12 July 2020

News Flash

आली लहर.. झाला कहर!

सध्या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहरी लोकांत ‘आरे’चं प्रकरण जोरदार तापलं आहे.

संहिता जोशी

ट्रोलांनी कितीही उचकवलं, हिणवलं तरी त्यांना प्रत्युत्तरं देणं टाळत नाही तोवर अभ्यासूपणापेक्षा लाटेवर स्वार होणारेच विषय ‘लोकप्रिय’ होण्याचा धोका टळणार नाही. समाजमाध्यमांवरून आपण व्यक्त केलेल्या भूमिका टिकणार आहेत, त्यातून नवी विदा तयार होते आहे, हे भान नसेल तर लहरीनुसार कहर होतच राहणार..

दोनेक वर्षांपूर्वी एक विदाविज्ञान प्रकल्प मी बघितला. ट्विटरवरून रोज १ टक्का ट्वीट्स उतरवता (डाऊनलोड) येतात; जगभरातून झालेल्या ट्वीट्सचा वानोळा. प्रकल्पासाठी अमेरिकेतली ट्वीट्स निवडली होती. त्यांपैकी काही लोकांनी ट्वीट्सला आपल्या स्थानाची जोड दिलेली असते – जिओटॅिगग. ती वापरून उरलेल्या ट्वीट्सची जागा निश्चित करता येईल का, हे तपासून बघणं असा तो प्रकल्प होता.

विदाविज्ञानात मशीन लìनग हा भाग असतो, त्याचं काम असतं पॅटर्न शोधायचे. आणि मग नव्या विदेला कोणता पॅटर्न बसतो, हे ठरवायचं. त्यानुसार नव्या विदेचं वर्गीकरण करायचं. ज्या गोष्टी संगणकावर साठवता, बघता, वाचता, ऐकता येतात ती सगळी विदा (डेटा). त्या प्रकल्पात असं दिसलं, ठरावीक शहरांमधून येणाऱ्या ट्वीट्समध्ये त्वचेचा रंग अधिक काळा निवडला जात होता; हे वापरलेल्या मशीन लìनगच्या प्रारूपानं (मॉडेल) शोधून काढलं. (ही विदेतून मिळालेली माहिती.) त्या ठरावीक शहरांमध्ये कृष्णवर्णीयांचं प्रमाण सरासरी लोकसंख्येपेक्षा बरंच जास्त आहे; ही विदा सुरुवातीला वेगळी पुरवलेली नव्हती. लोकांनी काय लिहिलं आणि कुठून लिहिलं यावरून प्रारूपाला हे शोधून काढता आलं.

हे ‘तंत्रज्ञान’ चालण्यासाठी सगळ्या कृष्णवर्णीयांनी इमोजींमध्ये त्वचेचा काळा वर्ण निवडण्याची गरज नसते. त्यांच्या सगळ्या ट्वीट्समध्ये त्वचेचा वर्ण असणारे इमोजी असण्याची गरज नसते. पुरेशी विदा असेल तर सांख्यिकीच्या (स्टॅटिस्टिक्स) मूलभूत संकल्पना वापरून मशीन लìनगची प्रारूपं असे पॅटर्न शोधू शकतात. (फार ताणलं तर तुटतं, तसंच, प्रारूपं काळजीपूर्वक वापरली नाहीत तर पुरेशा विदेतून चुकीची माहितीही सहज मिळू शकते. तो विषय लेखमालेच्या कक्षेबाहेरचा आहे.)

गेल्या लेखात टीव्हीवरच्या खिडकीचर्चाचं उदाहरण वापरलं. एका संकल्पनेच्या वेगवेगळ्या बाजू समजून घेताना उदारमतवादाखातर करुणा, सहृदयता नसणाऱ्या भूमिकांना स्थान देण्याची काही गरज नसते. आपल्याला न पटणाऱ्या किंवा माहीत नसलेल्या भूमिका, विषय, तपशिलांची गांभीर्यानं दखल घेणं, त्यांचा विचार करणं हा उदारमतवाद असतो.

