जगात भावनिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ा कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या गरजेनुसार आणि गरजेपुरता भावनिक आणि मानसिक आधार शोधत आहे. यातला कोणताही आधार कायमचा टिकणारा नाही. मग या आधाराच्या ‘कमळदला’त मनानं का बंदी व्हावं? दुसऱ्याविषयीची सर्व कर्तव्यं करावीत, पण कर्तव्याची सीमा ओलांडून मोहाच्या प्रांतात पाऊल टाकू नये.

युद्धभूमीवर अर्जुनानं एकवार नजर फिरवली आणि त्याच्या वज्रासमान अंत:करणातला धीर खचू लागला. जे त्याच्याविरुद्ध लढायला उभे ठाकले होते ते सारे आप्तस्वकीयच होते. कुणी त्याला अंगाखांद्यावर खेळविलं होतं, कुणी त्याला विद्या शिकवून तयार केलं होतं.. कुणाशी रक्ताचं नातं होतं, तर कुणाशी मनाचं.. आज मात्र एकच नातं उरलं होतं.. शत्रुत्वाचं!

mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामाजिक व आर्थिक भूगोल
indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे
voting rights in India right to vote in constitution of india
संविधानभान : देशाचा प्राणवायू!

अर्जुनाचं मन आधी मोहानं आणि मग विषादानं भरून गेलं..

अर्जुनाच्या या मन:स्थितीचं आणि त्यापायी ओढवलेल्या स्थितीचं रूपकात्मक वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात-

जैसा भ्रमर भेदी कोडें। भलतसें काष्ठ कोरडें।

परि कळिकेमाजीं सांपडे। कोंवळिये॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणें।

परी ते कमळदळ चिरूं नेणे।

तसें कठीण कोंवळेंपणें। स्नेह देखा॥

(ज्ञानेश्वरी, अध्याय १/ ओवी २०१, २०२).

भ्रमर जो आहे ना, तो ‘भलतसे’ म्हणजे कोणतंही लाकूड पोखरू शकतो.. इतकी शक्ती त्याच्यात आहे.. पण जेव्हा कमळपाकळ्यात तो बंदी होतो ना तेव्हा त्या नाजूक पाकळ्या त्याला भेदता येत नाहीत! एक वेळ तो प्राण गमावील, पण त्या कमळपाकळ्या चिरून मुक्त होणं काही त्याला साधत नाही.. कठीणात कठीण लाकडाचा भुगा करणारी त्याची शक्ती त्या नाजूक पाकळ्यात मात्र लयाला जाते.. माउली म्हणतात की, स्नेहपाकळ्यात माणूस असाच अडकतो!

कोणतंही क्षेत्र असो, त्यातला कर्तबगार माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या स्नेहात अडकून हतबल होतो आणि मग त्याचं सारं कर्तृत्व, कर्तबगारी हळूहळू फिकी पडत जाते. अध्यात्माच्या वाटेवर आल्यावर तर पहिला संघर्ष आपल्या अंत:करणातील आपल्याच मोहविषयाशी झडू लागतो! अंत:करणातील भावनांशीच संघर्ष सुरू होतो! बहिर्मुख असलेल्या मनाला अंतर्मुख करण्याची प्रक्रिया सोपी नसतेच. तोवर बाहेरच्या जगात सुखाचा आधार शोधण्याची सवय जडलेल्या मनाला अंतरंगाकडे वळवायचं असतं. संत सांगतात, त्या अक्षय सुखाचा उगम आपल्याच अंत:करणात आहे. त्या सुखाचा शोध घेणारी अंतर्यात्रा सुरू झाली असते. जे सुख बाहेर आपण शोधत होतो ते आत खरंच गवसेल का, हेही नेमकेपणानं माहीत नसतं. तरी तोडकीमोडकी का होईना ‘साधना’ सुरू झाली असते. आता साधना कितीही मोडकीतोडकी असेना का, तिच्यामुळे अंत:करणात काही बदल होऊ लागतात. आपल्या अभ्यासानुसार या बदलांचा वेग कमी-अधिक असू शकतो. अगदी पहिला बदल म्हणजे साधना जर प्रामाणिकपणे सुरू असेल, तर अंत:करण हळवं होऊ लागतं. प्रेमभाव, कारुण्य, दयाभाव वाढू लागतो. अष्टसात्त्विकभाव जागे होण्यासाठीची प्रदीर्घ प्रक्रिया सुरू झाल्याची ती अगदी प्रारंभिक लक्षणं असतात. पण आंतरिक भक्ती अधिक पक्व होण्यासाठी हा हळवेपणा असताना तो जगाकडे वळण्याचाही मोठा धोका असतो. तो जगाकडे वळला तर फसगत होते. जडभरताची ती कथा माहीत आहे ना? संपूर्ण राजवैभवाचा त्याग करून जंगलात तो तपश्चर्या करीत होता. अंतरंगातील राजवैभवाचा मोह त्यागणं सोपं का आहे? तरी तो त्यागून जंगलात तपाचरणात निमग्न असलेल्या त्याच्यासमोर एक हरिणी धावत आली. ती गर्भार होती आणि शिकाऱ्यापासून जीव वाचवीत पळत होती. भयव्याकूळ होत तिनं पाडसाला जन्म देत प्राण सोडला. त्या अनाथ पाडसानं राजाचं मन काबीज केलं. मग तपश्चर्या सुरू झाली ती पाडसाच्या पालनपोषणाची! ध्यान सुरू झालं ते त्याच्या हिताचं.. चिंतन सुरू झालं ते त्याच्या रक्षणाचं.. राजवैभवाचा मोह ज्यानं सहजतेनं त्यागला त्याला एका लहानशा पाडसाच्या चिंतेचा मोह त्यागता आला नाही.. असं पाडस जे आज ना उद्या त्याच जंगलात त्याच्यातील सहज प्राणिभावानुसार मुक्तपणे निघून जाणार होतं!

