शहर विद्रुप करणाऱ्या अनधिकृत होर्डिग्ज आणि बॅनरवर कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे कडक पालन करण्यास मुंबई पोलिसांनी सुरुवात केली आहे. यासाठी प्रत्येक परिमंडळातील पोलीस उपायुक्तांची ‘नोडल ऑफिसर’ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अशा अनधिकृत होर्डिग्जवर दखलपात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे.
अनधिकृत पोस्टर, बॅनर आणि होर्डिग्जमुळे शहराच्या विद्रुपीकरणाबाबत २०१० साली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. २६ ऑगस्टला न्यायालयाने यासंदर्भात निर्णय देताना कारवाई करताना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे.दरम्यान, निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आतापर्यंत पोलिसांनी ४,८१३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून १,८०८ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली आहेत. निवडणुका जाहीर झाल्यापासून २८८ परवानाधारक शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत.