12 July 2020

News Flash

गोंगाटाचा फायदा कोणाला?

मला लहानपणच्या बातम्या अंधूकशा आठवतात. मुंबईतल्या समाजवादी नेत्या महागाईविरुद्ध आंदोलनं करायच्या.

||  संहिता जोशी

आपण तद्दन गोंगाटाला जास्त महत्त्व देत असू, तर तंत्रज्ञान वापरून आपल्याला तोच आणखी सजवून वाढला जातो. ज्यांची सद्दी सध्या आहे, त्यांना ही सद्दी टिकवण्यासाठी गोंगाट उपयोगी पडतो. जे आहे त्याकडेच लक्ष दिलं जातं.. काय नाही? नसण्याची कारणं काय? हे प्रश्न उद्भवतसुद्धा नाहीत..

कॅमेऱ्यांचा शोध लागला तेव्हा हातानं जसंच्या तसं चित्र काढणं ही कला राहिली नाही; ते कौशल्य ठरलं. त्यातून चित्रकला बदलली; तिला नवीन दिशा मिळाली. तरीही चित्रकला अजूनही हातानं करण्याची कला राहिली, ती स्वयंचलित कौशल्य झालं नाही. (चित्रकला आणि) फोटोग्राफी सुरुवातीला फक्त श्रीमंतांना परवडत होती. आता ज्यांच्या हातात फोन आहे, त्यांना फोटोग्राफी परवडते. ‘सेल्फी’ हा शब्द २०१३ साली पहिल्यांदा वापरला असं समजलं जातं. २०१४ साली जेआर एवढय़ाच नावानं प्रसिद्ध असलेल्या कलाकारानं पॅरिसमधल्या पॅन्थिअनची आतली बाजू लोकांनी पाठवलेल्या ४००० सेल्फी वापरून सजवली. पहिला फोटो काढला गेला, त्याला अजून २०० वर्षही झालेली नाहीत; तेवढय़ा काळात फोटोग्राफीची कला (कौशल्य निराळं) आणि तिचा वापर झपाटय़ानं बदलला.

याचं मुख्य कारण आहे, फोटोग्राफी फार स्वस्त झाली आणि तंत्रज्ञानामुळे आपले फोटो लोकांना दाखवणंही सोपं झालं. तंत्रज्ञानामुळे इतर कोणी आपलं कलाकौशल्य निवडून संग्रहालयात ठेवण्याची गरज राहिली नाही. हे तेच तंत्रज्ञान, ज्यामुळे बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राची वाट पाहण्याची गरज राहिली नाही. त्या बातम्यांबद्दल आपलं मत व्यक्त करण्यासाठी नाक्यावर जाण्याची गरज राहिली नाही.

आपली कला, कौशल्यं आणि मतं लोकांसमोर आणण्यात ठरावीक लोकांची मक्तेदारी होती; प्रकाशनसंस्था, कलादालनांची मक्तेदारी तंत्रज्ञानामुळे कमी झाली. त्याबरोबर आपल्या मतांची ज्यांना गरज असते, त्यांनाही बसल्या जागी आपली मतं समजू लागली आहेत. अधूनमधून होणाऱ्या सभांना मिळणारा प्रतिसाद वा नाराजीतून होणाऱ्या आंदोलनांची वाट बघण्याची गरज राहिलेली नाही. गेल्या काही लेखांमध्ये गूगल ट्रेंड्सचा उल्लेख होता; त्यातून लोकांच्या मतांचा रेटा कोणत्या दिशेला आहे हे लगेच, दोन-चार तासांतही समजतं. ट्विटरवर कोणते हॅशटॅग लोकप्रिय आहेत आणि फेसबुकवर कोणत्या विषयावरच्या, काय मताला कितपत प्रतिसाद मिळाला, अशी माहिती सहज मिळते.

