|| संहिता जोशी

चारचौघांना किंवा ‘जनते’ला काही ऐकवू, सुनावू शकण्याची, आपली मतं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सत्ता समाजमाध्यमांमुळे आता आपल्यालाही अधिक मिळाली आहे.. आणि समाजमाध्यमांना आपल्या मतांवरची सत्ता मिळते आहे! सामाजिक न्याय, समता, समान संधींची उपलब्धता या मूल्यांना सुरुंग लावण्याचे प्रयत्न समाजमाध्यमं, विदाविज्ञान वापरून जगभर सुरू झाले आहेत. हा बेजबाबदारपणा समाजमाध्यमांनी थांबवावा, यासाठी लोकांनी सजग राहायला हवं..

There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
shani surya yuti in kumbh rashi ended
शनि-सूर्याची युती संपली; या राशींचे लोक होतील मालामाल, मिळणार अमाप पैसै

‘शेकडो फुलं फुलू देत आणि शेकडो मतमतांतरं होऊ देत,’ असं कम्युनिस्ट चीनचा प्रणेता, चेअरमन माओ झेडाँग अनेकदा भाषणांत म्हणत असे. समाजमाध्यमांमुळे अनेकांना आपली मतं जाहीरपणे मांडण्याची संधी मिळत आहे. यातला विरोधाभास आपण भारतीयांनी वगळायला हरकत नाही.

यातून फेसबुक, ट्विटर, रेडिट, गूगल, मायक्रोसॉफ्ट अशा वेगवेगळ्या कंपन्यांना सत्ता मिळते. या कंपन्यांचा ताबा असणाऱ्या व्हर्च्युअल अवकाशात, समाजमाध्यम किंवा शोधइंजिनांवर आपण आपली मतं मांडतो. कोणाची मतं, कोणत्या बातम्या आपल्याला दिसणार; आंतरजालावर शोध घेतल्यावर आपल्यासमोर काय मजकूर ठसठशीतपणे मांडला जाणार हे या कंपन्या ठरवतात. यात साबणासारख्या स्वस्त आणि साध्या वस्तूंच्या जाहिराती दिसतात, तेव्हा त्या जाहिराती आहेत असं बहुतेकदा दिसतं. मात्र एखादी विचारधारा आपल्याला विकली जाते तेव्हा ती जाहिरात आहे, असं स्पष्टपणे कधीच सांगितलं जात नाही. आपल्या विचारकूपाच्या बाहेरची मतं आपल्याला दिसत आहेत का नाहीत; हे आपल्याला सांगितलं जात नाही. विदाविज्ञानातली अनेक अल्गोरिदम्स कसा निर्णय घेतात, हे त्यावर काम करणाऱ्या विदावैज्ञानिकांना समजतं; पण ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जात नाही, ना आपल्याला त्यात मुखत्यारी असते.

आंतरजाल, समाजमाध्यमांवर अनेक छोटी छोटी सत्ताकेंद्रं तयार होतात. आपण काही लिहितो, काही गूगलून बघतो, त्याचा परिणाम आजूबाजूच्या लोकांवर होतो. आतापर्यंत बहुतेकांना फार तर ऑफिसात चहासोबत मतप्रदर्शन करण्याची, चच्रेचा ताबा घेण्याची आणि सत्ताकेंद्र बनण्याची संधी मिळत होती. समाजमाध्यमांमुळे या संधीची उपलब्धता फारच वाढली आहे. आपल्यापैकीअनेकांना अनेक बाबतींत मतं होतीच; ती मोठय़ा समुदायासमोर मांडण्याची संधी आंतरजाल, समाजमाध्यमांमुळे मिळत आहे.

