अमृतांशु नेरुरकर amrutaunshu@gmail.com
आंतरजाल तसेच समाजमाध्यमांवरील सुरक्षित वावरासाठी वापरकर्ता म्हणून कोणती पथ्ये पाळायची?

गेल्या दशकभरात भूमितीश्रेणीने वाढलेला स्मार्टफोनचा वापर आणि त्यावरून आंतरजाल (इंटरनेट) तसेच समाजमाध्यमी व्यासपीठांवर अविरत निर्मिली जाणारी विदा, यामुळे एक वापरकर्ता म्हणून मोबाइल अ‍ॅप्स (उपयोजने) आणि समाजमाध्यमांचा वापर करताना कोणती खबरदारी घेणे जरुरीचे आहे, हे पाहू या..

(१) मोबाइल अ‍ॅप्स आणि विदासुरक्षा : सध्या असा एकही दिवस जाणार नाही, की संपूर्ण दिवसभरात आपण एखाद् तासदेखील मोबाइल अ‍ॅप्सचा वापर केला नसेल. राजकीय, सामाजिक बातम्यांचा मागोवा घेणे, गाणे ऐकणे, सिनेमा-वेबमालिका पाहणे, ऑनलाइन खेळ खेळणे, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारणे, ई-व्यवहार करणे.. साधारणपणे आपण सर्वच जण दिवसातील बराच काळ अशा विविध कारणांसाठी मोबाइल अ‍ॅप्सवर व्यतीत करतो. म्हणूनच स्मार्टफोन वापरासंदर्भात आपण एखाद्या अ‍ॅपला कोणकोणत्या परवानग्या दिल्या आहेत याची तपासणी ते अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनवर प्रतिष्ठापित करताना आणि पुढेही नियमितपणे करणे अत्यावश्यक आहे. अ‍ॅपचे आपल्याला जरुरीचे असलेले कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी जेवढी विदा गोळा करणे आवश्यक आहे तेवढीच विदा अ‍ॅपकडून गोळा केली जातेय का, की अनावश्यक विदा गोळा करून आपल्यावर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होतोय, हे यातून स्पष्ट होऊ शकेल.

अ‍ॅपला दिलेली कोणतीही परवानगी हा एक प्रकारचा विशेषाधिकार आहे, ज्यामुळे आपल्या फोनवरील ठरावीक प्रकारची माहिती मिळवणे (उदा. आपले स्थान, फोनमधील संपर्क यादी वगैरे) त्या प्रणालीला शक्य होते. बऱ्याचदा, विशेषत: प्रथितयश डिजिटल व समाजमाध्यमी कंपन्यांचे अ‍ॅप हे गरज नसताना फोनवरील वैयक्तिक विदा हाताळायची परवानगी मागत नाहीत.

मध्यंतरी ‘फेसबुक मेसेंजर’ने फोन तसेच संगणकाचा मायक्रोफोन हाताळायची परवानगी मागितल्यामुळे पुष्कळ गदारोळ झाला होता. पुढे फेसबुकला हे स्पष्ट करावे लागले की, ही परवानगी वापरकर्त्यांचे संभाषण चोरून ऐकण्यासाठी मागितली जात नसून त्या अ‍ॅपमध्ये नव्याने अंतर्भूत झालेल्या ‘व्हॉइस-मेमो’ प्रणालीचे कार्य (ज्यामुळे वापरकर्ता टाइप न करता केवळ बोलून आपला संदेश पाठवू शकत असे) सुरळीत चालू ठेवण्यासाठी मागितली जात होती. त्याचप्रमाणे ‘गूगल पे’सारखी अ‍ॅप्स जेव्हा फोनवरील संपर्क यादी हाताळायची परवानगी मागत असतात, तेव्हा त्यांचा उद्देश ही माहिती आपल्या नकळत परस्पर कंपनीच्या डेटाबेसमध्ये साठवण्याचा नसतो. ‘गूगल पे’च्या माध्यमातून आपल्या परिचितांशी होणारे आर्थिक व्यवहार विनासायास पार पडावेत, हाच यामागचा उद्देश असतो.

