विधानसभेच्या २८८ जागांसाठी एकूण ७६६६ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नांदेडमध्ये दोन जागांसाठी सर्वाधिक १७१ तर माहीम आणि कुडाळमध्ये सर्वात कमी ९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे बंडखोरांना शांत करणे आता सर्वच राजकीय पक्षांसमोरील आव्हान असेल.
राज्य विधानसभेच्या २८८ जागांसाठी येत्या १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. आधी आघाडी आणि महायुती घोळ आणि नंतर सर्वच पक्षांमध्ये झालेली बंडखोरी यामुळे तब्बल साडेसात हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे रविवारी स्पष्ट झाले. शुक्रवापर्यंत केवळ ३०४४ अर्ज दाखल झाले होते. मात्र शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे या पाच प्रमुख पक्षांसह आरपीआय, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह अपक्ष आणि बंडखोर अशा तब्बल ४६२२ उमेदवारांनी शनिवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये नांदेड दक्षिणमधून सर्वाधिक ९१ तर त्या खालोखाल नांदेड उत्तरमधून ८० उमेदवार रिंगणात उतरले आहे. मुंबईतील ३६ जागांसाठी तब्बल ६६१ उमेदवार रिंगणात असून सोमवारी अर्जाची छाननी होणार आहे.