दुसऱ्याचं कल्याण करण्याचा विचार वाईट नसतो, पण आधी स्वत:चं कल्याण साधलं नसताना आणि दुसऱ्याचं खरं कल्याण नेमकं कशात आहे, हे माहीत नसताना दुसऱ्याच्या कल्याणासाठी म्हणून जी धडपड होते ती बरेचदा सुप्त मोहातून सुरू होते आणि स्वनिर्मित स्नेहापेक्षेच्या ‘कमळदला’त अडकवते! मूळ भाव शुद्ध असतो, पण मोह, आसक्ती, अपेक्षा यांच्या जंजाळात तो भाव उग्र रूप धरण करून आपल्याला भावनिकदृष्टय़ा पराधीन आणि हतबल करून टाकतो.

स्पिनोझा नावाचा एक मोठा तत्त्वचिंतक सतराव्या शतकात होऊन गेला, तो म्हणतो की, ‘‘भावनांना प्रतिबंध करण्याच्या सामर्थ्यांचा अभाव हेच दास्य किंवा गुलामगिरी आहे. आपल्या मनोभावांना वश होणारा माणूस स्वाधीन नसतो!’’अर्थात असा माणूस भावनांच्या आधीन असतो. जिथे आपली भावना केंद्रित होते त्या गोष्टीसाठी आपली धडपड सुरू होते. आपल्या इच्छा तिथेच जखडतात. स्पिनोझा म्हणतो, ‘‘आपण ज्याकरिता धडपड करतो, इच्छा करतो किंवा तळमळतो ती गोष्ट चांगली असतेच असं नव्हे. खरं तर आपण तिची इच्छा बाळगतो, तिच्यासाठी धडपडतो आणि तळमळतो म्हणूनच ती गोष्ट आपल्याला चांगली वाटत असते!’’ तेव्हा जिथं असा भाव चिकटतो त्या गोष्टीच्या मोहामुळे तिचं खरं रूपही आपल्याला आकळत नाही. आणि ही मोहग्रस्त भावशरणताच आपल्याला गुरफटवत असते. स्पिनोझा म्हणतो, ‘‘भाव म्हणजे शरीराचा असा विकार की ज्यामुळे शरीरातील कृतीची शक्ती वाढते किंवा कमी होते!’’ म्हणजेच भावबळानं निर्थक गोष्टींच्या प्राप्तीसाठी धडपडीची कृती वाढते किंवा निर्थकाचा त्याग करण्यासाठीची कृती टाळली जाते! आपणच ज्या ‘कमळपाकळ्या’त बंदी झालो त्या भेदणं असं कठीण होतं..

