News Flash

सेल्युलर तंत्रज्ञानाच्या क्रांतिपिढय़ा..

ध्वनिलहरींच्या अशा तार्किक विभागणीमुळे सेल्युलर तंत्रज्ञान एका वेळेला लाखो वापरकर्त्यांना सेवा पुरवू शकते.

अमृतांशु नेरुरकर

आपण तयार करत असलेल्या विदेचे अमर्याद संकलन हे काही गेल्या दशकभरात समाजमाध्यमांच्या उदयानंतर सुरू झालेले नाही. सेल्युलर तंत्रज्ञानाच्या उगमापासून ते गेली चार दशके अविरतपणे सुरू आहे, ते कसे?

सेल्युलर तंत्रज्ञानाचा वापर हा आपल्या दैनंदिन व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण करून (सव्‍‌र्हेलन्स) त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची रूपरेखा तयार करण्यासाठी (प्रोफाइलिंग) का व कसा करतात, हे जाणून घेण्याआधी या तंत्रज्ञानाला ‘सेल्युलर’ का म्हटले जाते हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. या तंत्रज्ञानामागची मूळ संकल्पना ही ध्वनिलहरींच्या वारंवारतेच्या पुनर्वापराशी (फ्रिक्वेन्सी रियुज) निगडित आहे. ज्या भौगोलिक क्षेत्राला मोबाइल सेवा पुरवायची आहे, त्या क्षेत्राला विविध प्रभागांमध्ये (क्लस्टर) विभागले जाते. मोबाइल सेवादात्याकडे उपलब्ध असलेला संपूर्ण ध्वनिवर्णपट (स्पेक्ट्रम) वापरायची मुभा प्रत्येक प्रभागाला असते. पुढे प्रत्येक प्रभागाला जवळपास समान, पण छोटय़ा आकाराच्या हिश्शांमध्ये विभागले जाते, ज्यांना ‘सेल’ असे संबोधतात. उपलब्ध ध्वनिवर्णपटाचा काही ठरावीक हिस्सा हा प्रत्येक सेलला विभागून दिला जातो. तांत्रिकदृष्टय़ा प्रत्येक मोबाइल फोन हा एका वेळेला कुठल्या ना कुठल्या सेलबरोबर जोडलेला असतो. म्हणूनच या तंत्रज्ञानाबरहुकूम कार्य करणाऱ्या फोनला ‘सेल्युलर’ फोन असे म्हटले जाते.

ध्वनिलहरींच्या अशा तार्किक विभागणीमुळे सेल्युलर तंत्रज्ञान एका वेळेला लाखो वापरकर्त्यांना सेवा पुरवू शकते. यामुळे शहराच्या दोन वेगवेगळ्या प्रभागांत राहणाऱ्या व्यक्ती एकाच ध्वनिवर्णपटाचा वापर करून आपापले संभाषण विनाव्यत्यय करू शकतात. सेल्युलर तंत्रज्ञानाची मुहूर्तमेढ सर्वप्रथम युरोपात रोवली गेली. १ ऑक्टोबर १९८१ रोजी ‘नॉर्डिक मोबाइल टेलिफोनी (एनएमटी)’ नावाची, खऱ्या अर्थाने ‘सेल्युलर’ म्हणता येईल अशी सेवा नॉर्वे आणि स्वीडनमध्ये संयुक्तरीत्या सुरू झाली. पुढच्याच वर्षी डेन्मार्क आणि फिनलंड हे इतर स्कँडिनेव्हियन देश या सेवेशी जोडले गेले. जगाला दूरसंचारासाठीचे हे तंत्रज्ञान देणाऱ्या देशांतच ‘एरिकसन’ (स्वीडन) आणि भारतीयांना सुपरिचित अशी ‘नोकिया’ (फिनलंड) या कंपन्या जन्मास याव्यात हा केवळ एक योगायोग खचितच नाही.

पुढील एखाद् दोन वर्षांतच इंग्लंडसकट सर्व युरोपात एनएमटी सेवेचा विस्तार झाला, तर अमेरिकेत फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (एफसीसी) या शासकीय आयोगाद्वारे १९८३ साली सेल्युलर सेवेची सुरुवात झाली. त्याआधी उपलब्ध असलेल्या कोणत्याही मोबाइल तंत्रज्ञानापेक्षा सर्वच बाबतींत सेल्युलर तंत्रज्ञान उजवे असल्याने अल्पावधीतच ग्राहकांच्या त्यावर अक्षरश: उडय़ा पडल्या. १९८५ मध्ये, म्हणजे सुरू झाल्यापासून पहिल्या केवळ चार वर्षांत स्कँडिनेव्हियन देशांत सेल्युलर सेवेच्या ग्राहकांनी एक लाख दहा हजारांचा टप्पा गाठला होता, तर अमेरिकेत केवळ दोन वर्षांत दोन लाख ग्राहकांचा टप्पा पार केला होता. वापरकर्त्यांच्या संख्येवर याआधीच्या तंत्रज्ञानात असलेली मर्यादा संपुष्टात आल्याने या देशांच्या दूरसंचार नियामक आयोगांना कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याची गरज आता उरली नव्हती.

