|| संहिता जोशी

समाजमाध्यमांवर आपल्याला बनावट बातम्या मिळणार, त्यांच्या वापरामुळे आपला खासगीपणा कमी होणार आणि आपल्यात, समाजात फूटही पडणार; पण ही सुविधा न वापरणं असा पर्यायही उपलब्ध नाही. म्हणून समाजमाध्यम हे अवजार ‘प्रगत’ कसं करता येईल, याचा विचार करणं गरजेचं आहे..

इतर प्राण्यांशी तुलना करता आपण निराळे का आहोत, बुद्धी म्हणजे नक्की काय, या प्रश्नांची उत्तरं शोधताना उत्क्रांतीशास्त्रात समजलं जातं की माणसांना परंपराजन्य जाण (कल्चरल लर्निग) असते. परंपरा म्हणजे देव-वेद वगरे नाही. आपण आपल्या पूर्वजांच्या खांद्यावर उभे असतो. गणित, विज्ञान, भाषा, कला, नीती, मूल्यं सगळ्याच बाबतीत दर पिढीमध्ये बदल होत जातात. चिम्पांझी हे आपले वानरगणातले नातेवाईक काडी वापरून वारुळातल्या मुंग्या मिळवून खातात, म्हणजे अवजार वापरतात हे खरं आहे. एका चिम्पांझीला याचा शोध लागला आणि आता बरेच चिम्पांझी ही पद्धत वापरतात. पण अवजार वापरण्यात पुढे चिम्पांझींची फार प्रगती झालेली नाही. याउलट बहुतेक सगळ्याच बाबतींत आपली अवजारं आणि तंत्रं प्रगत होत गेली आहेत.

शेअर बाजाराचा आलेख दर क्षणाला चढता किंवा उतरता नसतो; त्यात बारके उतार-चढाव असतात आणि गेल्या सहा महिन्यांत, वर्षभरात तो चढता आहे की उतरता, हे ठरवलं जातं. तसंच आपण आजूबाजूच्या लोकांकडून शिकतो, परिस्थितीमधून शिकतो. काही लोकांच्या आयुष्यात हे शिक्षण आणि त्यातून होणारे बदल फार भरभर होतात, त्यामुळे सहज लक्षात येतात. एरवी हे शिक्षण होतच असतं.

या सदरात, अगदी सुरुवातीला, जेम्स वॅटनं लावलेल्या वाफेच्या शक्तीचा उल्लेख केला होता. त्यानं ज्या मूलभूत तत्त्वाचा शोध लावला, ते तत्त्व आपण प्रेशर कुकरमध्ये वापरतो. सुमारे ३०० वर्षांपूर्वी लावलेला शोध आता आपल्यासाठी ‘कॉमन सेन्स’चा भाग आहे. त्यामागचं भौतिकशास्त्र माहीत नसेल तरीही कुकरमुळे चटकन आणि कमी इंधन वापरून अन्न शिजतं, हा आपल्यासाठी कॉमन सेन्स आहे – हे सगळ्यांनाच माहीत असतं.

हे शिक्षण प्रत्येक वेळी योग्य, छान छान, चांगलं वगरे असतंच असं नाही. तंत्रज्ञानामुळे आजूबाजूच्या लोकांकडून आणि परिस्थितीमधून शिकण्याची सोय आता खूपच जास्त आहे. सुरुवातीला २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या, पुढे समाजमाध्यमं, स्ट्रीमिंग टीव्हीमुळे जगभरातले सिनेमे, मालिका बघण्याचीही सोय वगरे गोष्टी आता सवयीच्या झाल्या आहेत.

आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर प्रभाव पाडतो आणि संगतीनुसार आपल्यात बदल होतात. समाजमाध्यमांवर एक प्रकारचा ‘ट्रेण्ड’ सुरू झाला की तो पसरतो, व्हायरल होतो, यामागचं काही अंशी कारण हेही असतं. कधी घटनाच एवढी महत्त्वाची असते, की सगळ्यांनाच त्याबद्दल व्यक्त व्हावंसं वाटतं. असे मोजके अपवाद वगळता, एरवी राजकीय बातम्या आणि त्यासंदर्भात लोकांची आपसातली वादावादी नेहमीची असते. प्रेशर कुकर वापरून वेळ आणि इंधनाची बचत का होते, हे बहुतेकांना माहीत नसतं; तसंच बरेचदा राजकीय स्वरूपाच्या चर्चामध्ये ‘तथ्य काय’ यापेक्षा ‘मतं काय’ यांची देवाणघेवाण चालते. आपल्याला जी माहिती आहे ती एकमेकांना देणं, सुख-दु:ख वाटून घेणं यापेक्षाही इतरांच्या चुका काढण्यासाठी, हिणवण्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग होतो. ‘आपण विरुद्ध इतर’ किंवा ‘भक्त विरुद्ध द्वेष्टे’ अशी समाजात विभागणी होण्यासाठी ही वृत्ती पोषक आहे. घोषणा न देताही आपण नकळत ‘टुकडे-टुकडे गँग’चे सदस्य होतो.

(तरुण) लोकांना समाजमाध्यमांचं व्यसन लागलं आहे, अशा प्रकारची तक्रार बऱ्याच ठिकाणी दिसते. दुसऱ्या बाजूनं ‘‘मी फेसबुकवर नाही’’ किंवा ‘‘माझ्या घरी जाहिरातीच दिसू नयेत अशी सोय मी केली आहे’’ असं म्हणणारे लोकही माझ्या आजूबाजूला आहेत. दुसऱ्या प्रकारचं आयुष्य जगणं बहुतेकांना शक्य नाही. आपल्याला लोकांशी बोलायला आवडतं आणि बहुतेकांना घरातून जाहिराती गोठवणं तांत्रिकदृष्टय़ा शक्य नाही. आपल्यापैकी बहुतेकांना समाजमाध्यमं आवडतात किंवा उपयुक्त वाटतात. समाजमाध्यमांचं लोकांना खरंच व्यसन लागलं आहे का; व्यसन नक्की कशाला म्हणावं, अशा प्रकारचे प्रश्नही येतात.

