संहिता जोशी

आंतरजालावर कोणी कुठलं पान किती वेळ वाचलं, कोणी काय विकत घेतलं, ते स्वत:साठी विकत घेतलं का.. या माहितीचा समावेश असलेल्या विदेवरून काही गणितं, काही ठोकताळे मांडले जातात. गूगल, अ‍ॅमेझॉन यांनीही व्यवसाय वाढवताना ही गणितं करण्याची क्षमता वाढवली! पण, आंतरजाल-शोधात सुरुवातीलाच दिसणाऱ्या दुव्यांना प्रतिसाद जास्त मिळतो, हे लक्षात आल्यावर जाहिरातींद्वारे धंदाही सुरू झाला..

गेल्या दोन लेखांमध्ये मशीन लìनगच्या एका प्रकारच्या उपयोगाबद्दल माहिती घेतली. या लेखात त्याचा आणखी एक उपयोग, शिफारसपद्धती (रेकमेंडर सिस्टम्स), कशा चालतात आणि त्यामागचं तत्त्व काय ते बघू.

विदाविज्ञान (डेटा सायन्स) शिकायचं का नाही, असा विचार मी करत होते तेव्हा एकीनं सुचवलं, ‘तुझ्या गावात शिकण्याच्या आणि नोकरीच्या संधी आहेत ते गूगल करून का बघत नाहीस?’ तिनं माझ्याकडे गूगलची शिफारस केली. (वास्तविक गूगल एवढं प्रसिद्ध आणि सर्वव्यापी आहे की त्याला शिफारस म्हणावं का उपाय, हा निराळा प्रश्न.) मूलभूत गरजांपासून, शिक्षण, नोकरी, करमणूक, लग्न, अशा अनेक बाबतींत लोक आपल्याला शिफारशी करतात, आपणही करतो. आपल्याला काय आवडतं, त्यांतलं समोरच्या व्यक्तीला काय आवडेल, शोभेल, झेपेल याचा विचार करून या शिफारशी आपण करतो.

याचं गणित मांडता आलं तर त्याचाच व्यवसाय सुरू करता येईल किंवा आहे त्या व्यवसायात शिफारशींचं गणित वापरून उत्पादनं, सेवा सुधारता येतील. फेसबुक किंवा ट्विटर आपण कोणाचं म्हणणं वाचावं याच्या शिफारशी करतात. नेटफ्लिक्स कोणते सिनेमे, मालिका आवडतील हे सुचवतं. अ‍ॅमेझॉन, ईबे, अलिबाबा त्यांच्या दुकानातल्या वस्तूंच्या शिफारशी करतात.

तत्त्वत: शिफारशींचं गणित व्यापारी तत्त्वावर करायला सुरुवात गूगलनं केली असं म्हणता येईल. सुरुवातीला, २००४ पर्यंत, आंतरजालावर शोधाशोध करण्यासाठी इतरही सेवा होत्या. अडछ, ं२‘्नी५ी२, याहू आणि इतरही काही शोधसेवा गूगलच्या आधी, आसपास होत्या. त्यांतल्या काही अजूनही शिल्लक आहेत, पण त्यांची नावं हवीत म्हणून ती मला गूगलावी लागली. ही नावं आता कोणाला फार माहीतही नाहीत.

