News Flash

ऋण..

सत्पुरुषाच्या सहवासात राहण्याचे काही फायदे आणि काही तोटे असतात.

spiritual thought of mind 
आपला मार्ग ज्ञानेश्वर माऊलीचा आहे.

भाऊंनी मला खूप काही दिलं. पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्माचा मार्ग सोडू दिला नाही. पळवाटा बुजवून टाकल्या. अध्यात्म हे जगण्यासाठी आहे, बोलण्यासाठी नाही, असं ते सांगत. बाबा आणि भाऊंसारख्यांचं देणं कधीच फिटू शकत नाही.. कधीच नाही!

एखादं रोपटं लावतात तेव्हा त्याची जपणूक करणं, रक्षण करणं, त्याची निगा राखणं, त्याला खत आणि पाणी घालणं आवश्यक असतं. अध्यात्म विचाराचं बीज मनात पडणंच आधी दुरापास्त. त्यातूनही ते पडलं तरी त्याच्या जपणुकीसाठी, रक्षणासाठी, निगेसाठी आणि त्याला खतपाणी घालून फुलविण्यासाठी खरा सत्संग मिळणं त्याहून दुरापास्त! बाबा बेलसरे यांच्या भेटीनं आणि त्यांच्या पुस्तकांच्या सततच्या वाचन आणि मननानं आध्यात्मिक विचारांचं बीज तर मनात अंकुरलं होतं, पण या रोपाचं रक्षण प्रथम भाऊंनीच केलं!

भाऊंकडे अनेक माणसं येत. गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, आस्तिक आणि नास्तिक, देवभोळी आणि विज्ञानभोळी.. सर्वच जण येत. काही कुतूहलानं, काही प्रामाणिक जिज्ञासेनं, काही जण कुणाला सोबत म्हणून.. पण सर्वाशी भाऊंचा आणि त्यांच्या पत्नी वसुधाताईंचा व्यवहार समान निरपेक्ष प्रेमाचा असे. बहुतांश लोक येत ते प्रपंचातल्या अडीअडचणी घेऊन. जीवनातल्या दु:खांनी आणि संकटांनी हैराण झालेल्या माणसांचा हेतू देवाची कृपा लाभावी आणि आपल्या अडीअडचणी संपाव्यात, हाच असे. भाऊ  त्यांना प्रथम मानसिक आधार देत आणि काही जप, काही उपासना नेमून देत. लोक प्रापंचिक अडचणी घेऊन येतात, पण त्या संपल्या की लगेच देवाला विसरतात, एवढंच भाऊंना आवडत नसे. लोकांनी दु:खाच्या निमित्तानं यावं, पण भगवंताच्या प्रेमाचा अधिकार मिळवून जावं, असं त्यांना वाटे.

बरीचशी मंडळी खेडय़ापाडय़ांतूनही येत. एखाद्या संकटावर नुसत्या जपाचा उपाय त्यांच्या मनाला प्रथम पटत नसे. मग कुणी म्हणे, ‘‘भाऊ, अमक्यानं तर कोंबडय़ाचा बळी द्यायला लागंल, असं सांगितलंन.. मग नुसत्या पोथीनं अन् माळ फेरून काय व्हायाचं हो?’’

भाऊ  प्रेमानं सांगत, ‘‘बघा, आपला मार्ग ज्ञानेश्वर माऊलीचा आहे. कुणाचा बळी जाऊ  देणं माऊलीच्या काळजाला आवडेल का? आणि कोंबडं वगैरे कापणं म्हणजे काय? रक्तच वाहणं ना? पण आपणच केलेल्या कर्माचे भोग वाटय़ाला आले तर ते दूर व्हावेत म्हणून त्या मुक्या प्राण्याचं जगणं का हिरावून घ्यायचं? त्याचं रक्त का वाहायचं? दीर्घ उपासनेनं आपलं रक्त आटतं ना? मग एक प्रकारे हे रक्तच अर्पण करणं नाही का? म्हणून निष्ठेनं आणि नेटानं सांगितलेली उपासना करा. देवालाही तेच आवडेल!’’

