लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतून वगळलेल्या मुंबई जिल्ह्य़ातील तब्बल सहा लाख मतदारांनी नावनोंदणी करून घेण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाने सुरू केले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ ९०९० मतदारांची नावनोंदणी झाली तर तब्बल ४.६ मतदारांकडून कोणताच प्रतिसाद मिळू शकलेला नाही.
लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी कुलाबा ते धारावी विभागात घरोघरी फिरून मतदारांचे सर्वेक्षण केले होते. मतदारयादीतून तब्बल ६,०५,६२६ मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे त्यात आढळून आले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेल्या मतदारांना आपले नाव यादीत नसल्याचे पाहून धक्काच बसला होता. या प्रकारानंतर निवडणूक आयोगाने मतदारयादीतून एकही नाव वगळायचे नाही असा निर्णय घेतला होता, अशी माहिती मुंबई जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकारी शैला ए. यांनी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नावे वगळलेल्या सहा लाखांहून अधिक मतदारांना निवडणूक आयोगाने रजिस्टर्ड एडीद्वारे पत्र पाठवून पुन्हा मतदार नोंदणी करण्याची विनंती केली होती. या पत्रासोबत मतदारांना नावनोंदणीचा अर्जही पाठविण्यात आला होता. त्यापैकी ४.६ लाख मतदारांनी पत्रे न स्वीकारल्याने ती परत आली आहेत. ६३ हजार जणांना पत्र मिळाल्याची पोच निवडणूक आयोगाला प्राप्त झाली आहे. तर ८० हजार मतदारांना पाठविलेल्या पत्रांची पोच अद्याप मिळालेली नसून ती प्रक्रियेत असतील, असे सांगून शैला ए. म्हणाल्या की, नावे वगळलेल्यांपैकी केवळ ९०९० जणांनी मतदार नोंदणीसाठी आपला अर्ज निवडणूक आयोगाकडे पाठवून दिला होता. त्यांची नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.