News Flash

आता भाजपचे ‘मिशन १४५’!

शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर चार घटकपक्षांच्या साथीने स्वबळावर सत्ता काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपने आता ‘मिशन १४५’ यशस्वी करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

| September 27, 2014 03:48 am

शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर चार घटकपक्षांच्या साथीने स्वबळावर सत्ता काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपने आता ‘मिशन १४५’ यशस्वी करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. केंद्रात भाजपने ‘मिशन २७२’ जाहीर केले आणि स्वबळावरच सत्ता काबीज केली. केंद्रात रालोआतील घटकपक्षांच्या पाठिंब्याचीही भाजपला गरज राहिली नाही. राज्यातही सत्ता संपादनाची तीच वाट चोखाळण्याचे भाजपने ठरविले आहे. भाजपच्या निर्णयांची मुख्य मदार व्यावसायिक संस्थांमार्फत केलेल्या चार-पाच सर्वेक्षणांवर आहे. त्याआधारे पक्षाने उमेदवारही निश्चित केले. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये सर्वेक्षणांचे यशापयश अनुभवले असतानाही लोकसभेतील सर्वेक्षणे अचूक ठरल्याने भाजपने त्याआधारे निर्णयप्रक्रिया आखली आहे. शिवसेनेबरोबर युती करून लढल्यास भाजपला ८०-९० जागा मिळतील आणि स्वबळावर लढल्यास ११० ते १२५ जागा मिळतील, असा सर्वेक्षणांचा अहवाल आला आणि ‘मिशन १४५’ आखून शिवसेनेच्या आग्रहापुढे नमते न घेता युती तोडण्याचे पाऊल भाजपने उचलले.
युती तोडल्याचा फटका मुंबई-ठाणे व अन्य भागांतील शिवसेनेच्या प्रभाव क्षेत्रात भाजपला निश्चितच बसणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये काही नेते युती तोडल्यामुळे नाराजही आहेत. ज्यांना शिवसेनेच्या प्रभावक्षेत्रात उमेदवारी मिळाली आहे, ते नेते तर युती तोडण्याच्या निर्णयामुळे धास्तावलेही आहेत. भाजपची २०० हून अधिक उमेदवारांची यादी तयार असल्याचे सांगितले गेले होते, मात्र प्रत्यक्षात शुक्रवारी उशिरापर्यंतही तयार होऊ शकली नव्हती. अनेक मतदारसंघांत उमेदवारांची शोधाशोध करावी लागत होती आणि पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांचे निर्णय करून काहींना उमेदवारीही दिली जात असल्याने या यादीला उशीर झाला. पण तरीही स्वबळावर लढताना भाजपला काही ठिकाणी प्रबळ उमेदवार मिळालेले नाहीत. हे प्रमाण मुंबई-ठाण्यात अधिक आहे.
शिवसेनेशी युती तोडताना आपल्या जुन्या मित्रावर टीका करायची नाही, असा दंडक प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी घालून घेतला आहे. निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक करून दोन्ही पक्षांमध्ये कटुता निर्माण करण्यापेक्षा ते टाळण्याचे जाहीर करून भाजपने निवडणुकीनंतरच्या राजकारणास पोषक ठरेल अशी धूर्त खेळी केली आहे. भाजपची मुख्य लढाई शिवसेनेशी नसून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हटविणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे. पण युती-आघाडीच्या फाटाफुटीनंतर सहा-सात रंगी निवडणुकीच्या लढाईत कोण विजयी होईल, हे स्पष्ट नसल्याने निवडणुकीनंतर बहुमताच्या आकडय़ांचे गणित जमविताना शिवसेनेची मदत लागल्यास तो पर्याय खुला ठेवण्याच्या दृष्टीने मने कलुषित होतील, अशी टीका टाळण्याचे भाजपचे धोरण आहे. केंद्रात मिळविलेल्या घवघवीत यशामुळे भाजपचे बाहू स्फुरण पावत असून बहुतांश मंत्री, केंद्रीय पातळीवरील नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री अशी सारी नेतेमंडळी महाराष्ट्रात दाखल होत आहेत. त्यांच्या दौऱ्यांचे व सभांचे नियोजन सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा यांच्यासह किमान ७०-८० नेते प्रचाराचा धडाका लावणार आहेत. भाजपने जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यात नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे केवळ तीन आठवडय़ांच्या कालावधीत धमाका घडविण्यासाठी भाजपची निवडणूक यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:48 am

Web Title: after break up bjp calls for mission 145
Next Stories
1 ‘हाता’ विना ‘घडय़ाळा’ची टिकटिक
2 ढेपाळलेली काँग्रेस!
3 संकुचित लाभाचेच स्वप्न!
Just Now!
X