गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे सावित्री आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका आणि अंबा या दोन्ही नद्याही इशारापातळी वर वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटात दरड कोसळली असल्याने पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.