09 July 2020

News Flash

वाटेवरती काचा गं..

पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याची आता सवय झाली आहे. समाजमाध्यमांवर या खड्डय़ांबद्दल मीम्सही फिरत आहेत.

जीपीएसवरून आपण नक्की कुठे आहोत, हे गूगल सांगू शकतं. मग खड्डय़ांची माहिती गूगलद्वारे मिळाली तर किती बरं होईल!

संहिता जोशी

स्त्री-पुरुषांच्या गरजा किती निराळ्या आहेत, स्त्रियांच्या बुद्धी आणि शक्तीचा वापर अर्थव्यवस्थेमध्ये व्हायचा असेल तर काय करावं लागेल, याची उत्तरंही गूगल जी विदा गोळा करतं त्यातून शोधता येतील..

पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याची आता सवय झाली आहे. समाजमाध्यमांवर या खड्डय़ांबद्दल मीम्सही फिरत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांना पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांचे सामान्य लोकांनी मोबाइलच्या कॅमेऱ्यात काढलेले फोटो समाजमाध्यमांवर दिसत आहेत; वर्तमानपत्रांत नटनटय़ांनी त्याबद्दल केलेली आवाहनं छापून येत आहेत. खड्डे तसेच आहेत.

प्रगत देशांत कसं चित्र असेल? सकाळी मुलं शाळांत जातात; मोठे लोक आपापल्या नोकरी-व्यवसायांसाठी घरांतून बाहेर पडतात. रस्त्यात कुठे तरी अपघात झाला तर आधीच ट्रॅफिक असतं, ते आणखी तुंबेल. लोक पॅऽपॅऽ हॉर्न न वाजवता, शांतपणे वाट बघत थांबत असतील. काही वर्षांपूर्वी गूगल मॅप्सवर सोय आली आणि आपल्या रस्त्यावर किती अंतरापर्यंत ट्रॅफिक साचलं आहे, हे बघता यायला लागलं. कुठवर ट्रॅफिक आहे, हे दिसलं म्हणून त्याबद्दल काही करता येत नाही. निदान किती उशीर होणार, याचा अंदाज घेऊन ऑफिसात फोन, ईमेल करून कळवता येतं.

आता निघतानाच गूगलला विचारता येतं, कोणत्या रस्त्यावरून गेलं तर कमी वेळ लागेल? ट्रेन पकडली तर कमी वेळ लागेल का बस पकडावी, की स्वत:ची गाडी काढावी? एकदा गाडीतून एक रस्ता धरल्यावर मग रस्त्यात काही कारणानं ट्रॅफिक साचलं, तर त्यात अडकेस्तोवर समजायचा मार्ग नव्हता. पण आता फोन सुरू ठेवला, तर ट्रॅफिक टाळण्यासाठी गूगल मधेच रस्ता बदलायला सांगू शकतं.

महिन्याच्या सुरुवातीला गूगल ईमेल पाठवतं. ‘गेल्या महिन्यात २८ तास गाडीत काढलेस’ असं गूगलनं मला सांगितलं. ते थोडं अंगावर आलं, काहीसं गूगलच्या भोचकपणामुळे. पण महिन्यातले २८ तास, म्हणजे सरासरी दिवसाला एक तास मी गाडी चालवते. या वेळेत वाचन, व्यायाम, झोप, लेखन, काही करता येत नाही. पण एवढा वेळ जर रिकामा जात असेल, तर त्याचं काय करायचं हे ठरवता येतं. याला गूगलचा भोचकपणा म्हणायचं की वेळेचं नियोजन करण्याची सोय?

हे समजण्यासाठी गूगलकडे आपली विदा असावी लागते. जीपीएसवरून आपण नक्की कुठे आहोत हे ठरवता आलं तर ट्रॅफिक कसं टाळायचं, किती वेळ प्रवासात घालवला, हे गूगल सांगू शकतं. विदा द्या, माहिती घ्या.

मग खड्डय़ांची माहिती गूगलद्वारे मिळाली तर किती बरं होईल! अ‍ॅण्ड्रॉइड फोन वापरल्यामुळे गूगलला आपण कुठं राहतो, कुठं काम करतो, रोज किती वेळ प्रवासात घालवतो, हे सहज समजतं. तर मग खड्डय़ांचे फोटो कुठं काढले, हे शोधणं फार कठीण नाही. प्रवास करताना आपल्याला कदाचित खड्डे टाळता येणार नाहीत, निदान मनाची तयारी करता येईल. ‘शाळा गेली की उजवीकडे वळा’ अशा सूचनांसोबत ‘त्या वाण्याच्या दुकानापुढे खड्डा आहे, जपून गाडी चालवा’ असं गूगलनं सांगितलं, तर काही जीवसुद्धा वाचू शकतात किंवा कोणी हौशी विदावैज्ञानिक खड्डय़ांची मोजणी करू शकतात; महामार्गावर किती खड्डे आहेत, आतल्या छोटय़ा रस्त्यांवर किती खड्डे आहेत, वगैरे. माहिती अधिकार वापरून या रस्त्यांसाठी किती खर्च, कधी झाला याची माहिती मिळू शकते. मग एक खड्डा कितीला पडला, हा भागाकार सोपाच!

गूगल जीपीएस वापरून आपल्या प्रवासाची बित्तंबातमी ठेवतं. याचा वापर करून दिवसाच्या कोणत्या वेळेला लोक कुठून, कसा प्रवास करतात, हे शोधता येतं. एखाद्या रस्त्याचं किंवा रेल्वे ट्रॅकचं काम करायचं असेल, तर पर्यायी सुविधा कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध करता येतील, हेही या विदेवरून शोधता येतं. लोकांच्या प्रवासाचे पॅटर्न वापरून रस्ते किती वाढवायचे, बसेस् किती सोडायच्या, असे निर्णयही घेणं शक्य आहे.

