अमृतांशु नेरुरकर amrutaunshu@gmail.com
आंतरजालावरील वापरकर्त्यांच्या विविध कृतींचा पट नोंदवला जाण्याने त्यास जुजबी फायदे मिळत असले, तरी याचे धोके अधिक..

आपल्या डिजिटल क्रियाकलापांमुळे निर्माण होणारी विदा (डेटा) आपल्या ‘पाऊलखुणा’ आंतरजालावर (इंटरनेट) दिवसभरात सतत उमटवत असते. वेब सर्फिग, गूगल शोध, ई-व्यवहार, ई-मेलला प्रतिसाद, स्मार्टफोनमधील कोणत्याही अ‍ॅपचा वापर, समाजमाध्यमांवरील एखादी ‘पोस्ट’, स्काइप, झूमसारख्या दूरसंवाद करण्यासाठीच्या सॉफ्टवेअरचा वापर करून केलेला कॉल किंवा योजलेली बैठक.. अशा विविध क्रिया आपल्या डिजिटल पाऊलखुणांच्या निर्मितीस हातभार लावत असतात. एक प्रकारे हा आंतरजालाच्या नोंदवहीत, बऱ्याच अंशी कायमस्वरूपी नोंदला गेलेला आपला डिजिटल इतिहासच आहे.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल  

या निरंतर निर्मिल्या जाणाऱ्या माहितीचा वापर- जाहिरातदारांकडून त्यांची उत्पादने प्रभावीपणे विकण्यासाठी, कंपन्यांकडून नव्या नोकऱ्या देताना उमेदवारांची छाननी करण्यासाठी किंवा विद्यमान कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन व्यवहारांचे निरीक्षण करण्यासाठी, बँकांकडून ग्राहकाला कर्ज देण्याचा निर्णय घेताना.. अशा विविध व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. एवढेच नव्हे, तर अशा माहितीचा गैरवापर आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी, काही गोपनीय व संवेदनशील माहिती आपल्याकडून काढून घेण्यासाठी व आर्थिक फसवणुकीकरितासुद्धा केला जातो. म्हणूनच आपण कुठली संस्थळे पाहतो, कोणते ई-मेल उघडतो, कोणत्या लिंकवर क्लिक करतो, याबाबतीत सावधानता बाळगणे गरजेचे आहेच; पण त्याचबरोबर आपण कोणत्या व्यासपीठावर कसल्या प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण कोणाबरोबर करतो, यासंदर्भातही काळजी घ्यावीच लागेल. आंतरजालावरील सुरक्षित वावरासाठी आपल्याला काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे, त्यातील ‘कुकी व्यवस्थापन’ या महत्त्वाच्या विषयाचा ऊहापोह या लेखात आपण करणार आहोत.

मागील एका लेखात आपण ‘कुकी’ या संकल्पनेचा थोडक्यात परामर्श घेतला होता. विविध प्रकारची माहिती पुरवणारी संस्थळे (वृत्तपत्रे, नियतकालिके, शोधपत्रिका आदी), ई-व्यवहार तसेच इतर आर्थिक व्यवहार करणारी पोर्टल्स किंवा अनेक कंपन्यांच्या संकेतस्थळांना आपण जेव्हा प्रथमच भेट देतो तेव्हा- ‘हे संस्थळ तुम्हाला वैयक्तिकृत अनुभव देण्यासाठी कुकीज्चा वापर करते,’ अशा प्रकारचे विधान वाचल्याचे तुम्हाला आठवत असेल. त्याचबरोबर त्या संस्थळाने कुकीज्चा वापर करणे तुम्हाला स्वीकारार्ह आहे, अशा प्रकारच्या अटी आणि शर्तीचा ‘अ‍ॅक्सेप्ट कुकीज्’ हे बटण दाबून स्वीकार केल्याचेही तुम्हाला स्मरत असेल.

