31 March 2020

News Flash

पूर्णातून पूर्ण

विदाविज्ञानातलं सगळं ‘ग्लॅमरस’ काम असतं ते मोजलेल्या आकडय़ांवरून त्यांचा पॅटर्न बघायचा आणि पुढे काय होणार याची भाकितं करायची.

(संग्रहित छायाचित्र)

संहिता जोशी

विदा आपल्या हेतूसाठी कशी उपयोगी पाडायची, हा झाला मूळ प्रश्न. त्याचं उत्तर शोधताना आणखी तीन प्रश्न येतात : कोणाकडून विदा मिळवायची? ती ‘कचरा’ तर नाही ना? आणि हीच विदा ‘पूर्ण’ मानावी काय?

उपनिषदांत म्हटलं आहे, पूर्णातून पूर्ण जन्माला येतं – ‘पूर्णात्पूर्णमुदच्यते’। हे मुळात म्हटलं तेव्हा संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) आणि विदाविज्ञान (डेटा सायन्स) या दोन ज्ञानशाखा म्हणून किती प्रगत झाल्या होत्या, कोण जाणे! विदाविज्ञानातून मिळणारे निकाल बघून त्यांचा अर्थ लावताना हे वाक्य मला बरेचदा आठवतं.

म्हणजे, काही वेळा निकाल हवे तसे मिळतात; पण त्यात खूपच कमी विदाबिंदू असतात. म्हणजे उदाहरणार्थ, लोकसभेच्या आपल्या मतदारसंघाचे निकाल काय लागणार याचे अंदाज घ्यायचे आहेत. त्यासाठी १०० घरं असलेल्या गावातल्या सगळ्या मतदारांची मतं विचारली तरीही फार विश्वासार्ह अंदाज मिळेल असं नाही. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तेवढय़ाच मतदारांची मतं विचारून विश्वासार्ह अंदाज मिळतील.

आपल्याला ‘हवे तसे निकाल’ म्हणजे काय, हे आपल्या प्रश्नावर अवलंबून असतं. म्हणजे निवडणुकांमध्ये आपल्याला आवडणारा पक्ष जिंकावा, किंवा अजिबात न आवडणारा पक्ष जिंकू नये; व्यवसायाची जाहिरात फेसबुकवर करत असू तर आपल्या जाहिराती बघून ग्राहक आपल्याकडे यावेत; किंवा फेसबुकवर असलो तर जाहिराती योग्य लोकांना दिसाव्यात.

या सगळ्यांच्या मुळाशी असलेली संख्याशास्त्राची, विदाविज्ञानाची तत्त्वं सारखीच असतात. आपल्या प्रश्नानुसार विदा कोणती, ते बदलतं; पण विदा पूर्ण असली पाहिजे. तिचा वानोळा घेतानाही पूर्णपणाचा विचार केला पाहिजे. म्हणजे नक्की काय? सध्या निवडणुकांचा हंगाम आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे आपले सर्वाचे प्रतिनिधी असतात; ज्यांनी त्यांना मत दिलं, ज्यांनी विरोधकांना मत दिलं, जे लोक मतदानाला आले नाहीत आणि जे लोक मतदान करू शकत नाहीत (लहान मुलं, आजारी लोक, इत्यादी) त्यांचेही. लोकप्रतिनिधी जसे हजर-गैरहजर असणाऱ्या सगळ्या लोकांचे प्रतिनिधी (का सेवक?) असणं गरजेचं आहे, तसंच विदेच्या वानोळ्याबद्दलही म्हणता येईल. आपल्याला दिसत असलेल्या विदाबिंदूंचा विचार करणं सहज आणि सोपं असतं. दिसत नसलेले समूह, गट, विचारधारा अशा सगळ्यांची मोजदाद आपल्या विदेत करणं गरजेचं असतं. तर पूर्ण निकाल येतात. हे विदाविज्ञान, संख्याशास्त्रातलं एक मूलगामी तत्त्व.

विदाविज्ञानातलं सगळं ‘ग्लॅमरस’ काम असतं ते मोजलेल्या आकडय़ांवरून त्यांचा पॅटर्न बघायचा आणि पुढे काय होणार याची भाकितं करायची. थोडंसं हवामान खात्याच्या भाकितांसारखंच. फेसबुकवर किती लोकांना आपली जाहिरात दिसेल आणि त्यातून किती लोक आपल्या सेवा किंवा वस्तू विकत घेतील याचं भाकीत; किंवा जाहिरातीमध्ये काय शब्द वापरले तर जाहिरातींची परिणामकारकता सगळ्यात जास्त असेल, याचं भाकीत.

निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवार अनेक आश्वासनं देतात; सडक-बिजली-पानी इथपासून आणखी काही. मतदारांच्या वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळी आश्वासनं भावतात. ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे, त्यांना नळ-पाणी योजनेचं महत्त्व वाटेल. निवृत्त लोकांना व्याजदर महत्त्वाचा वाटेल किंवा सुखवस्तू लोकांना देशाची सुरक्षितता महत्त्वाची वाटेल. काही नागरिकांना शाळेतून होमवर्क मिळू नये आणि रोज चार तास फोनवर खेळता यावं इतकंच महत्त्वाचं वाटेल! एकाच मतदारसंघात असे निरनिराळ्या समूहांमधले नागरिक असतात. फक्त ठरावीक समूहांमधल्या मतदारांनाच आवडतील अशी आश्वासनं दिली; किंवा निवडणुकीनंतर मोजक्या गटांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला तर पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी होईल. यातही पूर्ण विदा, म्हणजे वेगवेगळ्या समूहांची गरज, मागण्या काय आहेत, हा विचार महत्त्वाचा ठरतो.