१९९० सालात व्हिएन्ना शहरात सर्वेक्षण केलं होतं – लोक दिवसभरात कसा प्रवास करतात; लोकल ट्रेन-बस कशा वापरतात? लोकांनी दिलेल्या उत्तरांवरून लक्षात आलं, की पुरुषांचा प्रवास घर-ऑफिस असा सरळसोट असतो. स्त्रिया ऑफिसात जातात; बाजारहाट करतात; मुलांना शाळेत सोडतात, परत आणतात; गरजेनुसार दवाखान्यात घेऊन जातात; घरच्या वृद्धांना भेटायला, त्यांची कामं करायला घराबाहेर पडतात. म्हणजे स्त्री-पुरुषांच्या गरजा फारच निराळ्या होत्या. मुलांना बाबागाडीत बसवून ढकलणाऱ्यांची रुंद पदपथ ही महत्त्वाची गरज होती. त्याचा फायदा व्हीलचेअरवाल्या लोकांनाही झालाच. संध्याकाळी उशिरा घरी परतणाऱ्या स्त्रियांची आणखी कुचंबणा होते, ती रस्त्यावर दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे. चोरांचा उपद्रव सगळ्यांनाच, पण स्त्रियांना लैंगिक गुन्ह्य़ांची वाढीव भीती. शहराची रचना करताना स्त्रियांच्या सोयीचा विचार केलाच नव्हता.

एशियन डेव्हलपमेंट बँकेनं काही वर्षांपूर्वी केलेल्या अभ्यासातून असं दिसलं, की स्त्रियांच्या कुचंबणेत भर पडते ती सुरक्षित आणि स्वच्छ सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे. बांगलादेशनं ही बाब मनावर घेतली. बाजार, बस स्टॅण्ड अशा महत्त्वाच्या जागी, जिथं बरीच माणसं एकत्र जमा होतात तिथं स्त्रियांसाठी वेगळ्या जागी शौचालय बांधले. स्त्रियांसाठी सोयी बांधताना, आराखडय़ांत स्त्रियांच्या मतांचा विचार केला; बांधकाम करणाऱ्या कामगारही ५० टक्के स्त्रिया होत्या. यातून स्त्रियांची कुचंबणा कमी झालीच, शिवाय लैंगिक गुन्हे होणं आणि त्यांची इतरांना भीती बसणं हे प्रकारही कमी झाले.

मुंबईत काही वर्षांपूर्वी ‘राइट टू पी’ हे आंदोलन सुरू होतं; सार्वजनिक ठिकाणी शू करण्याची सोय हवी म्हणून. दिल्ली मेट्रोनं स्त्रियांना शहराचा हक्क मिळावा म्हणून मेट्रोचा प्रवास स्त्रियांना फुकटात करता येईल, अशी योजना जाहीर केली होती (ती न्यायालयानं हाणून पाडली आहे.). २०११-१२ सालात देशात सरासरी २५.५ टक्के स्त्रिया कमावून देशाच्या अर्थव्यवस्थेत भर घालत होत्या; दिल्लीत हे प्रमाण ११.२ टक्के एवढं कमी होतं. त्याच काळात, सरासरी दिल्लीकर पुरुष दिवसाकाठी २६५ रुपये कमावत होता, स्त्री ९८ रुपये. २००४-०५ पासून २०११-१२ पर्यंत दिल्लीच्या स्त्रियांचं कामगार, कमावत्या वर्गातलं प्रमाण कमी झालं; याचं सगळ्यात मोठं कारण होतं त्यांना सार्वजनिक वाहतूक परवडेनाशी झाली. नवी दिल्लीत २०१६ साली झालेल्या सर्वेक्षणात दिसलं की, ८५ टक्के पुरुष आणि ६४ टक्के स्त्रिया सार्वजनिक वाहतूक वापरतात आणि सार्वजनिक वाहतुकीचा, वाहनांचा आराखडा पूर्णत: पुरुषांच्या गरजा ध्यानात ठेवूनच केला आहे.

याचा विदाविज्ञानाशी काय संबंध?

गूगल आपल्या प्रवासाची नोंद ठेवतं; आपले फोटो बघून, आपण काय शोधतो हे वाचून गूगलला आपण स्त्री आहोत की पुरुष, हेही समजतं. मग स्त्री-पुरुषांच्या गरजा किती निराळ्या आहेत; स्त्रियांच्या बुद्धी आणि शक्तीचा वापर अर्थव्यवस्थेमध्ये व्हायचा असेल तर काय करावं लागेल, याची उत्तरंही गूगल जी विदा गोळा करतं त्यातून शोधता येतील.

एकेका व्यक्तीची विदा गोळा करून खासगीपणाचा किती भंग होतो, हे व्यक्तीला सांगणं महत्त्वाचं आहे. ती विदा लोकांची, संपूर्ण समाजाची आयुष्यं आणखी सुखकर करण्यासाठी वापरणं सहज शक्य आहे. अशा प्रकल्पांमध्ये ‘ताडन के अधिकारी’ असणाऱ्या वर्गातल्या लोकांनी विदेचा वापर करणं महत्त्वाचं आहे.

(लेखात वापरलेली आकडेवारी ‘हफिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित झाली होती.)

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 12:10 am

Web Title: porthole bad road condition social media abn 97
Next Stories
1 वादे वादे न जायते गूगललाभ:
2 दिखावे पे न जाओ..
3 आधुनिक विषमतेचे वैषम्य
Just Now!
X