सुरुवातीला शोधइंजिनं निराळ्या पद्धतीनं चालत असत. समजा, कोणी आंतरजालावर (इंटरनेट) शोधलं – ‘बाबासाहेब आंबेडकर’. तर दोन्ही शब्द असणारी सगळी पानं सुरुवातीला दिसायची; मग नाव-आडनावांतला एकच शब्द सापडेल अशी पानं. एखाद्या पानावर डॉ. आंबेडकरांचं संपूर्ण चरित्र किंवा लेखन असेल आणि एखाद्या पानावर फक्त नाव असेल तर त्या पानांमध्ये काहीही डावं-उजवं ठरवण्याची सोय शोधइंजिनांमध्ये नव्हती. २००४ साली गूगलनं नवी सॉफ्टवेअर यंत्रणा आणली. हा असाच शोध घेणाऱ्या लोकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पान कोणतं, शोधल्यावर ते सगळ्यात आधी दाखवायचं. यासाठी किती लोकांनी कोणती पानं सगळ्यात आधी उघडली; मग त्या पानातून उपयुक्त माहिती मिळाली नाही म्हणून पुढचं पान उघडलं, अशी सगळी माहिती गोळा करून ती वापरायला सुरुवात केली. लोकांना काय आवडतं, काय हवं असतं, याचं गणित गूगलनं सगळ्यात आधी सुरू केलं.

आंतरजालावर शोधणं, याला ‘गूगलणं’ असं क्रियापद (इंग्लिशमध्येही- ‘टु गूगल’) तयार होण्यामागचं मूलभूत कारण हे आहे. लोकप्रिय होण्यासाठी, लोकप्रियतेचे आकडे गूगलनं गोळा केले आणि वापरले. याला समूहाचं शहाणपण म्हणता येईल किंवा दुसऱ्या टोकाला जाऊन झुंडीचं लांगूलचालन म्हणता येईल. (काही काळापूर्वी idiot असं गूगलल्यावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पचे फोटो गूगल दाखवत होतं. ज्यांना ट्रम्प आवडत नाही त्यांना हे समूहाचं शहाणपण वाटेल, ज्यांना ट्रम्प आवडतो त्यांना ही आंतरजालीय झुंडशाही वाटेल. गूगलचे प्रमुख सुंदर पिचई यांना याबद्दल अमेरिकी लोकसभेत उत्तर द्यावं लागलं होतं; गूगलच्या कर्मचाऱ्यांचा यात काही हात नाही, हे त्यांना पटवून द्यावं लागलं.)

दुसरं उदाहरण देता येईल, अ‍ॅमेझॉनचं. हे आंतरजालावरचं सुपरमार्केट. अ‍ॅमेझॉनवर काय मिळत नाही! सुरुवातीला अ‍ॅमेझॉनवर ज्या वस्तू विकायला होत्या, वस्तूंबद्दलचे अभिप्राय त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून किंवा त्या-त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून लिहवून घेतलेले होते. मग अ‍ॅमेझॉन लोकप्रिय व्हायला लागल्यावर त्यांनी हे धोरण बदललं. आता अ‍ॅमेझॉनवर या वस्तूंबद्दल गिऱ्हाईकंच लिहितात; ठरावीक वस्तू आवडली की नावडली, त्याचं कारण काय, वगैरे. समजा, फोनचं कव्हर घ्यायचं आहे. अ‍ॅमेझॉन कोणत्या रंगाचं, कंपनीचं कव्हर आपल्याला सगळ्यात आधी दाखवेल हे आत्तापर्यंतच्या ग्राहक-प्रतिसादावरून ठरतं. ज्या कव्हराबद्दल बरेच लोक चांगलं बोलत आहेत, ते सुरुवातीला दिसेल; ज्यावर टीका जास्त असेल ते खाली जाईल.

यात विक्रेत्यांना लक्षात आलं की, किमतीपेक्षाही जी वस्तू वर दिसते ती सगळ्यात जास्त वेळा विकत घेतली जाते. सगळ्यांत स्वस्त आणि मस्त कव्हर आतल्या, चौथ्या पानावर वगैरे ढकललं गेलं तर ते फार विकलं जाणार नाही. विकलं गेलं नाही, तर त्यावर फार ग्राहक-प्रतिसाद येणार नाहीत; तशानं ते पुढे येणार नाही. यावर इलाज म्हणून अ‍ॅमेझॉनवर (आणि गूगलवरही) जाहिरातींची सोय आहे. थोडे पैसे देऊन आपलं उत्पादन, आपलं आंतरजालपान (वेबपेज) सगळ्यात वर, पहिल्या पानावर दाखवता येतं.

