01 April 2020

News Flash

शोधसूत्राची सोय कुणाची?

आपण आपल्याबद्दल व्यक्तिगत स्वरूपाची माहिती बरेचदा लोकांना पुरवत असतो; यापैकी काही प्रकारची माहिती पुरवणं अगदी समाजमान्य आहे

(संग्रहित छायाचित्र)

संहिता जोशी

गूगल-फेसबुक आदींचा व्यवसायच हा की लोकांची ‘सोय’ बघून त्यांना माहिती पुरवायची. तुमची सोय नक्की शोधून काढण्यासाठी तुमच्या खासगीपणावर जेवढं आक्रमण करावं लागणार, तेवढं आंतरजालातून होतच राहणार.. पण मग प्रश्न पडेल की सोय नक्की कुणाची?

आपण आपल्याबद्दल व्यक्तिगत स्वरूपाची माहिती बरेचदा लोकांना पुरवत असतो; यापैकी काही प्रकारची माहिती पुरवणं अगदी समाजमान्य आहे. हल्ली शेंडय़ा राखण्याचं प्रमाण नगण्य झालेलं आहे; पण लग्न झाल्याची माहिती मंगळसूत्र बघून लगेच मिळते. अशा रूढी-रीती काळानुसार, समाजाच्या मान्यतांनुसार बदलत राहतात. वेगवेगळ्या समाजांत समाजमाध्यमांवर एक संकेत कसोशीनं पाळला जातो, तो म्हणजे आपल्या समाजात जे शिष्टसंमत असेल तसं आपणही वागतो, असं दाखवणं. विदाविज्ञान (डेटा सायन्स), त्यासंबंधी तंत्रज्ञान आल्यावर यात कसा फरक पडतो?

पुलंनी ‘सार्वजनिक आणि खासगी पुणेरी भाषे’वरून विनोद केले होते. फेसबुक, ट्विटर ही आपली सार्वजनिक भाषा आहे. गूगल ही आपली खासगी भाषा आहे. चारचौघांत वागण्याचे अनेक संकेत समाजमाध्यमांवर पाळले जातात. सुंदर दिसणं, पैसे असणं या गोष्टींना प्रतिष्ठा आहे; लोक स्वत:चे कळकट्ट फोटो समाजमाध्यमांवर डकवत नाहीत. आकर्षक मांडणी केलेल्या जेवणाचे फोटो दिसतात, पण ‘आज उपाशी झोपले’ असे फोटो दिसत नाहीत. आपल्या विरोधी विचाराच्या लोकांशी हमरीतुमरीवर येण्याला लोकमान्यता असावी, कारण लोक तसे वागताना सहजच दिसतात.

याउलट अनेक गोष्टी व्यक्तिगत स्वरूपाच्या असतात; आरोग्यविषयक तक्रारी, मानसिक असमाधान अशा गोष्टी आपण आपल्या डॉक्टरांना किंवा अगदी जवळच्या मत्रिणींना सांगतो. त्या हिशोबात गूगल, बिंग, याहू यांसारखी आंतरजालावरची शोधसाधनं (सर्च इंजिन्स) आता आपल्या ‘मत्रीखात्या’त आली आहेत. वजन कमी कसं करायचं किंवा फोनच्या नव्या मॉडेलवर स्क्रीनशॉट कसा घ्यायचा, अशा अनेक गोष्टी आपण आंतरजालावर शोधतो. यात शिष्टसंमत नसलेल्या अनेक गोष्टीही असतात. काही नियतकालिकांमध्ये ‘ताईचा सल्ला’ वगैरे सदरं असायची, असतात; त्यात ‘माझ्या नवऱ्याला दुसरी स्त्री आवडते, अशी शंका येते; काय करू’ अशा प्रकारचे निनावी प्रश्न असतात. आता हे प्रश्न गूगललाही विचारले जातात.

यातून आपला खासगीपणा कमी होतो का?

या प्रश्नाचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं देता येत नाही.

मुळात खासगीपणा म्हणजे काय? माझं नाक जिथे सुरू होतं, तिथे तुमचं हात फिरवण्याचं स्वातंत्र्य संपतं – असं आपल्या भौतिक अवकाशाबद्दल म्हणता येईल. खासगीपणा ही गोष्ट शरीराच्या आकारउकारांएवढी स्पष्ट नाही. जी माहिती दुसऱ्याला देण्याची आपली इच्छा नाही, ती आपली खासगी माहिती. आपल्या खासगीपणाची मर्यादा आपल्याला ठरवता आली पाहिजे.

आपल्या अडचणी गूगलल्यावर सरळच गूगलला समजतं की या व्यक्तीला आयुष्यात कसली गरज आहे. अशा अडचणी असणारी व्यक्ती थोडा पसा बाळगून आहे का, याचा छडाही गूगलला लागू शकतो. ते कसं, हा मुद्दा सध्या सोडून देऊ. अशा अडचणींवर उपाय शोधणारे व्यावसायिक असतात; वकील, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैदू, बाबा बंगाली छाप लोक वगैरे. रीतसर जाहिराती करायला भारतात वकील, डॉक्टर वगैरे लोकांना बंदी आहे. पण वैदू, बाबा बंगाली लोकांवर अशी बंधनं नाहीत. गूगल या लोकांकडून पैसे घेऊन आपल्याला तशा छापाच्या जाहिराती दाखवू शकतं.

अगदी अडचणीत सापडलेला माणूस अशा वेळेस जो कोणी दिसेल त्यांच्याकडून मदतीची आशा करत असतो. ‘हे ही दिवस जातील’ एवढीच आशा खोटी का असेना, दाखवणारं कोणी हवं असतं.