यूटय़ूबवरून भडकाऊ, चुकीची माहिती पसरवणारे व्हिडीओ अधिक प्रमाणात का पसरतात; फेसबुक, ट्विटरवर शाब्दिक हाणामाऱ्यांपासून एकमेकांना हिणवणारं लेखन अधिक का पसरतं, त्याचं उत्तर शोधायचं असेल तर मशीन लìनग प्रारूपं कशी आणि काय शिकतात, हे तपासावं लागेल. (असं तपासण्याची आवश्यकता असते तिथे न्यूरल नेटवर्क्‍स वापरली जात नाहीत.)

समाजमाध्यमांवर लोकांचे वादविवाद चालतात, त्यांत माहिती दडलेली असते. वादग्रस्त विषय ऐरणीवर येतात तेव्हा एकमेकांशी सहमत असणारे लोक फार बोलत नाहीत; वाद घालणारे बोलतात. खिडकीचर्चा चुरचुरीत होण्यासाठी जसे बिनबुडाच्या भूमिका मांडणारे लोक अभ्यासकांशी चर्चा (का वाद) करायला बोलावले जातात, तसंच चित्र समाजमाध्यमांवर दिसतं. समोरच्याला हरवणं, आपलंच खरं करणं, ते जितक्या चटपटीतपणे म्हणता येईल ते म्हणल्यावर पोस्ट्स लोकप्रिय होतात.

लोकप्रिय म्हणजे नक्की काय?

आपल्याला फेसबुक, ट्विटर, रेडिट फीडमध्ये काय दिसणार, हे कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटलिजन्स) असणारी प्रारूपं ठरवतात. प्रत्येक व्यक्ती कोणाशी, कोणत्या विषयांवर, किती जास्त देवाणघेवाण करते यानुसार आपल्याला काय दिसणार हे ठरवलं जातं. समजा कोणी तुमच्याशी सतत वाद घालतात आणि तुम्ही त्यांना उत्तरं देता असा पॅटर्न दिसला, तर त्यांच्या पोस्ट्स, प्रतिक्रिया तुम्हाला सहज दिसणार. आणि त्यांनाही. मग आपल्या लेखी वाद घालणारी व्यक्ती ट्रोल असेल, मुद्दाम किंवा हेतूशिवाय उचकवणारं लेखन सातत्यानं करत असेल तरीही आपलं लेखन त्यांना आणि त्यांचं लेखन आपल्याला सतत दिसत राहणार. हे ‘लोकप्रिय’. यात ‘प्रिय’- प्रेयस किंवा आवडण्यासारखं काही- असण्याची गरज नाही.

आपण ज्या मुद्दय़ाला, व्यक्तींना प्रतिसाद देतो, ते प्रारूपं ओळखतात. भले ते ट्रोल, ट्रोिलग का असेना. सुरुवातीला दिलेल्या उदाहरणातही, कोणत्या शहरांत कोणत्या वर्णाचे लोक राहतात हे शोधण्याचा काहीही इरादा नव्हता. विदेत दडलेली ही माहिती प्रारूपानं शोधून काढली आणि ज्या ट्वीट्सचं स्थान माहीत नव्हतं, त्याचं भाकीत करण्यासाठी ती माहिती वापरली. ट्रोलांना टाळण्याचा एकमेव उपाय असतो- दुर्लक्ष. ट्रोलांनी कितीही उचकवलं, हिणवलं तरी त्यांना प्रत्युत्तरं देणं टाळल्याशिवाय ही ‘लोकप्रिय’ता टळणार नाही.

समाजमाध्यमांवर वाद घालताना आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपण जे लिहितो, ते किमान येती काही वर्ष तसंच राहणार आहे. ‘ऑर्कुट’ बंद पडलं, या वर्षी गूगल-प्लसचा नंबर लागला आणि तिथे लिहिलेल्या गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत. मात्र आपण जे लिहिलं, जी विदा निर्माण केली तिचा वापर करून सुरुवातीची प्रारूपं तयार केली असतील. फेसबुक, रेडिट आणि ट्विटर सध्या तरी जोरदार सुरू आहेत. आपण तिथे जे काही भलंबुरं लिहितो, ते टिकून राहणार आहे.

