राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पाच दिवसापूर्वी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकारला पाठिंबा दर्शवला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या घटनेनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना आपण कोणत्या नेत्यासोबत जायचे हा प्रश्न पडला आहे. त्याचदरम्यान अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी माजी उपमहापौर दीपक मानकर यांना नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर दिपक मानकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.