मला लोकांच्या अशा प्रापंचिक रडगाण्यांचा वीट येई. मी म्हणे, ‘‘भाऊ , कशाला या लोकांना आधार देत राहता..’’

भाऊ  गंभीरपणे म्हणत, ‘‘ही जीवब्रह्मसेवा आहे.. मी स्वत: खूप व्याधी भोगल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या दु:खाची मला कल्पना आहे. रोगव्याधी देहाला असतात, पण त्या सोसताना मन अतोनात यातना भोगतं. जर हे मन देवाकडे वळलं, तर दु:खाची जाणीव कमी होत जाते आणि दु:ख सोसण्याची शक्ती लाभते. या परिस्थितीवर मात करता येईल, अशी मनाची उमेद उपासनेनं वाढते.’’

सद्गुरूशिवाय अध्यात्म मार्गावर खरी वाटचाल होऊ  शकत नाही, हे जाणवून मी भाऊंना सारखा विचारू लागलो की, ‘‘तुम्ही माझे गुरू आहात का?’’

भाऊ  म्हणत, ‘‘मी तुझा गुरू नाही. तुला योग्य

वेळी खरा सद्गुरू लाभणार आहे..’’ गोंदवलेमार्गे

उत्तर प्रदेशात आपल्या चरणांपाशी आणण्याच्या सद्गुरूंच्या योजनेत भाऊ  हे प्रमुख भूमिका बजावत होते, हे तेव्हा कळणं कुठं शक्य होतं? एकदा जप सुरू असताना ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या जागी रामनाम आपोआप सुरू झालं आणि राम की कृष्ण, हा क्षुद्र गोंधळ संपला! मग माझ्या आध्यात्मिक वाटचालीसाठी भाऊ  मला उपासना नेमून देऊ लागले; पण मी प्रथम म्हणालो की, ‘‘मला कुठे कसली अडचण आहे? मग मी कशाला हे पारायण करू?’’

भाऊ  म्हणाले, ‘‘तुम्ही सद्गुरूंच्या आनंदासाठी म्हणून हे करायचंय!’’ मग ‘सद्गुरू आनंदप्रीत्यर्थे पारायणं करिष्यामि’ असा संकल्प सोडून माझी उपासना सुरू होई. भाऊ म्हणजे उपासना कशी चालली आहे, हे सांगणारे ‘उपासनामापक’च होते म्हणा ना! ज्या दिवशी जपात आळस व्हायचा त्या दिवशी सहज म्हणून विचारायचे, ‘‘दुपारी जेवलात ना?’’ मी दुपारी यथेच्छ मारलेला ताव आठवून होकार भरे. तर म्हणत, ‘‘जेवायला वेळ मिळाला, मग जपाला का नाही मिळाला?’’

भाऊंना मनात चाललेले विचारही लगेच समजतात, असं मला जाणवत असे. एकदा त्यामुळेच त्यांना म्हणालो, ‘‘तुमच्यासमोर बसायची भीती वाटते.’’

त्यांनी विचारलं, ‘‘का?’’

मी म्हणालो, ‘‘मनात खूपदा वाईट विचार येतात.’’

ते म्हणाले, ‘‘येऊ  देत.. कुणाच्या मनात वाईट विचार येत नाहीत?’’

मी म्हणे, ‘‘पण कित्येकदा तुमच्याबद्दलही वाईट विचार येतात. तुमचं ऐकतोय असं दाखवत असताना मन शिव्याही घालतं तुम्हाला.’’

ते म्हणाले, ‘‘अहो, या मार्गावरून दूर करण्यासाठी मन हे सारे खेळ करणारच. काही चिंता करू नका. कितीही आदळआपट केली तरी तुम्ही बधत नाही हे एकदा का मनाला समजलं ना, की तेच मन कसं साह्य़ करील पाहा!’’