त्यासोबत ‘शेणानं किरणोत्सार रोखला जातो’; ‘गाईच्या उच्छ्वासातून ऑक्सिजन बाहेर टाकला जातो’; ‘हिंदू स्त्रियांनी दहा-दहा मुलं जन्माला घालावीत’.. अशासारखी तद्दन भंपक व घातक विधानंही मोठय़ा प्रमाणावर चच्रेला येत असतात. ‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठा’त असल्या बातम्या, मतं नियमितपणे येत राहतात. ही विधानं करण्यात राजकारणीही मागे नाहीत. व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या आधी असल्या गोष्टींची दखल कोणीही घेत नसतील; वर्तमानपत्रात छापून येत नसतील. याविषयी समाजमाध्यमांवरच्या अनेक चर्चा ‘ते चुकीचं बोलत आहेत, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे’ अशा छापाच्या असतात.

मला लहानपणच्या बातम्या अंधूकशा आठवतात. मुंबईतल्या समाजवादी नेत्या महागाईविरुद्ध आंदोलनं करायच्या. अधूनमधून सातत्यानं अशा प्रकारची बातमी असायची. लोकांच्या आयुष्यावर महत्त्वाचा परिणाम घडवेल अशी कोणतीही बातमी हल्ली दोन-चार दिवसांच्या वर दिसत नाही. सध्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार, या विषयाचा सणसणीत अपवाद.

नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. त्यापुढे पाचेक महिने- मार्च २०१७ पर्यंत भारतीयांनी या विषयासाठी गूगल वापरलं, असं आकडय़ांमध्ये दिसतं. जीएसटी जुलै २०१७ मध्ये लागू झाला. त्याबद्दल गूगलण्याचं प्रमाण अजूनही ‘नॉइज’पेक्षा बरंच जास्त किंवा उल्लेखनीय असल्याचं दिसतं. दोन्हींचे दीर्घकालीन फायदे-तोटे समजायला आणखी काळ जावा लागेल. पण निश्चितच या दोन्ही निर्णयांचा लोकांच्या आयुष्यांवर मोठा परिणाम झाला. याबद्दल बातम्या व चर्चा किती असतात?

मराठी लोकांना कात्रजचा घाट ही जागा ऐतिहासिक कारणासाठीही माहीत असते. लाल महालात तळ ठोकलेल्या शाहिस्तेखानावर हल्ला करून पळून जाताना शिवाजी महाराजांनी चतुराईनं कात्रजच्या घाटात बलांच्या शिंगांना पलिते बांधून सोडलं होतं. शाहिस्तेखानाची दिशाभूल केली. पण शाहिस्तेखान स्वराज्याचा शत्रू होता. आपल्याला तद्दन ‘गोंगाट’ (नॉइज) ठरणाऱ्या चर्चामध्ये अडकवून दिशाभूल करणारे लोक कोण आहेत? यातून त्यांचा काय फायदा होतो?

आपल्याला मत लोकांसमोर व्यक्त करण्याची सहज सोय मिळालेली आहे. ती आपण कशी वापरतो? जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांचं वसतिगृह-शुल्क वाढवल्यामुळे देशाच्या तिजोरीवर आणि आपण करदात्यांवर किती भार पडतो, याची आकडेवारी आपण मागतो का? देशातल्या इतर विद्यापीठांना ‘जेएनयू’एवढा दर्जा का नाही? चांगली विद्यापीठं असणं आणि तिथे दर्जेदार शिक्षण मिळणं हा आपला हक्क असल्याची चर्चा त्यातून झडते का?

काही महिन्यांपूर्वी याच लेखमालेत वॉल्डच्या सिद्धांताचा उल्लेख केला होता. युद्धात गोळ्या लागून परत आलेली विमानं बघून विमानाचे कोणते भाग मजबूत करायला हवेत, याचा अभ्यास वॉल्ड करत होता. त्यानं म्हटलं, जिथे गोळ्या लागलेल्या दिसत नाहीत, तिथे गोळ्या लागलेली विमानं परत आलेली नाहीत. ते भाग मजबूत करायला हवेत.