असे असले तरीही, अ‍ॅपने विदा हाताळणीसाठी मागितलेली प्रत्येक परवानगी देणे वापरकर्त्यांस बंधनकारक नाही आणि त्याची बऱ्याचदा आवश्यकताही नसते. समजा, आपण ‘फेसबुक मेसेंजर’च्या ‘व्हॉइस-मेमो’ प्रणालीचा कधी वापर करणारच नसू तर फोनचा मायक्रोफोन हाताळण्याची परवानगी न दिलेलीच बरी! प्रत्येक अ‍ॅपच्या विदा आणि गोपनीयतेच्या संदर्भातील ‘सेटिंग्स’ना तपासून अ‍ॅपला कोणती परवानगी देणे स्वीकारावे किंवा नाकारावे हे ठरवता येऊ शकते. अ‍ॅपने मागितलेल्या प्रत्येक परवानगीमागे काय उद्दिष्ट आहे हे समजून घ्यायची उत्सुकता असेल, तर अ‍ॅपच्या संस्थळावर त्याची विस्तृत नोंद केलेली असते. अ‍ॅपचे एखादे वैशिष्टय़ आपण खरेच वापरणार आहोत का, याचा अंदाज घेऊन त्यासंदर्भात मागितलेल्या परवानगीला आपल्याला मनाई करता येते. आधी मनाई केलेल्या अशा वैशिष्टय़ाला पुढे जाऊन परवानगी देणेही सहज शक्य असते. थोडक्यात, मोबाइल अ‍ॅपने आपल्या वैयक्तिक विदा हाताळण्यासंदर्भात मागितलेल्या परवानग्या सरसकट डोळे झाकून देण्यापेक्षा योग्य माहितीच्या आधारे देणे हे श्रेयस्कर!

(२) समाजमाध्यमांवर गोपनीयतेचे नियंत्रण : समाजमाध्यमांवर आपण जेव्हा वैयक्तिक छायाचित्र पोस्ट करतो, एखादे ट्वीट करतो किंवा एखाद्या जाहीर चर्चेत सहभागी होऊन आपले मत नोंदवतो, त्या वेळेला आपण शेअर केलेल्या मूळ माहितीसमवेत (छायाचित्र, ट्वीट आदी) आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा खाली नमूद केलेल्या इतर विविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण होत असते-

(अ) आपल्या पोस्टची तारीख व वेळ

(आ) पोस्ट जिथून केली ते स्थान

(इ) आपल्या ‘प्रोफाइल’ची लिंक

(ई) आपली व्यक्तिगत माहिती- जसे की,

संपर्क साधण्याचा ई-मेल किंवा फोन क्रमांक,

जन्मतारीख, लिंग, वय आदी

(उ) आपल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिलेल्या व

आपल्या संपर्क यादीत असलेल्या लोकांच्या

‘प्रोफाइल’ची लिंक

(ऊ) पोस्ट केलेल्या छायाचित्र किंवा

दृक्मुद्रणांच्या आधारे मिळालेली माहिती- जसे

की, ओळख पटलेल्या व्यक्तींच्या ‘प्रोफाइल’ची

लिंक, ‘टॅग’ केलेल्या व्यक्तींची माहिती, आदी.

आता वरील माहिती आपल्या परिचितांशी शेअर करायला आपली ना असण्याचे काही कारण नाही. पण अशी माहिती आपल्याला नको असलेल्या व अपरिचित अशा व्यक्तींच्या हाती न लागण्यासाठी कोणती दक्षता घ्यावी लागेल, हे समजून घेणे गरजेचे आहे. जवळपास सर्व प्रकारच्या समाजमाध्यमी व्यासपीठांवर आपली वैयक्तिक स्वरूपाची विदा, तसेच आपण निर्मिती करत असलेली विदा (नवी पोस्ट, चर्चामधील सहभाग, दुसऱ्याच्या पोस्टवर दिलेला प्रतिसाद वगैरे) कोणाबरोबर व किती प्रमाणात शेअर व्हावी, याचे नियंत्रण बऱ्याचदा आपल्या हाती असते.

