||  संहिता जोशी

टिकटॉकनं खूप विदा जमा केली आहे. त्यातून ते काय करू शकतात? आपण आपापल्या घरांत, देशांत बसून जे व्हिडीओ तयार करतो, त्यावरून चिनी अभियंते चेहऱ्यावरचे हावभाव, मन:स्थिती ओळखायला शिकत आहेत.

हे अमेरिकी कंपन्याही आजवर करतच होत्या; पण आता हेच सारं चीनमधून सुरू आहे.. म्हणजे, ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्या’ऐवजी ‘सामाजिक गुणव्यवस्थे’ला महत्त्व देणाऱ्या देशातून!

तुम्हाला ‘टिकटॉक’ माहित्ये का? मला पहिल्यांदा त्याची फेसबुकवर जाहिरात दिसली होती, ती बघून हसावं का संतापावं हे समजत नव्हतं. जाहिरातीचा व्हिडीओ दिसला; लाल साडीतली एक भारतीय अगदीच ‘भयभीषण’ नाच करत होती. ते बघून हसणं स्वाभाविक होतं. पण मी असले काही व्हिडीओ बघेन असं फेसबुकला वाटलं म्हणून संतापायला हवं का, असंही वाटलं. त्या नाचातला विचित्रपणा अविश्वसनीय होता; मी त्यावर हसायचं ठरवलं.

टिकटॉक हे ‘बाइटडान्स’ नावाच्या चिनी कंपनीचं अ‍ॅप आहे. त्यावर व्हिडीओ पोस्ट केले जातात. व्हिडीओ फार मोठे नसतात आणि हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सज्ञान (वाचा- म्हातारे) आहात! टिकटॉक हे सध्याचं ‘सगळ्यात तरुण समाजमाध्यम’ समजलं जातं.

या वर्षांच्या पहिल्या तिमाहीत टिकटॉक १८ कोटी वेळा डाऊनलोड झालं; त्यांपकी साधारण निम्मे (४७.५ टक्के) भारतात आहेत. फेसबुकचं अ‍ॅप १७ कोटी वेळा डाऊनलोड झालं आहे; त्यांतले साधारण २० टक्के भारतीय आहेत. किमान तीन भारतीयांचा टिकटॉक बनवताना अपघाती मृत्यू झाला. एप्रिलमध्ये चेन्नई उच्च न्यायालयानं टिकटॉकवर देशभरात बंदी घालण्याचा आदेश दिला, म्हणून काही दिवस टिकटॉक नव्याने डाऊनलोड होणं थांबलं होतं. पॉर्नोग्राफिक किंवा अतिहिंस्र जाहिराती आहेत, आणि टिकटॉकवर १३-१८ या अज्ञान वयाची मुलंही असू शकतात, या कारणासाठी टिकटॉकवर बंदी आली. या सगळ्यात ‘संस्कृती बुडते’ असा एक आरोप असतोच. ही बंदी फार दिवस टिकली नाही आणि टिकटॉक परत भारतात आलं. त्यापुढे #ReturnOfTikTok असा हॅशटॅग इतर समाजमाध्यमांवर – फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर – चालवणाऱ्यांपकी, लोकप्रिय तीन लोकांना दर दिवशी काही हजार ते एक लाख रुपये देऊ केले गेले.

टिकटॉकचं लक्ष यूएस, जपान आणि विशेष करून भारताकडे आहे. मोठी बाजारपेठ, तरुणांना वाटणारं तंत्रज्ञानाचं वाढतं आकर्षण आणि तंत्रज्ञानाची वाढती उपलब्धता, या तिन्ही कारणांसाठी टिकटॉकला भारताचं आकर्षण वाटू शकतं. अमेरिकेत आता काही संगीतकारांनी खास टिकटॉकसाठी गाणी आणि संगीत लिहायला सुरुवात केली आहे. हे व्हिडीओ बहुतेकदा गाण्यांबद्दल असल्यामुळे ‘दोन दिवसांत बातमी शिळी होते’, तेवढं दडपण टिकटॉकवर नसतं. नव्या तबकडय़ा, रेकॉर्ड्स बाजारात आल्या तेव्हा गायनकलेनं त्या तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करूनही घेतला; टिकटॉकमुळे संगीत, नाचावर काय परिणाम होईल, हे दिसायला वेळ लागेल.

तोवर टिकटॉकबद्दल एवढं लिहिण्याचं कारण काय?

टिकटॉक अजूनही नफा कमावत नसलं, ती स्टार्टअप कंपनीच असली, तरीही २०१९ या वर्षांत फेसबुकपेक्षाही अधिक लोकप्रिय कंपनी ठरली आहे. लोकप्रिय आहे, याचा अर्थ त्यांच्याकडे मोठय़ा प्रमाणावर विदा आहे. त्यामुळे फक्त पॉप-आर्ट कसं बदलत जातं, या मर्यादित अभ्यासापेक्षाही त्याचा मोठा परिणाम आपल्यावर होऊ शकतो, याचा विचार लेखमालेसंदर्भात करणं आवश्यक आहे.