हा मान पूर्वी फक्त प्रसिद्ध व्यक्तींनाच होता. सध्या राजकीय नेत्यांच्या पक्षबदलाच्या जोरदार बातम्या असतात. त्यांनी आधी केलेली टीका आता खिल्ली उडवण्यासाठी समाजमाध्यमांवर दिसते. निवडून येण्याआधी निवडणूक जाहीरनाम्यांत दिलेली आश्वासनं निवडून आल्यावर पूर्ण झालेली नसतील तर लोक त्याबद्दल समाजमाध्यमांवरही चर्चा करताना दिसत आहेत. विदा साठवण्याचं तंत्रज्ञान स्वस्त झाल्यामुळे आपण जे काही लिहितो, शेअर करतो, ते सहज साठवता येतं. समाजमाध्यमांमुळे ते खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचतं; आणि सहज उकरून काढता येतं. त्याला एक प्रकारचा टिकाऊपणा आला आहे; हा टिकाऊपणा चांगला असेलच असं नाही.

बोललेले शब्द सहज विरून जातात; लिखित शब्दांचं तसं नसतं. करुणाहीन, उचकवण्यासाठी केलेल्या ट्रोलिंगलाही टिकाऊपणा आलेला आहे. त्यातून आपल्या भूमिकेत तडजोड करणं कठीण होतं. काही काळानंतर नवी माहिती समोर येते; समाजाच्या जाणिवा बदलतात त्यामुळे आपल्याला आपली जुनी भूमिका बदलण्याची गरज वाटू शकते.

तरीही, समाजमाध्यमांवरच्या वादांना तात्कालिकता असते. व्यापक हेतू आणि मूल्यांचा विचार करून भूमिका मांडलेल्या नसतात. चटपटीतपणा हा धोरणाला पर्याय नाही. आज जे पटलं ते लिहिलं; उद्या आणखी काही पटलं तर आणखी काही म्हणलं अशा प्रकारचे वाद आणि भूमिका समाजमाध्यमांवर दिसतात. कारण मुळात हे वाद माहिती घेऊन, अभ्यास करून घातलेले नसतात; भूमिका असेलच तर लोकांना विश्वासात घेण्याची तसदीही घेतलेली नसते. त्यामुळे या तत्कालीन, अनभ्यस्त भूमिकांचं टिकाऊपण तडजोड, अभ्यास आणि दीर्घकालीन धोरण आखण्याला मारक ठरतं.

सध्या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या शहरी लोकांत ‘आरे’चं प्रकरण जोरदार तापलं आहे. ‘#सेव्हआरे’ हा हॅशटॅग ट्विटरवर काही काळ चलतीत (ट्रेंडिंग) होता. समाजमाध्यमांमध्ये सध्या चित्र दिसतंय ते ‘पर्यावरण विरुद्ध विकास’ असं आहे. मेट्रो म्हणजे विकास आणि त्यात खोडा घालणारे पर्यावरणवादी, अशी विभागणी झाल्याचं दिसत आहे. हा मानवी मेंदूला दिसणारा पॅटर्न. हौशी विदावैज्ञानिकांना आरे-मेट्रोसंदर्भात समाजमाध्यमांवर काय ‘युद्धं’ पेटली आहेत, याचा अभ्यास सहज(!) करता येईल. पर्यावरण आणि विकास यांबद्दल समाजाचं आकलन काय आहे, हे विदाविज्ञान वापरून तपासता येईल.

मात्र पर्यावरणाची हानी टाळत, शाश्वत विकासासाठी काय करावं लागेल, हे समाजमाध्यमांवर सापडणार नाही. त्यासाठी त्या-त्या विषयाचा विविधांगी अभ्यासच करावा लागेल; त्या अभ्यासाचा सगळ्यांना फायदा व्हायचा तर आक्रमक, हास्यास्पद ट्रोिलगऐवजी अभ्यासातून तयार झालेलं आकलन, सहृदयता बाळगून लोकांना पटवून द्यावं लागेल.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 3:33 am

Web Title: article about wave of social media zws 70
Next Stories
1 गोस्ट हाये पृथिविमोलाची..
2 वाटेवरती काचा गं..
3 वादे वादे न जायते गूगललाभ:
Just Now!
X