संहिता जोशी

अधिकारी व्यक्तींनी काहीही मांडणी केली तरी त्याकडे लक्ष जातं. याचा फायदा आणि गैरफायदाही घेणारे अनेक लोक असतात. आता त्याला जोड मिळालेली आहे समाजमाध्यमं, यूटय़ूबसारख्या जगभर पसरलेल्या कर्ण्यांची..

मागच्या लेखातल्या पहिल्याच परिच्छेदात मी लिहिलं होतं- ‘बातमीत अर्थातच ए.आय.चा उल्लेख होता’ आणि लेखाच्या शेवटी म्हटलं की, ज्या वाक्यांत ‘अर्थातच’ असा शब्द येतो ती व्यक्तिगत मतं असतात किंवा अंधश्रद्धा तरी. विज्ञानात अर्थातच असं काही नसतं. सगळे सिद्धांत असिद्ध किंवा सिद्ध करण्याची सोय असली पाहिजे. जर तशी सोय नसेल, तर ते विज्ञान नाही.

‘फ्रॉईडियन चुका’ म्हणून एक प्रकार असतो. लिहिताना किंवा बोलताना काही चुका होतात; त्या आपल्या नेणिवेशी, अंतर्मनातल्या विचारांशी संबंधित असतात, असा फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाचा दावा होता. फ्रॉईडनं गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हा सिद्धांत मांडला. त्या काळात हा सिद्धांत सिद्धासिद्ध करण्याची काहीच सोय नव्हती.

इंग्रजी भाषेत असा प्रयोग केला; टंकताना लोकांच्या ज्या चुका वारंवार होतात, त्या गूगलशोधांचे शब्द वापरून मिळवता आल्या. मग यदृच्छेनं (रॅण्डमपणे) कोणताही विचार नसताना काय चुका होतील, हे संगणक वापरून पाहता येतं. दोन्ही प्रकारच्या टंकनात किती चुका झाल्या हे मोजून, सांख्यिकी पद्धती वापरून माणसांच्या हातून झालेल्या चुका यदृच्छेनं झालेल्या चुकांपेक्षा जास्त आहेत का, हे शोधता येतं. त्यातून असं लक्षात आलं की, लोकांच्या हातून होणाऱ्या चुका फ्रॉईडियन नसतात. म्हणजे चुकून होणाऱ्या टंकनचुका चुकूनच होतात; त्यामागे नेणीव, इच्छा वगैरे काही नसतात. अशा प्रकारे कोणत्याही विषयातले सिद्धांत मांडणं आणि त्यांचं खंडन-मंडन करणं ही वैज्ञानिक पद्धत आहे.

फ्रॉईड असो वा गती, गुरुत्वाकर्षणाची समीकरणं मांडणारा न्यूटन, दोघांनीही बरेच सिद्धांत मांडले; त्यांतले काही चूक होते. तरीही त्या-त्या विषयांच्या मूलभूत अभ्यासक्रमात त्यांच्या संशोधनाचा समावेश होतो. अधिकारी व्यक्तींनी काहीही मांडणी केली तरी त्याकडे लक्ष जातं.

याचा फायदा आणि गैरफायदाही घेणारे अनेक लोक असतात. आता त्याला जोड मिळालेली आहे समाजमाध्यमं, यूटय़ूबसारख्या जगभर पसरलेल्या कण्र्याची. भारत आणि ब्राझीलमध्ये गेल्या दशकात ऑर्कुट प्रसिद्ध होतं. ब्राझीलमध्ये आता यूटय़ूब बरंच पसरलं आहे. त्याला जोड मिळाली यूटय़ूबच्या शिफारस पद्धतीची (रेकमेण्डर सिस्टम).

