शिवडीचा किल्ला हा मुळात मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर उभा असलेला एकमेव किल्ला आहे. त्याच्या एका बाजूस शीवचा किल्ला आहे, तर दक्षिणेस मुंबई बंदर. मुंबईला ब्रिटिश कालखंडात महत्त्व प्राप्त झाले, तेच मुळी या बंदरामुळे. पूर्व किनारपट्टीवर असलेल्या या बंदरामुळेच शिवडीच्या किल्ल्याला अनन्यसाधारण असे सामरिक महत्त्व प्राप्त झाले.
प्रत्येक किल्ल्याची अंतर्गत रचना ही त्या त्या किल्ल्याचे वापरकर्त्यांसाठी असलेले महत्त्व आपल्याला लक्षात आणून देते. शिवडीच्या किल्ल्याची अंतर्गत रचना आपल्याला त्या किल्ल्याचा नेमका वापर कोणत्या पद्धतीने झालेला असावा, याचे अनुमान बांधण्यास मदत करते. या किल्ल्याच्या अंतर्गत रचनेच्या बाबतीत फारशा ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनुमानाच्या आधारेच आपल्याला त्याच्या वापराचा अंदाज बांधावा लागतो. मुंबईतील सर्व किल्ल्यांमध्ये असलेल्या वायूविजनाच्या रचनांपैकी सर्वात वेगळी रचना आपल्याला या किल्ल्यावर पाहायला मिळते आणि तीच या किल्ल्याचे वैशिष्ट्यही ठरते. जाणून घेऊया या किल्ल्याची अंतर्गत रचना!