बहुरंगी लढतीमुळे चुरशीच्या ठरलेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा मतदारसंघात मतदार लोकसभा निवडणुकीप्रमाणे उत्स्फुर्तपणे बाहेर पडल्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी ६० टक्क्यांवर पोहोचली. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक ६८ टक्के तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यात ही आकडेवारी ६० ते ६५ टक्क्यांच्या दरम्यान राहिली. हाणामारीचे काही प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. उत्तर महाराष्ट्रातील एकूण ३९५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि नाशिक पूर्व या मतदारसंघात प्रथमच ‘व्हीव्ही पॅट’ यंत्रणेचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात आला. या यंत्रामुळे मतदान यंत्रात योग्य पध्दतीने मत नोंदविले गेले की नाही, याची माहिती मतदारांना लगेचच समजण्याची व्यवस्था झाली. दिंडोरी मतदारसंघात अंतिम टक्केवारी विक्रमी ७५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सर्वात कमी मतदान नाशिकमधील तीन मतदारसंघात झाले. मालेगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करत स्थिती नियंत्रणात आणली. हा अपवाद वगळता मालेगावमध्ये शांततेत मतदान पार पडले.
जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघात तर धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघातही मतदानाची अंतिम टक्केवारी ६० टक्क्यांपुढेच जाण्याची शक्यता आहे. धुळे शहर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाच्या आदल्या रात्री ८० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच मध्यरात्री पेट्रोलपंप चालकाकडून सहा लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी मंत्रीे डॉ. विजयकुमार गावित, तुरुंगातून निवडणूक लढविणारे माजी मंत्री सुरेश जैन व गुलाबराव देवकर या दिग्गजांच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष आहे. नाशिक जिल्ह्यात १७३, जळगावमध्ये १२९, धुळे ५३ तर नंदुरबारमध्ये ४० उमेदवार आहेत.
*नाशिकात ६५ टक्के मतदान
*शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण मतदारांचा उत्साह
*अनेक ठिकाणी मतदान यंत्रे, व्हिव्हिपॅट यंत्रे यांतील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा
*नंदुरबारमध्ये ६८ टक्के मतदान