१९८१ पासून सुरू झालेल्या सेल्युलर क्रांतीचे, प्रत्येक दशकासाठी एक असे ढोबळमानाने पाच टप्पे करता येऊ शकतील. सेल्युलर तंत्रज्ञानामध्ये प्रत्येक टप्प्याचे नव्या पिढीने (जनरेशन किंवा ‘जी’ या आद्याक्षराने) क्रमांकन केले आहे. खरोखरच प्रत्येक नव्या आणि त्याच्या आधीच्या टप्प्यामध्ये (तांत्रिक क्षमतांच्या दृष्टीने) एका पिढीचेच अंतर आहे. सर्वात पहिला टप्पा म्हणजे ऐंशीच्या दशकातली ‘१-जी’ सेवा! यामध्ये सेल्युलर फोनचा वापर, दूरध्वनी (लॅण्डलाइन)सारखाच, फक्त संभाषणापुरताच करता येत होता. त्या काळातला सर्वात लोकप्रिय सेल्युलर फोन ‘मोटोरोला’चा ‘डायनाटॅक ८००० एक्स’ (चित्र पाहा) हा सर्व निकषांवर आजच्या युगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनसमोरदेखील बैलगाडीच वाटेल. पाऊण किलोपेक्षाही अधिक वजन असलेला, १३ इंच लांबी व साडेतीन इंच खोलीमुळे चौकोनी आकाराच्या पेपरवेटसारखा स्थूल दिसणारा असला, तरीही त्याची तेव्हाची किंमत ३,९९५ डॉलर्स एवढी अगडबंब होती. एवढे पैसे खर्चूनही त्याची पूर्ण क्षमतेने भरलेली बॅटरी फक्त अध्र्या तासाच्या संभाषणानंतर संपत असे.

१९९१ मध्ये सेल्युलर तंत्रज्ञान प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी युरोपात ‘ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाइल कम्युनिकेशन्स’ या मानकाची (स्टॅण्डर्ड) पायाभरणी करण्यात आली. अगदी आजघडीलाही सर्वाधिकपणे वापरण्यात येणारे हेच ते जीएसएम मानक! तेव्हा प्रथमच संभाषणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होत होता. आजही वापरली जाणारी लघुसंदेश सेवा (एसएमएस) याच काळात उदयास आली. या टप्प्याला ‘२-जी’ म्हटले गेले.

नव्या सहस्रकाच्या पहिल्याच वर्षी, २००१ मध्ये सेल्युलर तंत्रज्ञानाने ‘डिजिटल’ भरारी घेतली. तोवर एसएमएससारख्या सेवेद्वारे होणाऱ्या विदावहनासाठी आधीच्या ‘अ‍ॅनालॉग’ तंत्रज्ञानाऐवजी ‘पॅकेट स्विचिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. आंतरजालावर माहितीच्या देवाणघेवाणीसाठी हेच तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानामध्ये कोणत्याही मोठय़ा संदेशाला छोटय़ा छोटय़ा तुकडय़ांमध्ये (पॅकेट्स) विभागून त्यांना समांतरपणे प्रसृत केले जाते व हे सर्व तुकडे, ज्याला संदेश प्राप्त होणार आहे त्याच्याकडे पोहोचले की एकत्र जोडून त्यातून मूळ संदेश बनवला जातो. अशा पद्धतीमुळे संदेशवहन अत्यंत वेगाने घडू शकते. ‘३-जी’ नावाने संबोधल्या जाणाऱ्या या टप्प्याने सेल्युलर तंत्रज्ञानाला प्रथमच इंटरनेट वापरासाठी सक्षम बनवले.

