मागील काही दिवसांपासून राज्यात बहुतांश भागात पश्चिमी विक्षोभाच्या (वादळाच्या) स्थितीमुळे पावसाची नोंद होत होती. यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पुढील चार दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाटसदृश्य स्थिती राहील, अंतर्गत भागात कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नागरीकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सोमवारी उष्णतेची लाटसदृश्य स्थिती नोंदली गेली. तसंच विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानातही वाढ झाली. कोकण, किनारपट्टी प्रदेशात उष्ण आणि दमट वातावरण कायम असून तेथेही सरासरी तापमानाहून अधिक तापमानाची नोंद होत आहे.