सत्पुरुषाच्या सहवासात राहण्याचे काही फायदे आणि काही तोटे असतात. फायदा हा की, भगवतचर्चा सहज आणि सतत कानावर पडते.. आणि तोटा हा की, ती ऐकून ऐकून ती दुसऱ्यासमोर पाजळता येऊ लागली की, आपण कुणी तरी झालो आहोत, असा भ्रम निर्माण होतो! मग आपल्याला काही ‘शक्ती’ लाभल्याच्या भ्रमात आपण वावरू लागतो. मला या भ्रमातून फटका देऊन भाऊंनीच बाहेर काढलं आणि मार्गावर आणलं. त्याचं असं झालं.. मी कपडे खरेदी काही ठरावीक दुकानांतून करीत असे. एक दुकानदार मोठा उमदा आणि सदा हसतमुख होता. एकदा गेलो तर त्याची तब्येत बरी नाही, असं वाटलं. मी कारण विचारलं, तर म्हणाला की, ‘‘रात्र रात्र झोपच येत नाही. पितरांचा काही त्रास असावा अशी घरच्यांना शंका आहे.’’ मी म्हणालो, ‘‘पितरं कशाला त्रास देतील?’’ मग मी त्यांना देवीचा जप पटकन सांगितला. दोन दिवसांनी तो वाटेत भेटला. चेहरा पूर्वीसारखा प्रसन्न. मला म्हणाला, ‘‘तुम्ही सांगितलेला जप केला तेव्हापासून झोप चांगली लागत्ये बघा.’’ मला आनंद वाटला आणि पाठोपाठ अहंकार जागा झाला. भाऊ  तेव्हा रजेवर होते तेव्हा माझी ही ‘प्रगती’ त्यांना इतक्यात सांगता येणार नव्हती. मग दुसऱ्याच दिवशी आणखी एक परिचित दुकानदार भेटला. एका पायानं लंगडत होता. कारण विचारलं तर म्हणाला, ‘‘दोन दिवसांपासून पाय ठणकतोय. सर्व औषधं झाली, पण काही गुण नाही.’’ आता काय मी तरबेजच झालो होतो ना! लगेच एक मंत्र सांगितला. त्या दिवशी काही तासांतच एक गोष्ट मात्र घडली. मी अचानक कशाला तरी अडखळून पडलो आणि नेमका तोच पाय दुखावला. तरी समज काही आली नाही. दोन दिवस गेले. मोठय़ा उत्सुकतेनं त्याला भेटायला गेलो तर तो तसाच लंगडत होता. मी विचारपूस केली, तर उद्वेगानं म्हणाला, ‘‘सर्व उपाय झाले. तुमचा तो जपसुद्धा केला, पण काही उपयोग नाही बघा. ठणका उलट वाढलाच आहे!’’ मी खजील झालो. त्या रात्री भाऊ  कामावर परतले होते. त्यांना घडलेल्या गोष्टी सांगण्याआधीच त्यांनी विचारलं, ‘‘काय सध्या बाजार मांडलाय तुम्ही?’’ मी नि:शब्द होतो. मग जे घडलं ते सांगितलं. तेच प्रेमानं म्हणाले, ‘‘पहिल्या माणसाला तुम्ही जे सांगितलंत ते अगदी निरपेक्ष आणि निर्मळ मनानं. त्यामुळे तुमची प्रार्थना ऐकली गेली. दुसऱ्याला सांगितलंत ते अहंकारानं. मग ते तुम्हालाही भोगावं लागलं! निरपेक्ष भावानं दुसऱ्याला अडीअडचणीत मदत करणं हा मानवधर्मच आहे. त्यात अहंकार का? बरं कुणाच्या वाटय़ाला कुठला भोग का आला आहे, हे तुम्हाला कळतं का? तो स्वत:कडे घेऊन भोगण्याची तुमची तयारी आहे का?’’ मी मान खाली घालून नाही म्हणालो. तर प्रेमानं म्हणाले, ‘‘लहान मूल सकाळी जागं होताच आईला म्हणालं की, मला जेवायला वाढ, तर ती काय म्हणेल? बाळा, आधी दात घास, आंघोळ कर, मग मी दूध देते, नाश्ता देते.. मग जेवण रांधते आणि देते.. तरी त्यानं हट्ट धरला तर जे शिळंपाकं आहे तेच तिला द्यावं लागेल ना? तुम्हाला हे करायचं आहे, पण त्याला वेळ आहे..’’