शिफारस पद्धती काही ठरावीक पद्धतीनं चालतात. माणसांचे त्यांच्या आवडीनिवडींनुसार गट केले जातात. उदाहरणार्थ, इक्बाल बानो आवडणारे, कोक स्टुडिओ आवडणारे लोक, असं म्हणू. आणि दुसरं वर्गीकरण केलं जातं ते संगीताचं. सगळ्या ठुमऱ्या एका प्रकारात येतील; गझल त्याच्या जवळपासचा गट असेल, पण कोक स्टुडिओचं संगीत त्यापेक्षा फारच निराळं असतं. मग शेवटची गुंतागुंत असते ती कोक स्टुडिओ आवडणाऱ्यांना इक्बाल बानोंच्या ठुमऱ्याही आवडतील का? याचा उद्देश असा की, लोकांना आवडणारं संगीत, गाणी सतत सुचवत राहिलं की ते परत परत येत राहतील. गाणं लोकांना आवडतं, यात गाण्याचं सांगीतिक मूल्य मोजलं जात नाही.

संगीतामध्ये भलंबुरं करण्याची काही गरज नसते. कारण, ‘अर्थातच’ संगीताची आवड व्यक्तिगत पातळीवरची असते, अंधश्रद्धेचा काही संबंध नसतो. मात्र यूटय़ूबवर जे व्हिडीओ असतात, त्यात फक्त संगीतच नसतं. बॉक्सिंगचे प्राथमिक धडे, डायपर कसा बदलावा, अशा प्रकारचे उपयोगमूल्य असणारे व्हिडीओही त्यात असतात. विदाविज्ञान शिकण्यासाठी सांख्यिकीचे प्राथमिक धडेही यूटय़ूबवर सापडतील. मग चढत्या भाजणीत वेगवेगळे ‘शिक्षकी’ व्हिडीओ सापडतात. गियरची गाडी कशी चालवायची; गणपतीची मूर्ती दूध प्यायली ते कशामुळे; काश्मीर प्रश्नाबद्दल चर्चा वगैरे.

यूटय़ूबवर आता ‘ऑटोप्ले’ हा पर्याय आपसूक सुरू होतो; तो नको असेल तर बंद करावा लागतो. नाही तर एक व्हिडीओ संपला की लगेच दुसरा सुरू होतो. ब्राझीलमध्ये यूटय़ूब फार लोकप्रिय आहे. सध्याचा तिथला राष्ट्राध्यक्ष जाईर बोल्सोनारो यूटय़ूबशिवाय जिंकणं कठीण होतं, असा अनेक ब्राझीलियन राजकीय अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. याचं मुख्य कारण आहे यूटय़ूबची शिफारस पद्धत.

यूटय़ूबचा अभ्यास करणाऱ्या लोकांना असं दिसून आलं आहे, की त्यांच्या शिफारस पद्धतीनं लोकांत फूट पाडणाऱ्या, प्रक्षोभक व्हिडीओंची मोठय़ा प्रमाणावर शिफारस केली. शिफारस करण्यासाठी त्या-त्या व्यक्तीला काय आवडेल, आवडतं हे माहीत असलं तर खूप फायदा होतो. इक्बाल बानोंच्या ठुमऱ्या आवडत असतील आणि यूटय़ूबवर गेल्यावर लगेच ‘नाच रे मोरा’ लागलं तर मत प्रतिकूल होणार. मत प्रतिकूल झालं, हे समजण्याचा एक मार्ग म्हणजे बघणाऱ्यांनी किती टक्के व्हिडीओ बघितला. सिनेमागृहात गेल्यावर आपण पूर्ण सिनेमा बघण्याचे पैसे देतो; लोक मधेच उठून गेल्याची विदा गोळा केली जात नाही. जर अशी विदा वेळेत मिळाली तर ठरावीक सिनेमा दाखवणं तोटय़ाचं गणित ठरेल का, याचं भाकीत आधीच करता येईल. आंतरजालावर व्हिडीओ बघताना असं भाकीत करता येतं. यूटय़ूब-अभ्यासकांना असं दिसलं, की आपल्याबद्दल काहीही माहिती असेल-नसेल तरीही यूटय़ूब भडकाऊ, फूट पाडणाऱ्या व्हिडीओंची शिफारस करतं.