या भावशरणतेचा परिणाम उपासनेवरही होतोच. तो पटकन लक्षात मात्र येत नाही. त्यामुळे उपासनेत मन का लागत नाही, एकाग्र का होत नाही यामागचं भावशरणतेचं कारण ज्याचं त्यानं शोधलंच पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, आपलं मन कुठं गुंतत आहे ते पाहावं आणि मग त्याला तेथून वळवावं. मौनाबद्दल महाराज एकदा म्हणाले की, कोणतीही गोष्ट बोलण्याआधी ही गोष्ट मी बोललीच पाहिजे का, याचा विचार केला तरी निम्मं बोलणं कमी होईल! अगदी हाच न्याय जगण्यातील प्रत्येक कृतीला लावण्याचा अभ्यास सुरू झाला पाहिजे. आपली प्रत्येक कृती, आपल्या मनात सुरू असलेला विचार याकडे असं तटस्थपणे पाहणं सुरू झालं, तर आपलं मन कुठे अडकत आहे, कोणत्या कल्पनांमागे वाहवत आहे, याची जाणीव होऊ लागेल. मग असा विचार, अशी कल्पना मनातून उपसून टाकणं, हीच खरी उपासना होईल! या उपासनेसाठी अंतर्मुख होऊन सतत स्वत:चीच तपासणी करीत गेलं पाहिजे..

मग लक्षात येईल की आपल्याला भावनिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ा ज्यांचा आधार हवासा वाटतो त्या आधारातच आपण गुंतत असतो. ज्यांच्या सहवासात आपल्याला भावनिक आणि मानसिकदृष्टय़ा पूर्णत्व येईल, असं आपल्याला वाटतं तोच आधार आपल्याला हवासा वाटत असतो. प्रत्यक्षात, स्वत:च अतृप्त असलेलं जग मला पूर्ण तृप्तीचा अनुभव देऊच शकत नाही, हे जे सत्य ‘एकनाथी भागवता’तील िपगलेला उमगलं तेच लक्षात ठेवलं पाहिजे. जगात भावनिकदृष्टय़ा आणि मानसिकदृष्टय़ा कोणीच परिपूर्ण नाही. त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या गरजेनुसार आणि गरजेपुरता भावनिक आणि मानसिक आधार शोधत आहे. यातला कोणताही आधार कायमचा टिकणारा नाही. मग या आधाराच्या ‘कमळदला’त मनानं का बंदी व्हावं? दुसऱ्याविषयीची सर्व कर्तव्यं करावीत, पण कर्तव्याची सीमा ओलांडून मोहाच्या प्रांतात पाऊल टाकू नये. भावनिकदृष्टय़ा सतत एखाद्यावर अवलंबून स्वत:ला परावलंबी करू नये किंवा सतत एखाद्याचा भावनिक आधार आपणच असल्याचं िबबवीत दुसऱ्याला मानसिकदृष्टय़ा पंगूही करू नये. हा अभ्यास कितीही क्षीण का असेना, पण सुरू ठेवलाच पाहिजे.

बाळकृष्णाच्या मूर्तीवर मातृहृदयाने प्रेम करीत असलेल्या ‘कृष्णाच्या आई’ एक अधिकारी व्यक्ती आहेत. एकदा त्यांच्याकडे गेलो असताना एक अगदी अशक्त मांजर वावरत होतं. सारखं उडी मारून ते मांडीवर बसत होतं. त्याला उचलून जमिनीवर ठेवताना मनात आलं की, हे नसतं तर नीट बोलता आलं असतं. तोच माझ्याकडे पाहत कृष्णाच्या आई म्हणाल्या, ‘‘ घरात खूप उंदीर झाल्येत आणि तुम्ही पाहताच आहात हे मांजर किती मरतुकडं आहे. तरी यांच्या क्षीण ‘म्याऊ’नं मोठमोठे उंदीर दबून राहत आहेत.. असं उपासनेचं मांजर अंत:करणात फिरलं पाहिजे! मग भले तेही मरतुकडं का असेना, त्यानंही विकारांचे उंदीर दबून राहतील!’’

तेव्हा आत्मपरीक्षण आणि आंतरिक छाननीचा अभ्यास.. भावनिक गुलामीचे आपणच बांधून घेतलेले बांध तोडून टाकण्याची उपासना कितीही क्षीणपणे का सुरू असेना, ती अखंड चाललीच पाहिजे. तरच मोहभ्रमाच्या कमळदलात बंदी होणं थांबेल.

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com