मी म्हणालो, ‘‘नाही भाऊ, मला असलं कधीच काही करायचं नाही. माझी चूक झाली. मला क्षमा करा.’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘खरंच चुकलात असं वाटतं ना? मग त्या दोघांची क्षमा मागा!’’

मी त्याप्रमाणे केलं. मी क्षमा का आणि कसली मागतोय, हेच त्या दोघांना कळलं नाही, पण ती माझ्या अहंकाराची परीक्षा होती.

भाऊंच्या विभागात मी जाऊन बसत असे. भाऊ  कामात असले तर मग इतर सहकाऱ्यांशी गप्पा सुरू होत. गप्पांची गाडी राजकारणावर आली की मग तावातावानं बोलणं सुरू होई. भाऊ  मध्येच हळूच मला विचारत, ‘‘माझं काम सुरूआहे, पण मनात जप सुरूआहे. तुमचा जप सुरू आहे ना?’’

मी थिजून जात असे. एकदा रात्री प्रवासात भाऊ  म्हणाले, ‘‘जगाकडे पाहण्याची गोडी कमी करा. जगात काय चाललंय इकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या अंतर्जगतात काय चाललंय इकडे लक्ष द्या.’’

कधी माझ्यासकट सर्व सहकाऱ्यांना सांगत, ‘‘बाबांनो, काळ आपल्यामागे उभा आहे. वेळ फार थोडा उरलाय. उगाच वायफळ गप्पात वेळ दवडू नका.’’ या विभागात अनेक जण पूर्वी दारू पित आणि जुगारही खेळत. भाऊंमुळे सर्व जण मार्गावर आले.

भाऊंनी मला खूप काही दिलं. पहिली गोष्ट म्हणजे हा मार्ग सोडू दिला नाही. पळवाटा बुजवून टाकल्या. एकदा मी म्हणालो, ‘‘भाऊ , भगवंतानं गीतेत सांगितलंय की, हजारो लोकांमधला एकच जण माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो, तर मग हा मार्ग कठीणच आहे. माझ्या साधनेनं काय होणार?’’

तर म्हणाले, ‘‘हजारातला एकच जण पोहोचतो हे खरं आहे आणि तो एक तुम्हीच आहात! म्हणून सबब न सांगता उपासना चालू ठेवा!’’

अध्यात्म हे जगण्यासाठी आहे. बोलण्यासाठी नाही, असं ते सांगत. आध्यात्मिक ग्रंथ म्हणजे पाकशास्त्राची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं वाचून पोट भरत नाही. त्या पुस्तकात लिहिलेले पदार्थ करून, खाऊन पचवावे लागतात, तेव्हा कुठं पोट भरतं, असं ते म्हणत.

कालांतरानं मी नोकरी बदलली. भाऊही सेवानिवृत्त झाले.. आडगावी राहायला गेले. आठेक वर्षांचा नित्याचा संपर्क तुटला, पण हृदयस्थ नातं संपलेलं नाही. जगाचं देणं एक वेळ फिटेल हो! पण ज्यांनी जगावं ते नेमकं कशासाठी आणि कसं, हे शिकवलं त्यांचं देणं कधीच फिटू शकत नाही.. कधीच नाही! बाबा आणि भाऊ यांच्या ऋणात मी आनंदी आहे.

(उत्तरार्ध)

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2017 1:26 am

Web Title: spiritual thought of mind worship devotion spirituality
Next Stories
1 बाबा आणि भाऊ..
2 योगिनी!
3 वियोगिनी..
Just Now!
X