आपली मतं लोकांसमोर मांडता आल्यामुळे, चार लोकांवर प्रभाव पाडता आल्यामुळे आपल्याला थोडी सत्ता मिळते. ज्यांच्या यादीत जास्त लोक त्यांना जास्त लोकांवर प्रभाव पाडता येणार, त्यांची सत्ता अधिक. सिनेमानटांनी काहीही सुसंबद्ध किंवा असंबद्ध विधान केलं तरी त्याला प्रसिद्धी मिळते, कारण सत्ता. सत्ता फक्त निवडणुकांशी संबंधित राजकारणाशीच जोडलेली असते असं नाही. आपल्या मनांवर, मतांवरची सत्ता विदा-कंपन्यांकडे एकवटलेली आहे. आपल्याला काय आवडतं, कोणत्या विधानाकडे आपण लक्ष देतो, हे त्यांना माहीत आहे; किंवा गोळा केलेल्या विदेतून त्यांना हे शोधून काढता येईल.

‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’, रशियन बॉट्स वगरे प्रकरणं फक्त अमेरिकी निवडणुकांमध्ये झाली असं नाही. ही प्रकरणं गाजली कारण अमेरिका ही जगातली एक प्रबळ लोकशाही आहे. जगातल्या इतर बऱ्याच लोकशाही देशांमध्ये ढवळाढवळ करण्याचे, समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न देशांतर्गत व्यवस्था, संस्था, व्यक्तींकडून किंवा इतर देशांमधून केले जात असतात. या सगळ्यांचं माध्यम आंतरजाल आणि मुख्यत: समाजमाध्यमं आहेत. भारतात आपण कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. यात सामाजिक न्याय, समता, समान संधींची उपलब्धता, अशा गोष्टी अंतर्भूत आहेत. समाजमाध्यमं, विदाविज्ञान वापरून सध्या या मूल्यं आणि धारणांनाच सुरुंग लावण्याचे प्रयत्न जगभर सुरू झाले आहेत.

सत्तेमध्ये मोठा वाटा असणाऱ्या फेसबुकनं आपली जबाबदारी सातत्यानं नाकारली आहे; अगदी याच महिन्यात ट्विटरनं राजकीय स्वरूपाच्या जाहिराती नाकारून, आपला नफा कमी होईल याची जोखीम पत्करून ही जबाबदारी स्वीकारली. आपण विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानाचा समाजावर, सामाजिक मूल्यं आणि धारणांवर काय परिणाम होईल याचा आधी विचार करण्याची वृत्ती तंत्रज्ञान कंपन्यांकडे नाही. सर्वसाधारणपणे प्रकल्पांचे मॅनेजर नफा कसा वाढेल याचा विचार करतात; तंत्रज्ञान तयार करणारे स्वत:च्या व्यक्तिगत विकासाच्या आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा विचार करतात.

आपल्याला सगळ्यांना सत्तेत थोडा थोडा वाटा देणारं, सत्तेचं काही अंशी लोकशाहीकरण करणारं असं समाजमाध्यमाचं तंत्रज्ञान तयार करणाऱ्यांना नफा आणि सत्ता हवी आहे, पण त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची अजूनही पुरेशी जाणीव नाही. सत्ता जास्त तेवढी जबाबदारी जास्त. पण बहुतेकदा अशा प्रकारची सत्ता असलेल्या लोकांना आपल्याकडे सत्ता आहे, पर्यायानं आपली काही जबाबदारी आहे याची जाणीवच नसते. चारचौघांत बेताल, बेजबाबदार विधानं करणारे राजकीय नेते आपल्याला टीकेचं लक्ष्य म्हणून आवडतात. मात्र आपणही त्यांच्यासारखंच बेजबाबदार वर्तन अनेकदा करतो.

