कोल्हापूरातील ताराबाई पार्क या मध्यवर्ती भागातील नागरी वस्तीत मंगळवारी आलेल्या बिबट्याने एकच धुमाकूळ घातला होता. याठिकाणी हॉटेलमध्ये काम करणारे तुकाराम खोंदळ हे झाडांना पाणी घालत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली आणि ते जखमी झाले. दरम्यान, बिबट्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अखेर वन विभागाने आपत्ती निवारण, महापालिका, पोलीस, महावितरण या यंत्रणेलाबरोबर घेत तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडलं. बिबट्याला जेरबंद करतानाच्या या संपूर्ण थराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



















