पुणे हे देशातील प्रमुख आयटी आणि शिक्षणाचे केंद्र असल्याने येथे दरवर्षी हजारो तरुण नोकरीच्या शोधात येतात. मात्र, याच सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणाईला जाळ्यात ओढणाऱ्या बनावट आयटी कंपन्यांचं मोठं रॅकेट पुण्यात सक्रिय झालं आहे. नुकतंच हिंजवडी फेज-२ मधील एका आयटी कंपनीने ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे पगार थकवून आणि लॅपटॉपच्या नावाखाली घेतलेली अनामत रक्कम न देता ऑफिसला रातोरात टाळं ठोकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापूर्वीही खोट्या नोकऱ्यांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.








