‘हुडहुड’च्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी आलेला पाऊस, विजांचा कडकडाट, नक्षलवाद्यांनी हिंसक कारवाई करून लावलेले गालबोट, पैसे वाटपाच्या तक्रारी व मारामारीच्या तुरळक घटनांच्या पाश्र्वभूमीवर आज विदर्भात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या वेळी मतदारांमध्ये असलेला उत्साह यावेळी मात्र दिसून आला नाही. सकाळी संथगतीने सुरू झालेल्या मतदानाने सायंकाळी मात्र अपेक्षेप्रमाणे चांगला वेग घेतला.
आंध्र व ओरिसातील चक्रीवादळाचा परिणाम विदर्भावर ऐन मतदानाच्या दिवशी होईल, असा वेधशाळेने वर्तवलेला अंदाज आज खरा ठरला. नागपूर शहर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने मतदार पाऊस थांबल्यावर बाहेर पडले. विदर्भातील ६२ मतदारसंघातील १०३८ उमेदवारांचे भाग्य आज मतदान यंत्रात बंद झाले. यावेळी काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे हे पाच प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात असल्याने निवडणुकीतील चुरस वाढलेली होती. तरी प्रत्यक्ष मतदारांमध्ये मात्र फारसा उत्साह दिसला नाही. विविध राजकीय पक्षांना मतदारांना बाहेर काढण्यासाठी सायंकाळपर्यंत बरीच कसरत करावी लागली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत विदर्भात ५२ टक्के मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या सुत्रानुसार विदर्भातील मतदानाची सरासरी टक्केवारी ६५ पर्यंत जाईल, असे सांगण्यात आले.
गोंदिया, वर्धा या जिल्ह्यात मतदानाला भरघोस प्रतिसाद मिळाला. नागपूर ग्रामीणमध्ये पारशिवनी तालुक्यात आवंढा गावातील मतदान केंद्रावर आज सकाळी वीज कोसळून बंदोबस्तावरील एका पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. या घटनेत चार मतदारही जखमी झाले. वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन भाऊ ठार झाले. नागपुरात काही ठिकाणी भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली. बल्लारपुरात भाजपच्या पदाधिकाऱ्याला मतदारांना पैसे वाटताना अटक करण्यात आली. या घटनांनंतर पोलिसांचा बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शीजवळ मतदान केंद्रावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याने पोलिस दलाचा एक जवान जखमी झाला, तर एटापल्ली तालुक्यात ताडपल्ली गावातही नक्षल्यांनी गोळीबार केला.