लोकसभेच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी गावातल्या फक्त १०० घरांतल्या मतदारांची मतं विचारणं म्हणजे अपूर्ण विदा होईल. समजा, यात भलत्याच मतदारसंघाची विदा मोजली तर? बीड लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांना ईशान्य मुंबईच्या मतदारांच्या, नागरिकांच्या मागण्यांची यादी मिळाली तर काय होईल? बीडमध्ये पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असेल तर ईशान्य मुंबईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न नागरिकांना महत्त्वाचे वाटत असतील. बीडमधल्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती काय आहे याचा अंदाज न घेता, समोर दिसणारे आकडे आणि अंदाज खरे आहेत असं मानलं तर ते बीडमध्ये लोकांना शाश्वत पाणीपुरवठय़ाची आवश्यकता असताना मेट्रोरेल आणि ट्राम वगरेंची आश्वासनं देणं कितपत उपयुक्त आणि योग्य ठरेल?

सांख्यिकी आणि विदाविज्ञानातलं आणखी एक मूलभूत तत्त्व म्हणजे, कचऱ्यातून कचराच मिळतो; ‘गार्बेज इन गार्बेज आउट’. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ज्यातून मिळत नाही अशी चुकीची विदा दिली तर त्यातून मिळणारे निकाल, निष्कर्ष चुकीचेच असतील. बीडमधल्या मतदारांच्या मागण्या काय हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी मुंबईच्या लोकांच्या मतांची विदा वापरणं अयोग्य ठरेल. संगणक मोजणी करण्यात हुशार असले तरीही चुकीच्या गोष्टी मोजून योग्य निष्कर्ष मिळत नाहीत.

विदावैज्ञानिकांना या दोन गोष्टी बहुतेकदा समजतात; नाही तर नफा कमी होतो. अनेकदा संशोधन नफ्यासाठी केलं जात नाही; पण त्यातही या दोन पद्धतींनी निकाल चुकीचे येणार हे समजण्यासाठी तांत्रिक पद्धती आहेत. तिसरी गोष्टसुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते :  मागे राहिलेले घटक किंवा नाही-रे वर्ग. ज्यांच्याकडे संगणक, आंतरजाल, स्मार्टफोन, फेसबुकवर दवडण्यासाठी वेळ, पसा यांपैकी बहुतेकशा गोष्टी नाहीत किंवा फार कमी आहेत, असा वर्ग. विदाविज्ञानात माणसांची जी विदा वापरली जाते, ती या वर्गाकडून बहुतेकदा येतच नाही. जाहिरातींमधून जी डील्स मिळतात, डिस्काउंट-सेलची माहिती मिळते, स्वस्ताईचा फायदा होतो; तो या वर्गाला होतच नाही. (मागे एका लेखात वॉल्डचा सिद्धांत लिहिला होता; तो मूलभूत सिद्धांत या उदाहरणातही उपयुक्त ठरतो.)

मार्केटिंग करणारे लोक बरीच विदा वापरून, आपल्याकडून सेवा किंवा वस्तू विकत घेणारे लोक कोण असतील, हे ठरवतात. लोकांच्या खरेदीचे, गुगल शोधाचे, फेसबुकवर लिहितात त्याचे पॅटर्न्‍स वापरून याचे निर्णय घेतले जातात. त्यात कधी असाही तपशील वापरला जातो की, विकत घेणाऱ्या माणसांची ती वस्तू किंवा सेवा विकत घेण्याची पत आहे का. पत आणि इच्छा आहेत, असं भाकीत आलं तर ‘आमच्याकडून सेवा/वस्तू घ्या आणि पाच टक्के सूट मिळवा’ अशा छापाच्या जाहिराती दाखवल्या जातात. सगळ्यांना जाहिराती दाखवण्यापेक्षा हे स्वस्त पडतं.

म्हणजे ज्यांची पुरेशी पत नाही असं वाटतं, ज्यांना सवलतीची खरी गरज असते, अशा लोकांना सवलतीचा फायदा मिळत नाही. पशाकडे पसा जातो; विदाविज्ञानातून मुळातली विषमता वाढते. दुसरं, ही भाकितं १०० टक्के अचूक नसतात; ६० टक्के ते ७० टक्के अचूकता असली तरीही मार्केटिंगमध्ये पसा वाचतो. म्हणजे काही इच्छा आणि पत असलेले लोक या चाळणीतून चुकून सुटतात. मार्केटिंगमधला पसा तरीही वाचतो, पण ‘हे लोक चुकून सुटले आहेत’ अशी माहिती उलटपक्षी मिळत नाही. तरीही नफा वाढलेलाच असतो. आपली चूक झाली हे समजलं नाही तर सुधारणाही शक्य नाही.

पूर्ण विदा मिळाली तरीही विदाविज्ञानातून पूर्ण भाकितं मिळत नाहीत; कधीही मिळणार नाहीत. त्रुटी राहणारच. पूर्णातून पूर्ण मिळतं, असं उपनिषदांत म्हटलं आहे. व्यावहारिक पातळीवर, पूर्णातून पूर्ण मिळण्याची शक्यता निर्माण होते; शक्यता ६० टक्के आहे की ७० टक्के तेवढं फक्त विदावैज्ञानिक सांगू शकतात. कचऱ्यातून मात्र कचराच मिळतो.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2019 12:04 am

Web Title: vidabhan article by sanhita joshi 10
Next Stories
1 पगडी आणि पगडे
2 आडातली विषमता पोहऱ्यात
3 .. व वैशिष्टय़पूर्ण वाक्य
Just Now!
X