04 July 2020

News Flash

सामाजिकतेचा आलेख सिद्धांत

अमर्याद आंतरजालावरही सामाजिकता मर्यादितच राहते..

(संग्रहित छायाचित्र)

संहिता जोशी

कोणाची कोणाशी थेट ओळख आहे, कोणाकोणाचा संवाद दुहेरी आहे, एकाच विषयाबद्दल बोलणारे कोणकोण आहेत.. अशा तपशिलांना जोडणाऱ्या रेषांचा हा आलेख ‘आहे’पाशीच थांबतो. थेट दिसत नसूनही काही असू शकेल, ही शक्यता विचारात घेतली जात नाही. अमर्याद आंतरजालावरही सामाजिकता मर्यादितच राहते..

‘रेडिट’ हे मराठी लोकांत फार वापरलं न जाणारं, मात्र जगभर चच्रेसाठी वापरलं जाणारं बऱ्यापैकी मोठं, प्रसिद्ध असं समाजमाध्यम आहे. रेडिटच्या प्रवर्तकांचा विचार होता की रेडिटवर कोणत्याही विषयांवर चर्चा व्हाव्यात, लोकांना एकमेकांच्या संस्कृतीची ओळख व्हावी आणि एकुणातच एकमेकांना न ओळखणाऱ्या लोकांत परस्परसंवाद आणि सामंजस्य वाढीस लागावं.

प्रत्यक्षात असं झालं नाही. एकाच विचारांच्या लोकांची विचारकूपं (एको चेंबर्स) तयार झाली. यात टोकाच्या विचारांच्या लोकांचे आवाज सगळ्यांसमोर मोठय़ानं येत राहतात. ही गोष्ट विचारांची. वेगळ्या प्रकारची, संस्कृतींमधली माणसं समाजमाध्यमं आणि त्यामागचं विदाविज्ञान जोडतात का?

फेसबुकवर बरेचदा ‘पीपल यू मे नो’ (तुम्ही यांना ओळखत असणार) अशा शिफारशी दिसतात. सगळ्याच समाजमाध्यमांत, जिथे व्यक्ती (सदस्य) एकमेकांशी जोडून घेऊ शकतात, तिथे अशा माणसांच्याही शिफारशी दिसतात. शाळेतल्या दोन मत्रिणी मला फेसबुकवर सापडल्या तर अचानक शाळेतले इतर अनेक मित्र, मत्रिणी आणि ज्यांच्याशी शाळेत असताना कधी एक शब्द बोलले नव्हते असे लोक दिसायला लागले. हे बहुतेकसे लोक माझ्याच वयाचेही; एक वर्ष पुढे-मागे असणारेही लोक कमी होते. फेसबुकच्या कृत्रिम प्रज्ञेला (ए. आय.) माझी शाळा, बॅच कोणती या गोष्टी समजल्या का?

या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. एकाच प्रश्नाची उत्तरं शोधण्याचे मार्ग अनेक असतात. आपल्या शाळेत, आपल्या वयाचे कोण लोक होते हे आपल्याला माहीत असतं; कृत्रिम प्रज्ञा त्यासाठी ग्राफ थिअरी किंवा आलेख सिद्धांत वापरते. हे काय असतं आणि कसं चालतं, त्याचं उदाहरण बघू.

प्राची या शाळामैत्रिणीशी मी फेसबुक मत्री केली. तिच्या यादीत स्वप्ना दिसली; तिलाही फ्रेंडरिक्वेस्ट टाकली. त्याचा आलेख काढला जातो; तो आकृतीतल्या डाव्या भागासारखा दिसेल. प्राची आणि स्वप्ना दोघींनी माझ्याशी फेसबुक मत्री केल्यावर आम्हां तिघींना जोडणारी रेषा काढली जाईल. आलेख सिद्धांतानुसार, या दोघींची ज्या लोकांशी मत्री आहे, त्या सगळ्यांशी माझी ओळख असण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे पराग आणि केदार या दोघांशीही माझी मत्री असण्याची शक्यता आहे; मला तसं फेसबुकवर दाखवलं जाईल. मात्र रत्ना आणि स्वप्ना एकमेकींशी जोडलेल्या नाहीत. रत्नाचं नाव या यादीत खाली जाईल. अमितशी स्वप्ना आणि प्राची दोघींचाही थेट संबंध नाही; म्हणजे मला त्याचं नाव कदाचित दाखवलं जाणारच नाही.

आलेख सिद्धांताची गणितं चालतात त्यानुसार ज्या लोकांशी आपला लांबचा संबंध असतो, ते लांबच राहण्याची शक्यता वाढते. आकृतीमधला जगाच्या नकाशासारखा दिसणारा भाग पाहा. फेसबुकवर लोक कसे जोडलेले होते, हे त्यात दाखवलेलं आहे. रंग जेवढा गडद तेवढे जास्त लोक एकमेकांशी जोडलेले आहेत. (हा नकाशा काही वर्ष जुना आहे; भारत किंवा इतर विकसनशील देशांत आता आणखी लोक फेसबुकवर एकमेकांशी जोडलेले असतील.) यात चीन अजिबात दिसणार नाही, कारण चीनमध्ये आजही फेसबुकवर बंदी आहे.

कोण कोणाशी जोडले गेले आहेत, हीसुद्धा एक प्रकारची विदा (डेटा) असते. आकृतीत फक्त कोण कोणाच्या मत्रयादीत आहेत, याचाच विचार केला आहे.