काय दिसतंय, यापेक्षा काय दिसत नाहीये आणि ते का, असे प्रश्न समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतात. उदाहरणार्थ, भारतात विज्ञान क्षेत्रात फक्त १४ टक्के स्त्रिया संशोधन करतात. ५० टक्के स्त्रिया असणाऱ्या समाजात स्त्री-संशोधकांचं प्रमाण एवढं कमी का, उरलेल्या ३६ टक्के संशोधक स्त्रिया कुठे गेल्या, अशासारखे प्रश्न समाजशास्त्रज्ञ विचारतात. बॅनर्जी-डफ्लो यांच्या ‘पुअर इकॉनॉमिक्स’मध्येही अशासारख्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आहे.

मला चित्रकला जमली नाही; शाळेत चित्रं काढायचे तेव्हा पेन्सिलनं काढलेल्या सगळ्या रेघा काळ्या स्केचपेननं ठळक करायचे. विदाविज्ञान हे दिसणारे पॅटर्न आणखी ठळक करणारं शास्त्र आहे. विदाविज्ञानाचा हेतूच तो आहे. आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात, हे अगदी घडताघडता (रिअल टाइम) मोजता येतं. आपण तद्दन गोंगाटाला जास्त महत्त्व देत असू, तर तंत्रज्ञान वापरून आपल्याला तोच आणखी सजवून वाढला जातो. त्यात फक्त विदा आणि तंत्रज्ञान कंपन्यांना पसा, नफा मिळतो असं नाही; त्यातून सत्ताधाऱ्यांची सत्ता आणखी घट्ट होत जाते. सत्ता म्हणजे विधानसभा किंवा लोकसभा एवढाच मर्यादित अर्थ नाही.

विदाविज्ञानाच्या एका भागाला कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटलिजन्स) म्हटलं जातं. पण दिसणारा पॅटर्न गिरवून ठळक करणं ही ‘प्रज्ञा’ म्हणायची का? सामान्यत: यास आपण स्मरणशक्ती म्हणतो. २७ किंवा २९ चा पाढा घडाघडा म्हणून दाखवणं हे बुद्धीचं नाही, पाठांतर आणि स्मरणशक्तीचं लक्षण आहे. तीन शब्द लिहिल्यावर गूगलचं स्मार्ट कम्पोज चौथा शब्द सुचवतं; बुद्धिबळात संगणक आजच्या कोणत्याही ग्रँडमास्टरांना सहज(!) हरवेलही; पण हुशारी आली कशी; तर माणसांनी काय लिहिलं ही विदा वापरून त्यातले पॅटर्न संगणकानं शोधले. आपण ज्या पद्धतीनं भाषा शिकतो, त्या पद्धतीनं संगणक निश्चितच शिकत नाही; कर्ता, कर्म, बहुव्रिही, उभयान्वयी, विभक्ती प्रत्यय वगरे गोष्टी भाषातज्ज्ञांना महत्त्वाच्या वाटल्या तरी विदाविज्ञानात पॅटर्न शोधण्याची पद्धत निराळी असते.

उत्क्रांती व वर्तन-अर्थशास्त्राच्या (बिहेविअरल इकॉनॉमिक्स) प्राथमिक आकलनातून मानण्यात येतं की, माणसांना आपापलं हित कशात आहे ते समजतं; कोणते निर्णय घेतले की आपला अधिक फायदा आणि कमीत कमी तोटा होईल; आणि आपल्या वंशजांसाठी आपण काही डबोलं ठेवून देऊ, हे आपल्याला समजतं. आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आणि गोंगाट कोणता, हे विदाविज्ञानाला आपण शिकवल्याशिवाय समजणार नाही. सध्या आपणच गोंगाट वाढवत आहोत, देवळात किंवा कडय़ाच्या टोकावर जाऊन सेल्फी काढून आपण गोंगाट वाढवत आहोत; तर विदाविज्ञान कुठून शिकणार! स्वस्त फोटोग्राफीमुळे चित्रकला बदलत गेली, तसं आपलं वर्तन आपसूक बदलतंय की मुद्दय़ाला बगल देण्यासाठी मुद्दाम बदललं जातंय?

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 2:29 am

Web Title: photography selfie art skills in front of people akp 94
Next Stories
1 विडा उचलताना.
2 डेटा देता एक दिवस बरेच काही मागावे
3 सामाजिकतेचा आलेख सिद्धांत
Just Now!
X