टिकटॉकचं मुख्यालय चीनमध्ये आहे; टिकटॉकचं सगळं तंत्रज्ञान चीनमध्ये विकसित होतं. विदाविज्ञान क्षेत्रात हे तंत्रज्ञान नेमकं कोणतं – संगणकदृष्टी किंवा कम्प्युटर व्हिजन. फेसबुकवर फोटो अपलोड केला की बहुतेकदा फेसबुक चेहऱ्यांवर चौकोन दाखवून विचारतं, ‘इथे अमुक माणसाला टॅग करू का?’ बहुतेकदा चेहरा आणि नाव यांच्या जोडय़ा जुळवणं फेसबुकला जमतं. हे संगणकदृष्टीचं एक उदाहरण. फोटोंमध्ये हे दिसणं तसं सोपं असतं. व्हिडीओंमध्ये हे काम आणखी कठीण होतं. कारण फोटोपेक्षा व्हिडीओमध्ये बरीच जास्त माहिती असते. हेच कारण आहे, ‘टिकटॉक या विदेचं आणि ज्ञानाचं नक्की काय करणार,’ हा प्रश्न विचारण्यामागचं!

विदेच्या बाबतीत बघितलं तर असं दिसेल की गेल्या दशकाच्या सुरुवातीला ज्या तंत्रकंपन्या आघाडीवर होत्या; पण ज्यांनी विदा गोळा करणं, साठवणं आणि तिचा वापर करणं यांत आघाडी घेतली नाही; त्या आता बऱ्याच मागे पडल्या आहेत. क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये अ‍ॅमेझॉन, जालशोधात गूगल, समाजमाध्यमांत फेसबुक (आता टिकटॉकही) या आघाडीच्या कंपन्या आहेत. २० वर्षांपूर्वी आघाडीवर असलेल्या मायक्रोसॉफ्ट आणि नोकिया यांनी विदेच्या क्षेत्रात फार काही केलं नाही; आता त्या मागे पडल्या आहेत. मोठय़ा प्रमाणावर लोकप्रियता असल्यामुळे टिकटॉकनं खूप विदा जमा केली आहे. त्यातून ते काय करू शकतात?

माणसांचे चेहरे बघून नाव ओळखणं आता तसं ‘जुनं’ झालं; चेहऱ्यावरचे भाव बघून मन:स्थिती ओळखणं सध्या जोरात आहे. अ‍ॅमेझॉननं अशी सेवा देणार असल्याचं हल्लीच जाहीर केलं. शिवाय कोण, कुठे, कुठल्या वेळेस, काय मूडमध्ये होते, हे शोधता येणं सोपंच.

एका महत्त्वाच्या मुद्दय़ाबद्दल मी पुन्हा लिहिणार आहे. आपल्याकडे किती जास्त विदा आहे, हे महत्त्वाचं नाही. त्या विदेतून काय माहिती मिळवणार आणि त्या माहितीचं काय करणार, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. विदेला योग्य प्रश्न विचारले नाहीत तर विदेतून अशास्त्रीय किंवा असंबद्ध माहिती मिळवणंही कठीण नाही.

टिकटॉकचं मुख्यालय चीनमध्ये आहे; बहुतेकसं अभियांत्रिकी काम चीनमध्ये होतं. आपण आपापल्या घरांत, देशांत बसून जे व्हिडीओ तयार करतो, त्यावरून चिनी अभियंते चेहऱ्यावरचे हावभाव, मन:स्थिती ओळखायला शिकत आहेत. आजवर अमेरिकी कंपन्या जे करत होत्या, ते आता चिनी कंपन्याही करत आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये एक मोठा फरक आहे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा.

चीननं आता ‘सामाजिक गुणव्यवस्था’ तयार केली आहे. त्यात मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम प्रज्ञेचा (ए.आय.) वापर होतो. कोणी सिग्नल तोडला, कोण रस्त्यात थुंकलं, अशा साध्या प्रश्नांपासून कोण विगुर (Uighur)  मुसलमान आहेत, ते कसे वागतात, इथपर्यंत सगळ्यासाठी सीसीटीव्ही, संगणकदृष्टीचा उपयोग होऊ शकतो. चीनमध्ये सध्या विगुर मुसलमानांचा संस्कृतिसंहार आणि हाँगकाँगच्या एकत्र-पण-स्वतंत्र अस्तित्वासाठी लढा अशा दोन चळवळी, उलथापालथ घडवून आणणाऱ्या गोष्टी सुरू आहेत. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आवडणार नाही अशी भूमिका चीन सरकारनं दोन्ही बाबतीत घेतलेली आहे. आणि या सगळ्यांत उपयोग होतो संगणकदृष्टी, कृत्रिम प्रज्ञा आणि एकंदरच विदाविज्ञानाचाही.

ट्विटर, इन्स्टाग्रामवर ज्या प्रमाणात हाँगकाँगच्या निदर्शनांचे व्हिडीओ आहेत, त्यापेक्षा टिकटॉकवर हे प्रमाण फारच कमी आहे. टिकटॉकवर पुतिन, ट्रम्प, ओबामा आणि महात्मा गांधी यांच्याविषयी व्हिडीओ लावण्यास मनाई आहे. (हे सगळे पुरुष एरवी एका यादीत दिसणं कठीण होतं.) तियानानमेन चौक, कंबोडियातला जनसंहार, इंडोनेशियातल्या १९९८ च्या दंगली यांच्याबद्दल बोलण्याचीही बंदी आहे. तरीही टिकटॉकचे सव्‍‌र्हर चिनी सेन्सॉरचा उपद्रव टाळण्यासाठी चीनच्या बाहेर आहेत.

भारतीय म्हणून आपण आपली विदा कोणाच्या दावणीला बांधायची, सार्वभौम देशाचे नागरिक म्हणून आपली काही मतं असावीत का, असे प्रश्न यातून उभे राहतात.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.  ईमेल : 314aditi@gmail.com