एक निश्चित. समाजमाध्यमांवर आपल्या माहिती आणि विचार मांडण्याजागी मतं आणि भावना मांडणं सोपं आहे. ते चटपटीत शब्दांत, आणि थोडक्यात मांडता येतात; त्यातून त्यांचा परिणाम जास्त लोकांवर होण्याची शक्यता वाढते. समाजमाध्यमांची रचना गुंतागुंतीची मांडणी करण्यासाठी पोषक नाही. हा लेख लिहीत असताना हैदराबादमधल्या पशुवैद्यकावर झालेली जीवघेणी हिंसा, त्यापुढचं ‘एन्काऊंटर’ आणि दुसरीकडे उन्नावमधल्या जीवघेण्या हिंसेच्या बातम्या येत आहेत. अशा घटनांवर व्यक्त होण्याची इच्छा बहुतेकांना होते. तेव्हा आपल्या भावना, विचार, माहिती यासोबत दिसणारी हिंसक मतं सभ्यपणाच्या कक्षेत बसणारी अजिबातच नाहीत.

लेख लिहीत असताना, दुसऱ्या बाजूनं ट्विटरनं राजकीय जाहिरातींवर बंदी आणत असल्याचं आणि फेसबुकनं अशी बंदी न घालण्याचं जाहीर केलं आहे. राजकीय जाहिरातींमध्ये असणाऱ्या बनावट बातम्या गाळण्यालाही फेसबुकनं नकार दिला आहे. आपण प्रकाशन संस्था नसून फक्त बातम्या, जाहिराती गोळा करून एकत्र मांडणारं व्यासपीठ आहोत, अशी फेसबुकची भूमिका राहिली आहे. अनेकांच्या मते फेसबुक आपली जबाबदारी टाळत आहे.

बोललेले शब्द परत घेता येत नाहीत; पण ते हवेत विरून जातात. लिहिलेल्या शब्दांना टिकाऊपणा असतो; आपण ते विसरलो तरी गूगलसारखी शोधइंजिनं आपल्याला ते विसरू देत नाहीत. आंतरजालावरचे शब्द आपल्या आयुष्यभर टिकून राहतील असं मानायला हरकत नाही. महाराष्ट्रात विधानसभेच्या सत्ताखेळामुळे सगळ्यांनाच पुढाऱ्यांच्या भाषणांच्या व्हिडीओंचा आणि ट्वीट्सचा टिकाऊपणा चांगलाच समजला असेल. आपण जे लिहितो ते शाश्वत मूल्य वगरे नसेल तर किमान सकारात्मक आहे का; आपल्या भावनेत, अभिव्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा आहे का; इतरांना हिणवून आपण ‘टुकडे टुकडे गँग’मध्ये सामील होत आहोत का; असे प्रश्न सुज्ञ लोकांनी विचारायला हरकत नाही.

समाजमाध्यमांवर आपल्याला बनावट बातम्या मिळणार, त्यांच्या वापरामुळे आपला खासगीपणा कमी होणार आणि आपल्यात, समाजात फूटही पडणार; पण ही सुविधा न वापरणं असा पर्यायही उपलब्ध नाही. टय़ूबमधून ही टूथपेस्ट बाहेर आलेली आहे; ती परत घालता येणं शक्य नाही. मग समाजमाध्यम हे अवजार प्रगत कसं करता येईल, याचा विचार करणं महत्त्वाचं आहे.

विदाविज्ञानाची प्रारूपं (मॉडेल्स) अस्तित्वात असलेले पॅटर्न ठळक करतात. त्यामुळे ज्या लेखनाला, बातम्यांना अनेकांचा प्रतिसाद येतो, ते लेखन सतत लोकांसमोर येत राहतं. एकमेकांना हिणवणारं लेखन आणि बनावट बातम्यांना जर अनेकांनी भाव दिला, तर विदाविज्ञानाला ते निपटून काढणं कठीण जातं. लोकांचा प्रतिसाद किती, कसा आहे, यावरूनच प्रारूपं तण कोणतं आणि पीक कोणतं, हे ठरवतात.

समाजमाध्यमं आपल्याला आवडतात याचं एक महत्त्वाचं कारण : त्यावर चटकन व्यक्त होता येतं. लिहिलं की ते लगेच जाहीर होतं. लिहिल्यावर ताबडतोब त्यावर प्रतिक्रियाही येतात. एखादी बनावट बातमी वाऱ्याच्या वेगानं व्हायरल आधी होते; नंतर तिचं खंडन करणाऱ्या बातम्या, लेख येत राहतात; त्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. तरीही बनावट बातम्यांचं खंडन सगळ्या लोकांच्या डोक्यातून होतंच असंही नाही. हीच गोष्ट विचार, माहिती, भावना यांच्यासमोर असलेल्या विषारी मतांची. यात बनावटपणा आणि विषारीपणाचं पारडं सध्या तरी जड आहे.

आपली आंतरजाल आणि समाजमाध्यमांवरची सामाजिक जाण सकारात्मकता, माहिती, सद्भाव पसरवण्याची आहे की विखार, विद्वेष पसरवण्याची, हे सध्या सांगता येणार नाही.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com