आजघडीला जवळपास प्रत्येक संस्थळ वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीची एक फाइल स्वतंत्रपणे त्याच्या संगणकावर किंवा स्मार्टफोनमध्ये साठवत असते, जिला तांत्रिक भाषेत ‘कुकी’ असे म्हटले जाते. कुकींचा वापर करण्याचे वापरकर्त्यांच्या दृष्टीने काही फायदे नक्कीच आहेत. आपली ‘ओळख’ संस्थळाकडे राहत असल्यामुळे आपल्याला वैयक्तिकृत अनुभव मिळतो. दर वेळेला ‘लॉग इन’ करावे न लागणे, आपल्या ब्राऊजिंगच्या किंवा खरेदीच्या पूर्वेतिहासाप्रमाणे योग्य पर्याय दिसत राहणे अशा गोष्टी तर अनुभवायला मिळतातच; पण त्याचबरोबर आपली वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, ई-मेल, फोन आदी) कुकीमध्ये साठवली जात असल्याने कोणताही वेब अर्ज भरणेदेखील सोपे होते.

निव्वळ एक फाइल म्हणून कुकी निरुपद्रवी असल्या तरीही, त्यातील विदा मौल्यवान असल्याने वरील जुजबी फायद्यांसाठी सर्व प्रकारच्या कुकीज्चा स्वीकार करणे हे घातक ठरू शकते. कुकीचा वापर ते संस्थळ आणि त्याच्याशी निगडित जाहिरातदार तर करतातच, पण आपल्या ऑनलाइन वर्तणुकीचा मागोवा घेण्यासाठीही तिचा सर्रास वापर आजकाल केला जातो. कोणत्या प्रकारच्या कुकीचा स्वीकार करणे योग्य असू शकेल, हे ठरवण्यासाठी कुकीज्चे प्रकार समजून घेणे गरजेचे आहे. कुकीज्चे वर्गीकरण करण्यासाठी तीन प्रकारचे मापदंड वापरले जातात :

(१) कालावधी : कुकी किती काळासाठी आपल्या संगणकावर साठवली जाणार आहे हे यात तपासले जाते. काही कुकीज् तात्पुरत्या, आपले ब्राऊजिंग चालू असेपर्यंत साठवल्या जातात आणि एकदा का आपण ब्राऊजर बंद केला की त्या आपोआप संगणकावरून हटवल्या जातात. अशांना ‘सेशन कुकीज्’ असे म्हणतात. याउलट, काही कुकीज् कायमस्वरूपी आपल्या संगणकावर वास्तव्य करून असतात आणि जोवर आपण स्वत:हून त्या हटवत नाही तोवर त्या साठवल्या जातात, ज्यांना ‘पर्सिस्टंट कुकीज्’ असे म्हटले जाते.

(२) उगमस्थान : एखादी कुकी आपल्याकडे कुठून आली त्यावर तिचे उगमस्थान ठरते. आपण पाहत असलेले संस्थळ जी कुकी आपल्या संगणकावर साठवते तिला ‘फर्स्ट पार्टी कुकी’ म्हणतात, तर आपण पाहत असलेल्या संस्थळाशी निगडित जाहिरातदारांकडून साठवल्या गेलेल्या कुकीला ‘थर्ड पार्टी कुकी’ म्हणतात.

(३) उद्देश : वरील दोन मापदंड काहीसे तांत्रिक आहेत; पण कोणत्याही संस्थळाचा आपल्या संगणकावर एखादी कुकी साठवण्यामागे काय हेतू आहे, हे जाणून घेणे एक वापरकर्ता म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा हेतू स्पष्ट झाला, की कोणत्या प्रकारची कुकी आवश्यक आहे आणि कोणती अनावश्यक आहे याचा निर्णय आपापल्या गरजांप्रमाणे वापरकर्ता घेऊ शकतो. सर्वसाधारणपणे, संस्थळांच्या कुकी साठवण्याच्या उद्देशानुसार कुकीज्चे चार प्रकार पाडले जातात. ते पुढीलप्रमाणे :

(अ) अत्यावश्यक कुकी : एखाद्या संस्थळाला भेट देऊन त्यावर कोणताही ई-व्यवहार करण्यासाठी काही प्रकारच्या कुकीज् अत्यावश्यक असतात. उदाहरणार्थ, अ‍ॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स संस्थळावर खरेदी करताना एखादी वस्तू आवडली, की तिला लगेच विकत घेण्याची गरज नसते. तिला ‘कार्ट’मध्ये घालून आपण इतर गरजेच्या वस्तूंचा शोध घेत राहू शकतो आणि कार्टमध्ये साठलेल्या सर्व गोष्टींची शेवटी एकदाच खरेदी करू शकतो. आपला वस्तूंचा शोध चालू असताना कार्टमधील वस्तू व्यवस्थितपणे तशाच राहू देण्यासाठी जी कुकी कार्यरत असते ती ‘अत्यावश्यक’ वर्गात मोडते, कारण तिच्याशिवाय आपली ई-खरेदी पूर्ण होऊच शकणार नाही.

