आणि महत्त्वाची पायरी आहे ती ‘जीभ जिंकण्याची’! जिव्हेची कामं दोन.. खाणं आणि बोलणं. इथं सगळा स्वयंपाक एकत्रच रांधला जात असल्यानं आवडीनिवडीला आपोआप मुरड घालावीच लागते. लहान मुलांनाही आपोआप पानात येईल ते खाण्याची चांगली सवय लागते. भोजनालय आणि उपासनेचा प्रशस्त कक्ष चोवीस तास उघडेच असतात. मनात येईल तेव्हा उपासनेला बसता येतं किंवा भोजनकक्षात जाऊन चहा वगैरे करून घेता येतो.

त्याचबरोबर स्वत:च्या टुमदार घरी आणि तेही निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद मिळतो आणि मुलांवर संस्कार सहज होतातच, पण मोठय़ांचीही उपासना वाढते.

एक आजोबा म्हणाले, ‘‘अहो आज माझ्या नातवाला चाळीस एक अभंग सहज पाठ झाले आहेत. अभ्यासातही तो हुशार आहे, शिवाय अंगमेहनतीची कामंही न कंटाळता करतो आहे. आणखी काय हवं?’’ अनेकांना ध्यानाला व जपाला भरपूर वेळ मिळत असल्याचा आनंद अनुभवता येत आहे.

असे प्रयोग आणखी काही ठिकाणी व्हायला काय हरकत आहे? त्यात हेतूलाच अग्रक्रम मात्र हवा आणि साधनेवर पूर्ण भर हवा. जरी असं एकत्र राहाता आलं नाही तरी त्याला समांतर असे अन्य प्रयोगही करता येतील.

असाच आणखी एक प्रयोग! काही समवयस्क साधकांची मुलंही साधारण एकाच वयाची आहेत. एका साधकाचं घर तुलनेत मोठं आहे. दर रविवारी सर्व मुलं तिथं जमतात. एका साधकाचं गणित खूप चांगलं आहे, एकाचं इंग्रजी तर एकाचं विज्ञान! मग गणित उत्तम असलेला साधक सर्व मुलांचा गणिताचा अभ्यास करून घेतो. विज्ञान चांगलं असलेला विज्ञान घेतो. अशानं मुलांचा अभ्यास एकत्र होतो आणि मुलांचा अभ्यास घेण्याच्या जबाबदारीतून उसंतही मिळते.

ज्यांची मुलं लहान आहेत अशा काही साधकांनी आपल्या मुलांच्या खेळण्यांची ‘बँक’ बनवली आहे. त्यामुळे घराघरांत तीच ती महागडी खेळणी घेण्याची गरज संपली आहे. शिवाय मुलांना अनेक खेळणी सहज प्राप्य झाली आहेत. त्यानं पैशाचीही बचत साधत आहे.

हे काही प्रयोग प्रापंचिकच आहेत, पण ते वेळ आणि पैसा वाचविणारे आहेत. त्यामुळे उपासनेला लाभच होणार आहे. असे काही प्रयोग आपल्यालाही करायला काय हरकत आहे? त्यानंही लहानशी पणती लावल्याचा आनंद गवसेल.. आणि अशाच लहान-लहान पणत्यांच्या प्रकाशानं जगण्यातला अंधार मावळू लागेल. रोजचा दिवस दिवाळीचाच होईल!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com