२०१०च्या सुरुवातीला आलेल्या ‘४-जी’ टप्प्याने मात्र खऱ्या अर्थाने सेल्युलर तंत्रज्ञानाला ‘स्मार्टफोन’ वापरण्यायोग्य बनवले. आता विदा (डेटा) आणि ध्वनी (व्हॉइस) या दोघांचेही वहन पॅकेट स्विचिंगनेच व्हायला लागले. उच्च विदावेगामुळे (डेटा स्पीड) आंतरजालावरील सर्व प्रकारची उपयोजने (अ‍ॅप्स) प्रभावीपणे वापरणे अत्यंत सुलभ बनले. कोविड संक्रमण काळात घरून काम किंवा घरूनच शाळा व अभ्यास करण्याची अचानक निर्माण झालेली निकड भागविण्यात बऱ्याच प्रमाणात ‘४-जी’ सेवेचा हातभार लागला. काही देशांत २०१८-१९ दरम्यान उपलब्ध झालेले आणि भारतात (रिलायन्स जिओतर्फे) २०२१च्या उत्तरार्धात येऊ घातलेले ‘५-जी’ तंत्रज्ञान हे सेल्युलर सेवेची व्याप्ती पुष्कळ पटींनी वाढवण्यास मदत करणार आहे. अतिजलद व अत्युच्च दर्जाची विदावहन सेवा आणि त्याच्याच जोडीला अत्यंत छोटय़ा आकाराच्या उपकरणांवरदेखील सेल्युलर सेवा उपलब्ध करून देण्याची क्षमता यांमुळे येत्या डिजिटल परिवर्तनाच्या काळात वस्तुजालाशी (इंटरनेट ऑफ थिंग्स) निगडित सेवांचा व्यापक प्रसार व विनियोग करण्यासाठी ‘५-जी’ तंत्रज्ञानाची पुष्कळ मदत होणार आहे.

२०१४ पासून, ‘४-जी’ तंत्रज्ञान स्थिरावल्यानंतर, वेगवान इंटरनेट जवळपास सर्वत्र व सदैव उपलब्ध होऊ लागले. त्याच्या जोडीला केवळ तळहातावर मावतील इतक्या आकाराचे, पण उच्च कार्यक्षमता असणारे व तरीही सर्वसामान्यांच्या खिशाला सहज परवडतील असे स्मार्टफोन्स बाजारात आले. या दोन्ही तंत्रज्ञानांचा यथायोग्य वापर करून, मोबाइलधारकाला बहुपयोगी अशा विविध सेवा उपयोजनांद्वारे (अ‍ॅप्स) स्मार्टफोनवरच मिळण्यास सुरुवात झाली. एसएमएस, ई-मेल, छायाचित्रण, मनोरंजन (संगीत, चित्रपट, ओटीटी आदी), ऑनलाइन खेळ, आर्थिक व्यवहार/बँकिंग, स्थळ-काळदर्शक सेवा (गूगल मॅप्स आदी), समाजमाध्यमे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी) आणि आंतरजालावरील माहिती-शोध (वेबसर्फिग) अशा विविध डिजिटल सेवा स्मार्टफोनच्या एकाच व्यासपीठावर एकत्रितपणे उपलब्ध झाल्या आणि माहितीच्या अभिसरणाची (सेल्युलर कन्व्हर्जन्स- विदेचे उत्पादन आणि देवाणघेवाण करण्यासाठीची सर्व साधने एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणे) संकल्पना प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झाली.

‘सेल्युलर कन्व्हर्जन्स’मुळे वापरकर्त्यांसाठी स्मार्टफोनवर विदेची अविरत निर्मिती करणे आत्यंतिक सोपे होत होते. याचाच परिपाक दिसून आला नोव्हेंबर २०१६ मध्ये, जेव्हा स्मार्टफोनवर इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रथमच संगणकावर इंटरनेट वापरणाऱ्यांपेक्षा जास्त झाली. ही घटना विदानिर्मितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण होतीच, पण त्याहून महत्त्वाची ती विदासंकलनाच्या दृष्टीने होती. कारण स्मार्टफोनवर विदेची निर्मिती करणे जितके सोपे आहे, तेवढेच- किंबहुना त्याहूनही अधिक सोपे आहे स्मार्टफोनवरच्या इंटरनेट, समाजमाध्यमे व इतर अ‍ॅप्सच्या वापरातून तयार होणाऱ्या विदेचे संकलन करणे!

आपण तयार करत असलेल्या विदेचे असे अमर्याद संकलन हे काही गेल्या दशकभरात समाजमाध्यमांच्या उदयानंतर सुरू झालेले नाही. सेल्युलर तंत्रज्ञानाच्या उगमापासून ते गेली चार दशके अविरतपणे सुरू आहे. सेल्युलर तंत्रज्ञानाची जडणघडणच अशी झाली आहे, की वापरकर्त्यांच्या संभाषणासंदर्भातली व स्थळ-काळासंबंधीची माहिती ठरावीक अंतराने गोळा करत राहणे हे त्याचा फोन कार्यरत राहण्यासाठी अनिवार्य आहे. अशाप्रकारे लोकांच्या ई-व्यवहारांचे सतत निरीक्षण (सव्‍‌र्हेलन्स) केल्यामुळे विदासुरक्षा व गोपनीयतेची तडजोड कशी होऊ शकते, हे पुढील लेखात पाहू..

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:27 am

Web Title: mobile technology evolution of cellular technology zws 70
Next Stories
1 ‘सेल्युलर’ तंत्रज्ञानाचा उदय…
2 हार्लनची कसोटी..
3 ..अन् गोपनीयता निकालात निघाली!
Just Now!
X