ब्राझीलच्या काही भागांमध्ये ‘झिका’ हा प्रसंगी जीवघेणा ठरणारा आजारही पसरलेला आहे. हा तसा नवा आजार. या आजाराबद्दल चुकीची माहिती देणाऱ्या व्हिडीओंची ब्राझीलमध्ये मोठय़ा प्रमाणावर शिफारस केली गेली. ब्राझीलच्या डॉक्टरांना या ‘डॉ. यूटय़ूब’ची रास्त भीती वाटते; कारण झिका हा डासांमार्फत पसरणारा आजार आहे. चुकीची माहिती खरी समजून लोकांनी योग्य औषधोपचार घेणं टाळलं आणि त्यातून उत्तर ब्राझीलमध्ये झिकाचा प्रादुर्भाव वाढला.

बोल्सोनारो देशीवादाला हवा घालत प्रसिद्ध झाला. उजव्या विचारांच्या गायक, नट वगैरे लोकांनी त्याच्यासाठी यूटय़ूबवर प्रचार केला. चुकीची माहिती पसरवली. सध्या अ‍ॅमेझॉनच्या जंगलात लागलेल्या आगींकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं दुर्लक्ष करावं, असं बोल्सोनारोचं म्हणणं आहे; कारण आगी ब्राझीलच्या हद्दीतल्या अ‍ॅमेझॉनमध्ये लागल्या आहेत. परंतु या आगींमुळे पर्यावरणाचा समतोल ढळून त्याचा त्रास संपूर्ण जगालाच होणार आहे.

यूटय़ूबच्या, पर्यायानं गूगलच्या ननैतिक स्वल्पदृष्टीचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागणार आहे. महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि सगळ्या जगातल्याच गरिबांकडे स्मार्टफोन असेल किंवा नसेल; पण अवर्षण, हवामान-बदल, टोकाचा उन्हाळा, प्रचंड पाऊस याचा सगळ्यात जास्त त्रास ज्यांना होतो, त्यांना अशा निर्णयांमध्ये काहीही मुखत्यारी नाही.

यूटय़ूबच्या शिफारसयंत्रानं अमेरिकी कॉन्स्पिरसी थिअरिस्ट अलेक्स जोन्सला मोठा हात दिला आहे, असाही निष्कर्ष अनेक संशोधकांनी काढला आहे. अमेरिकेत झालेली अनेक सामूहिक गोळीबार-हत्याकांडं खोटी आहेत, असा त्याचा दावा आहे. २०१६ च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही हिलरी क्लिंटनला बदनाम करणारे अनेक व्हिडीओ यूटय़ूबच्या शिफारस पद्धतीनं सुचवले.

यासाठी झालेल्या खर्चाची मोजदाद निवडणुकांवर केलेल्या खर्चात करावी, असं अमेरिकी कायद्यानं अजून पारित केलेलं नाही आणि भारतासंदर्भात असा खोलवर अभ्यासही झालेला नाही.

सिरॅक्यूज विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार, या थापांना बळी पडणारे लोक ‘यडे’ नसतात. नवे प्रश्न, नवी माहिती आली की त्यांना कसं तोंड द्यायचं, त्यावर काय मत असावं, हे लोकांना चटकन समजत नाही. झिकासारखा जीवघेणा रोग किंवा लोकशाहीत मतदानाची वेळ येते तेव्हा मत नसणं परवडत नाही. मात्र, चुकीची माहिती खरोखरच विषाणूंसारखी पसरणं शक्य आहे, अशा आजच्या जगात एरवी मत नसण्याची सवय करून घेणं गरजेचं आहे!

ब्राझीलमध्ये यूटय़ूब फार लोकप्रिय आहे. सध्याचे तिथले राष्ट्राध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांचा निवडणूक विजय यूटय़ूबशिवाय कठीण होता, असा अनेक ब्राझीलियन राजकीय अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com