समाजमाध्यमांवर बनावट बातम्या मोठय़ा प्रमाणावर फिरतात आणि भरभर पसरतात. बातमीतला मजकूर आपल्याला आवडेलसा असेल तर बातमीची सत्यासत्यता आपण बघत नाही. लेखात मांडलेलं मत आपल्या मताला दुजोरा देणारं असेल तर लगेच त्याचा स्वीकार करतो. बनावट बातम्या आणि समाजात फूट पाडणारी मतं खोडून काढण्याचं मोठं काम अभ्यासू लोकांना करत बसावं लागतं. एकाच विषयावरचे, दोन-चार निरनिराळी आणि अभ्यासपूर्ण मतं मांडणारे लेख किंवा विश्वासार्हता असणाऱ्या बातम्या, उठवळ लेख आणि बनावट बातम्यांसोबत दाखवणं सध्याच्या तंत्रज्ञानानुसार सहज शक्य आहे. यात चांगलं-वाईट काय हे ठरवण्याची जबाबदारी माध्यमावर राहात नाही; आणि शोधाशोध करण्याची जबाबदारी सामान्य लोकांवर पडत नाही. अशासारखे तंत्राधिष्ठित, मात्र अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपणारे, मूल्याधिष्ठित आणि सहृदय पर्याय शोधणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं ही सत्ताधारी-समाजमाध्यमप्रमुखांची जबाबदारी मानली पाहिजे. तंत्रज्ञानातल्या नव्या सोयीमुळे आपला ग्राहकवर्ग किती वाढला हे कंपन्या शोधतात, पण आपल्यामुळे किती बनावट बातम्या पसरल्या किंवा एखाद्या समाजात किती फूट पडली याचा अभ्यास कंपन्या करत नाहीत.

सत्तेचं विभाजन करण्याबद्दल, लोकशाही मूल्यांबद्दल समाजमाध्यमांचे प्रवर्तक जागरूक आहेत. पण आपल्या स्वत:च्या लोकशाहीप्रति असणाऱ्या जबाबदारीचं पुरेसं आकलन त्यांना नाही. सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या करणं आपल्याला रास्त वाटतं. कारण समाजाच्या भल्याचे निर्णय घेणं ही सरकारी जबाबदारी आहे. कायदे करून त्यांची अंमलबजावणी करणं, ही सर्वात मोठी ताकद आणि सत्ता सरकारकडे असते. काहीशी तशासारखी सत्ता आज विदासम्राज्ञी/ सम्राटांकडे आहे. आपली विदा जमा करून आपल्याला वस्तू आणि विचारधारा विकणाऱ्या समाजमाध्यमांना जबाबदारीची जाणीव नसेल तर ती करून देणं हे आपलं काम आहे. समाजमाध्यमांवर हिरिरीनं वाद घालणाऱ्या आपण शांत, स्थिर आयुष्य, सहृदय समाज, लोकशाही मूल्यं या आता मूलभूत गरजा मानल्या पाहिजेत.

‘द न्यू यॉर्कर’ हे अमेरिकेतलं प्रतिष्ठित नियतकालिक. लेखातल्या घटना आणि तपशिलाची सत्यता तपासल्याशिवाय ते काहीही छापत नाहीत. ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यावर त्यांनी पुढच्या काही अंकांत छापलं होतं – ‘फक्त आमचे लेख वाचू नका. इतरही अनेक प्रतिष्ठित माध्यमं आहेत, तीही वाचा.’ मीही तेच म्हणेन.

सदर लेखमाला हे एका व्यक्तीचं आकलन आहे. विदाविज्ञान हा विषय फक्त गणित, सांख्यिकी आणि संगणकशास्त्राशी संबंधित नाही; विदाविज्ञान आणि विदातंत्रज्ञान आज आपल्या आयुष्याशी संबंधित बहुतेक सगळ्या गोष्टींवर प्रभाव पाडत आहे. वेगवेगळ्या विषयांतल्या अनुभवी व्यक्तींनी आपापल्या विषयांचा खोलवर विचार केलेला असतो. असे अनेक विचारी लोक लिहीत असतात. त्यांचं लेखन वाचा; त्यावर विचार करा. अनेकांची मतं ऐकून घ्या. आपण सारासार विचार केला नाही तर विदाविज्ञानाचा आपल्याला फायदा नाही. विदाविज्ञान असलेले पॅटर्न तेवढे गिरवतं. ते आपल्याला नवीन मूल्यं, विचार देत नाही.  स्वतंत्र विचार करण्याची प्रज्ञा फक्त आपल्याकडेच आहे.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com या लेखासह, ‘विदाभान’ ही लेखमाला समाप्त होत आहे.