(ब) प्राधान्यक्रम ठरवणारी (‘प्रेफरन्स’)

कुकी : या प्रकारची कुकी आपल्या सर्व आवडीनिवडी (उदा. लॉग इन करण्यासाठीची माहिती, भाषा, देश आदी) लक्षात ठेवते, ज्यामुळे आपला ब्राऊजिंगचा अनुभव काही प्रमाणात सुखद होऊ शकतो.

(क) आकडेवारीची (‘स्टॅटिस्टिक्स’) नोंद ठेवणारी कुकी : ही कुकीसुद्धा निरुपद्रवी प्रकारात मोडते; कारण हिचा उद्देश हा संस्थळाची गुणवत्ता सुधारण्यासाठीच केवळ केला जातो. आपण संस्थळावरील कोणत्या पृष्ठाला भेट दिली, त्यावर किती वेळ घालवला, कोणत्या लिंक्स क्लिक केल्या अशी नोंद ही कुकी ठेवते. पण महत्त्वाचे म्हणजे, या सर्व नोंदी निनावी पद्धतीने एकत्रित स्वरूपात ठेवल्या जातात, ज्यामुळे या कुकीच्या आधारे कोणा एका विशिष्ट वापरकर्त्यांची ओळख पटवणे अशक्य असते.

(ड) डिजिटल जाहिराती दर्शविण्यासाठी लागणारी कुकी : या कुकीला ‘मार्केटिंग’ कुकी असेही म्हटले जाते. नावाप्रमाणेच हिचा उपयोग आपल्या आवडीनिवडी, पूर्वखरेदी आणि प्राधान्यक्रमांनुसार जाहिराती दाखवण्यासाठी केला जातो. मागील एका लेखात आपण या संपूर्ण यंत्रणेचा ऊहापोह केला होता. ‘पर्सिस्टंट’ आणि ‘थर्ड पार्टी’ असणाऱ्या या कुकीज् आपली वैयक्तिक माहिती बिनदिक्कतपणे इतर जाहिरातदार किंवा संस्थांशी ‘शेअर’ करू शकतात.

कुकीज्चे विविध प्रकार समजून घेणे एक वापरकर्ता म्हणून गरजेचे असले, तरीही आजही बरीचशी संस्थळे ती वापरत असलेल्या कुकीज्ची विस्तृत माहिती आपल्याला पुरवत नाहीत. अमेरिकेसकट अनेक देशांमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना हे जराही बंधनकारक नाहीये. विदा सुरक्षा व व्यवस्थापन यासंदर्भातील धोरणे ठरविण्यात कायमच अग्रेसर असलेल्या युरोपीय महासंघाने २०१६ साली आणलेल्या व संघातील प्रत्येक देशासाठी बंधनकारक असलेल्या ‘जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर)’ कायद्यात मात्र याची योग्य काळजी घेतली गेली आहे. ‘जीडीपीआर’च्या तरतुदींनुसार प्रत्येक खासगी किंवा शासकीय युरोपीय संस्थळाला ते वापरत असलेल्या वरील सर्व प्रकारच्या कुकीज्ची माहिती वापरकर्त्यांला पारदर्शकपणे देण्याचे बंधन घातले गेले आहे. त्यामुळे ‘अत्यावश्यक’ वर्गातील कुकीज् वगळता बाकी तीनही प्रकारच्या कुकीज्चा स्वीकार करण्याचा अधिकार सर्वस्वी वापरकर्त्यांला देण्यात आला आहे. मात्र, जोवर इतर देश अशा पद्धतीचे नियम बंधनकारक करत नाहीत, तोवर आपल्या ब्राऊजरमधून नियमितपणे कुकीज्ना हटवत राहणे एवढेच आपल्या हाती आहे.

असो. आपल्या डिजिटल पाऊलखुणा मर्यादित ठेवण्यासाठी उपयोगी असणाऱ्या इतर उपायांचा परामर्श पुढील लेखात घेऊ या.

लेखक माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ओपन सोर्स, विदासुरक्षा व गोपनीयता तसेच डिजिटल परिवर्तन या विषयांचे अभ्यासक आहेत.