समूहानं नाकारलेली गोष्ट फार प्रसिद्ध होणार नाही किंवा विकली जाणार नाही, असा याचा अर्थ आहे. आंतरजालाला माध्यमांचं लोकशाहीकरण म्हणतात, त्याची ही उदाहरणं आहेत. खोटी, चुकीची, अर्धवट माहिती देणारं पान आंतरजालावरून गायब होत नाही; पण गूगलल्यावर ते सहज सापडत नाही किंवा कमी दर्जाची वस्तू अ‍ॅमेझॉनच्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचत नाही; त्यामुळे ती विकली जात नाही. यातलं तंत्रज्ञान गूगल, अ‍ॅमेझॉनच्या मालकीचं आहे; या वस्तूंचा ताबा किंवा लेखनाचा प्रताधिकार त्या-त्या लोकांकडे आहे आणि काय वाचलं-विकलं जाईल याचा ताबा समाजाच्या हातात आहे.

आपण आपली विदा (डेटा) गूगल आणि अ‍ॅमेझॉनला दिली आणि त्याबदल्यात आपल्या हातात काय म्हणलं-विकलं जाईल याचा ताबा आला. गूगलवरही ‘प्रायव्हेट मोड’मध्ये शोध घेता येतो. यात कोणत्या वेळी, कोणत्या गावातून हा शोध घेतला गेला याची नोंद गूगलकडे झाली तरी आपल्या ईमेल पत्त्याशी हे जोडलं जात नाही. अ‍ॅमेझॉनवर एखादी वस्तू खरेदी केली, पण ती आपल्यासाठी नसेल तर ती भेटवस्तू आहे, असं नोंदवता येतं.

समजा, मी मित्रासाठी दाढीचं यंत्र विकत घेतलं, तर अ‍ॅमेझॉन पुढच्या वेळेस मला त्याच्या रिफिल-ब्लेडची जाहिरात दाखवेल; पण त्यात मला काही रस नसेल; ती जाहिरात बघण्यात माझा वेळ फुकट जाईल. अ‍ॅमेझॉनचाही त्यात काही फायदा नाही. समजा, मी अ‍ॅमेझॉनला सांगितलं, की ही भेटवस्तू आहे, तर माझ्यासाठी निवडलेल्या जाहिराती दाखवताना अ‍ॅमेझॉन दाढीचं यंत्र गणितातून वगळून टाकेल.

अ‍ॅमेझॉनवरून खरेदी करणाऱ्या अमेरिकी लोकांची संख्या साधारण १० कोटी आहे; तीन अमेरिकी व्यक्तींपैकी एक अ‍ॅमेझॉन वापरते. त्यांचा गेल्या वर्षांतला निव्वळ नफा होता एक अब्ज डॉलर; प्रत्येक ग्राहकामागे साधारण १०० डॉलर किंवा साधारण ७५०० रुपये. आपली विदा वापरून, अ‍ॅमेझॉनला झालेला नफा सगळ्या ग्राहकांमध्ये समान वाटला तर माणशी ७५०० रुपये मिळतील. फेसबुकचे वापरकत्रे आणि नफा बघितला तर, माणशी साधारण तीन डॉलर किंवा २२५ रुपये होतात.

अ‍ॅमेझॉन किंवा फेसबुक वापरणाऱ्या कोणत्याही माणसाचं आयुष्य एवढय़ा तुटपुंजा पशांत बदलून जाईल, असं मला वाटत नाही. या नफ्यात हिस्सा मागण्याऐवजी आपण निर्णयप्रक्रियेत हिस्सा मागितला पाहिजे. आपली विदा वापरून आपला, सामान्य लोकांचा फायदा झाला पाहिजे; आपल्या खासगीपणावर आपला हक्क अबाधित राहिला पाहिजे.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com