अनेकदा संवाद दोन्ही बाजूंनी एकसारखा असतो असं नाही. कुणाला समाजमाध्यमांवर खूप काही लिहिण्याची, प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सवय असते; कोणी फार तर क्वचितच लाइक बटण दाबतात. दुकानात आपलं आवडतं खेळणं दिसलं म्हणून पोर आईला चिकार मस्का लावतं; पण आई त्याला फार प्रतिसाद देत नाही. मग पोर कधी चारचौघांत जोरात गळा काढतं; आई इतरांकडे कसनुसा चेहरा करून बघते, पण पोर जेवढय़ा मोठय़ानं रडतं तेवढय़ा मोठय़ानं बोलत नाही. या संवादात सममिती (सिमेट्री) नाही.

पण घरी गेल्यावर आई त्या पोराशी बरंच काही बोलत असेल. खेळणं आणि इतरही अनेक गोष्टींबद्दल. कोणी फोटोग्राफर आहे; ती बरेच फोटो फेसबुकवर डकवते, पण शब्द वापरून संवाद कमीच असतो. पण खासगी संवादात, फेसबुकवरच ती काही लोकांशी गप्पा मारते. कुणी तिच्या अनेक फोटोंवर काही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, अशांशी ती जाहीर काही बोलत नाही, पण आपले फोटो विकले जावेत म्हणून त्यांना ती खासगीत काही विचारते. संवाद कसे चालतात यावरून लोकांना जोडणारी नाती किती घट्ट आहेत, त्यांचं वजन किती हे ठरवलं जातं. वरवर एकतर्फी दिसणारे संवाद तसे असतीलच असं नाही.

सदस्यांना एकमेकांशी जोडताना त्यांचं आपसातलं नातं किती घट्ट आहे, याचंही वजन मोजलं जातं. समाजमाध्यमंच नाही तर एकमेकांशी जोडलेल्या वस्तू, विषय, माणसं या सगळ्यांचं कागदावर चित्र काढायचं झालं तर आलेख सिद्धांताचा वापर करता येतो.

साथीचे रोग कसे पसरतात, हे मोजण्यासाठी लोकांनी ट्विटरची विदा वापरण्याचे प्रयोग केले आहेत. पूरपरिस्थिती आली की लेप्टो आणि पाण्यातून पसरणाऱ्या रोगांची भीती वाढते. या रोगाची लक्षणं आपल्याला असल्याचं लोक समाजमाध्यमांवर लिहितात. कोणी, कधी आणि कुठून असं लिहिलं; हे विदेतून शोधता येतं. लोकांच्या अशा रोजच्या विदेचा मागोवा घेऊन साथीच्या रोगांची लक्षणं नेहमीपेक्षा जास्त दिसत आहेत का, ती पसरताना दिसत आहेत का, याचेही आलेख काढता येतात. (असे प्रयोग अनेक विदावैज्ञानिकांनी भारताबाहेर यशस्वीरीत्या केले आहेत.)

जगभरचे लोक एकमेकांशी आंतरजाल आणि समाजमाध्यमांमुळे जोडले गेले आहेत. जगच खेडं झालं आहे, अशा छापाच्या ‘गोड गोष्टी’ अधूनमधून कानांवर येतात. पण खरंच त्याचा फायदा सगळ्यांना होतो का? वरच्या उदाहरणात म्हणलं तसं, माझ्या एकाही मत्रिणीचा अमितशी थेट संबंध नाही, तर मला त्याचं नाव मित्र म्हणून सुचवलं जात नाही. लोक शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या संधी देताना आजही थेट किंवा परात्पर ओळखीच्या लोकांचा विचार करतात. स्वतच्या मुलाला किंवा भाचीला संधी देण्याला भ्रष्टाचार समजलं जातं, पण ओळखीच्या व्यक्तीला संधी देण्याला भ्रष्टाचार समजलं जात नाही. समजा अमित नोकरी शोधत आहे आणि त्याच्यासाठी योग्य संधी मला माहीत आहे. पण समाजमाध्यमांत एकमेकांशी लोक ज्या प्रकारे जोडले जातात, त्यात अमित आणि माझा संपर्क होण्याची शक्यता कमीच आहे. अमितला मुळात संधी आहे, हेच समजणार नाही.

सत्ता, संधी या गोष्टी ठरावीक वर्गाकडे आणि ठरावीक जागी एकवटलेल्या असतात. मुंबई-पुण्यात नेहमीच संधी जास्त असणार आणि बीड-उस्मानाबादेत त्या मानानं शिक्षण, रोजगाराच्या संधी कमी असणार. जोवर बीड-उस्मानाबादच्या लोकांना मुंबई-पुण्यातल्या संधींबद्दल माहिती मिळते आणि त्यात समान वाटा मिळतो, तोवर याबद्दल तक्रार करण्याची गरज नसते. आंतरजाल आणि समाजमाध्यमांमुळे ही असमानता कमी होईल अशी आशा अनेकांना वाटतेही. पण तसं होण्यासाठी सध्याचं, संधी मिळालेल्या माणसांचं वर्तन बदलावं लागेल; ते बदलण्यासाठी त्यांना काही गाजर दाखवावं लागेल. आलेखांच्या गणितात सध्या तरी माणसांच्या वर्तनाची शक्य तेवढी, वास्तववादी री ओढली जाते. बदल घडवण्यासाठी तसा हेतू बाळगून निराळ्या पद्धतीनं गणित मांडावं लागेल.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2019 12:11 am

Web Title: social science theory reddit abn 97
Next Stories
1 सावध ऐका पुढील टिकटॉक?
2 विदा मिळाली, पुढे?
3 लोकानुनय की लोकहित?
Just Now!
X