उदाहरणार्थ, फेसबुकवरची आपली ‘प्रोफाइल’ आणि आपण करत असलेल्या पोस्ट कोणाला दिसायला हव्यात हे ठरवण्यासाठी फेसबुकच्या ‘प्रायव्हसी सेटिंग्स’मध्ये ‘ऑडियन्स सिलेक्टर’नामक एक पर्याय दिलेला असतो, ज्यायोगे आपली व्यक्तिगत विदा कोणाबरोबर आणि कितपत शेअर करावी हे निवडता येऊ शकते. ‘इन्स्टाग्राम’वर आपण आपल्या प्रोफाइलला ‘प्रायव्हेट’ अर्थात खासगी ठेवू शकतो, ज्यामुळे दुसऱ्या कोणत्याही वापरकर्त्यांला आपल्या परवानगीशिवाय आपले अनुसरण (‘फॉलो’) करता येत नाही. आपली व्यक्तिगत तसेच पोस्ट केलेली माहिती कोण बघू शकतो, यावर मग आपोआपच एक नियंत्रण येतं. ‘ट्विटर’वर हीच गोष्ट आपली प्रोफाइल ‘प्रोटेक्टेड’ किंवा सुरक्षित ठेवून करता येते. याचबरोबर आपले ट्वीट्स व रिट्वीट्स गूगल किंवा तत्सम शोध इंजिनांवर दिसू नयेत, आपले ट्वीट्स कमाल किती लोक पाहू शकतात वा त्यावर प्रतिसाद देऊ शकतात, हेसुद्धा वापरकर्त्यांस ठरवता येते. थोडक्यात, प्रत्येक समाजमाध्यमी व्यासपीठाच्या ‘प्रायव्हसी सेटिंग्स’ तपासून त्यावरील आपल्या खासगी विदेवर काही प्रमाणात नियंत्रण आपल्याला नक्कीच मिळवता येऊ शकेल.

(३) आंतरजालावरील विदासुरक्षेचे काही संकीर्ण उपाय :

(अ) समाजमाध्यमी किंवा इतर संस्थळे बऱ्याचदा आपल्याला काही अर्ज भरायला लावतात, ज्यात आपली व्यक्तिगत माहिती पुरवण्याची विनंती केलेली असते. असे अर्ज भरताना कमीत कमी व्यक्तिगत माहिती देण्याचे धोरण पुष्कळ फायदेशीर ठरू शकते. विशेषत: वैकल्पिक माहिती कधीच भरू नये. एवढेच नव्हे, तर काही बाबतींत चक्क बनावट माहिती देण्यासही कचरण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, एखादे ऑनलाइन गेमिंग संस्थळ जर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक किंवा व्यवसायासंबंधी माहिती विचारत असेल, तर अशी अप्रासंगिक स्वरूपाची व गेमिंगशी सर्वस्वी असंबंधित माहिती मुद्दामहून चुकीची पुरवायला काहीच हरकत नाही.

(ब) आंतरजालावरील आपल्या वापरात नसलेली अशी जुनी व ऐतिहासिक विदा वेळोवेळी साफ करणे हा विदासुरक्षेचा एक प्रभावी उपाय आहे. समाजमाध्यमांवरची आपली जुनी खाती हटवणे किंवा किमान निष्क्रिय करणे जरुरीचे आहे. बरीच समाजमाध्यमी अ‍ॅप, आपले खाते कायमस्वरूपी हटवण्याआधी आपली सर्व विदा ‘डाऊनलोड’ करण्याचाही पर्याय देतात, ज्याची गरज भासल्यास आपण नक्कीच वापर करू शकतो. त्याचबरोबर आपण कधी काळी सदस्यत्व घेतलेल्या व आता जराही स्वारस्य नसलेल्या ‘मेलिंग लिस्ट’ची सदस्यता रद्द करणे किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारख्या मंचावरील गरज संपलेल्या एखाद्या गटातून बाहेर पडणे यांसारखे साधे सोपे उपायही आपल्या डिजिटल पाऊलखुणा मर्यादित ठेवण्यास पुष्कळ हातभार लावतात.

आंतरजाल व समाजमाध्यमांवरील सुरक्षित वावरासाठी एक वापरकर्ता म्हणून कोणती पथ्ये पाळावी लागतील, याचा विस्तृत आढावा आपण या आणि मागील लेखात घेतला. विदा व्यवस्थापन व तिच्या गोपनीयतेचे रक्षण ही एक बहुआयामी, निरंतर चालणारी व अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. विशेषत: गेल्या दोन दशकांत उदयास आलेल्या या क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण ‘केस स्टडीज्’ व यशोगाथांविषयी पुढील लेखापासून जाणून घेऊ.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.