एक उदाहरण बघू. शिकलेल्या घरांतल्या लोकांना एक गोष्ट चांगलीच माहीत असते, शिक्षणामुळे आर्थिक प्रगती साधता येते. त्याशिवाय एक गोष्ट त्यांच्याकडे असते, इतर शिकलेल्या लोकांशी ओळखी. डॉक्टरांची मुलं डॉक्टर होतात आणि नाही झाली तरी डॉक्टरांच्या इतर व्यावसायिकांशी ओळखी असतात. त्यामुळे इंजिनीअर किंवा एमबीए होऊ पाहणाऱ्या, झालेल्या मुलांनी करिअरसाठी काय करावं याची माहिती काढणं सहज सोपं असतं.

याउलट (त्याच उदाहरणात पुढे) गरीब घरांतल्या, शिक्षणाची पाश्र्वभूमी नसलेल्या घरांतल्या मुलांनाही शिकून प्रगती साधायची असते; त्यांना कोणत्या क्लासला जावं, कोणती पुस्तकं वाचावीत, कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या मिळणं सोपं आहे, याची फारशी माहिती नसते. शिकलेले पालक आपल्या मुलांना जशी मदत करू शकतात, तशी काहीही मदत त्यांना नसते. पण आता गोष्टी तशा सोप्या असतात. गूगल करावं, आपल्या मित्रमत्रिणींना विचारावं. मित्रमत्रिणी फक्त शेजारी राहणारे आणि कॉलेजात शिकणारे असतात असं नाही. जगभरात कुठेही आपले परिचित असतात. यांना आपण ट्विटर, फेसबुक, लिंक्डिनवर प्रश्न विचारतो.

या सगळ्यातून आपल्याला काय हवं आहे, अत्यंत तीव्रतेनं हवं आहे, याची माहिती गूगलला, फेसबुकला मिळते. आपण कुठे राहतो, काय करतो, साधारण उत्पन्न किती, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला कसला त्रास होतो, कोणत्या कारणांमुळे अस्वस्थता येते, राग येतो, कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना येते, या गोष्टी गूगल, फेसबुकला माहीत आहेत. गूगल- फेसबुकचा व्यवसायच हा की लोकांची ‘सोय’ बघून त्यांना माहिती पुरवायची. ‘‘तुम्हाला विदाविज्ञान शिकायचं आहे, हे अमकं विद्यापीठ एवढय़ा पशांत दोन वर्षांचा कोर्स चालवतं.’’ मग ते विद्यापीठ, तो अभ्यासक्रम किती चांगले आहेत; दोन वर्ष हे शिकून पुढे नोकरी मिळण्याची शक्यता काय, वगैरे गोष्टी तपासण्याची जबाबदारी गूगल-फेसबुकवर नसते. अशा बोगस किंवा गरीब विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या खासगी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना जाहिराती दाखवून भुलवलं; त्यांच्याकडून वारेमाप फी घेतली आणि त्याचा विद्यार्थ्यांना फार उपयोग झाला नाही आणि पुढे विद्यापीठांवर कज्जे झाले अशी काही अमेरिकी उदाहरणं आहेत. शिकलेल्या घरांतल्या विद्यार्थ्यांना अशा जाहिराती फार दिसत नाहीत; दिसल्या तरी ते त्यावर क्लिक करत नाहीत; त्यामुळे त्यांना या जाहिराती फार दिसतही नाहीत.

अशा टाग्रेटेड जाहिराती दाखवताना लोकांचं नाव, आधार कार्डाचा नंबर किंवा क्रेडिट कार्डाचा नंबर गूगल- फेसबुक वगरेंना समजत नाही. आपल्या व्यक्तिगत माहितीची ‘चोरी’ होते म्हणण्यासारखंही काही यात नाही. आपल्याला काय हवं आहे, आपली मानसिक अवस्था कशी आहे, याची माहिती आपण विदासम्राट कंपन्यांना देतो. विदा (डेटा) हे आजच्या काळातलं सोनं आहे; विदा असल्याचं सोंग आणता येत नाही.

यात आपली सोय होते, असा अनेकांचा दावा असतो. तो खोटा नाही. मला हवी असलेली वस्तू घराजवळच्या दुकानात सेलवर आहे, हे घरबसल्या समजतं. या सोयीची नक्की किंमत काय, हे कोणालाही नेमकं सांगता येत नाही. त्यातून बहुसंख्य लोकांना या जाहिरातींचा फायदा व्हावा अशा पद्धतीनंच जाहिरातींची योजना केलेली असते. अगदी फायदा नाही तरी वस्तू किंवा सेवा विकत घेतल्यावर ती हवीहवीशीच वाटते, अशा या गोष्टी असतात.

गूगल, फेसबुक वगैरे आपली व्यक्तिगत माहिती गोळा करतात. आपल्या व्यक्तिगत अवकाशात घुसखोरी करण्याची आणि होण्याची तशी आपण भारतीयांना सवयही असते. लग्न झालेल्या मुलीनं मंगळसूत्र घातलं नाही तर तिच्या बहुसंख्य नातेवाईकांना किती राग येतो, हे बघितलं आहे का! अशा लोकांना कंटाळून त्यांची तक्रार आपण ट्विटर-फेसबुकवर करायची तरी जपून! लगेच स्त्रीवादी छापाच्या वस्तूंच्या जाहिराती दिसायला लागतील.

मी त्याचीही तक्रार समाजमाध्यमांवर करेन.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2019 12:53 am

Web Title: vidabhan article by sanhita joshi 18
Next Stories
1 नफ्यापुरतीच पाळत
2 गूगलशी कशाला खोटं बोलू?
3 चूक, त्रुटी की अन्यायही?
Just Now!
X