भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनावर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘गिरीश बापटांची काम करण्याची पद्धत अत्यंत सुंदर होती. कुस्ती आणि तालमींच्या तसेच सार्वजनिक सुविधांसाठी विशेष पैसे दिले पाहिजे अशी त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. त्यांच्याकडे काम करण्याची हातोटी असून ते अतिशय जागृत असे लोकप्रतिनिधी होते’ अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.