काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसना-भाजप यांच्यातील फुटीचा तिसऱ्या आघाडीच्या नावाने संघटित होणाऱ्या लहान पक्षांना त्यांच्या-त्यांच्या प्रभावक्षेत्रात लाभ होईल, अशी चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या विरोधात लढण्यासाठी तिसऱ्या पर्यायाच्या नावाखाली अनेक आघाडय़ा तयार झाल्या आहेत.
त्यातील डावी लोकशाही समिती, महाराष्ट्र लोकशाही आघाडी व संविधान मोर्चा यांच्यात जागावाटपात समझोता झाला आहे. बहुजन समाज पक्ष नेहमीप्रमाणे स्वतंत्र निवडणुका लढवीत आहे.  
शेतकरी कामगार पक्ष
रायगड जिल्ह्य़ात शेकापचा प्रभाव आहे. त्याशिवाय सांगोला, तुळजापूरमध्येही पक्ष मजबूत आहे. रायगडमध्ये शेकापला एकाच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेशी सामना करावा लागतो. तरीही मागील निवडणुकीत रायगडमधून तीन व सांगोल्यातून एक असे चार आमदार निवडून आले होते. या वेळी मोठय़ा पक्षांमधील मतविभाजनाचा शेकापला फायदा होईल.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
डावी लोकशाही समितीतील हा घटक पक्ष असला तरी निवडणुकीच्या राजकारणातील प्रभाव हा पक्ष हरवून बसला आहे. एकत्रित आघाडी म्हणून काही जागांवर चांगली मते मिळतील, परंतु एखाद-दुसऱ्या जागेवर तरी विजयाचा पल्ला गाठतील का, याबद्दल साशंकता आहे.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने किमान, नाशिक व ठाणे जिल्ह्य़ात तरी आपले राजकीय प्राबल्य टिकवून ठेवले आहे. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्य़ातील एखाद-दुसऱ्या मतदारसंघात लढत देण्याइतपत पक्षाची ताकद आहे. इतर लहान पक्षांचा पाठिंबा असला तरी माकप आपल्या ताकदीवरच दोन-तीन मतदारसंघांत प्रभाव दाखवू शकतो.
जनता दल (धर्मनिरपेक्ष)
महाराष्ट्रात जनता दलाची पार रया गेली आहे. एक भूमिका घेऊन जाणारा पक्ष, अशी जदची प्रतिमा असली तर ती प्रतिमा संभाळायला, कार्यकर्तेही पुरेसे नाहीत. निवडणुकीत प्रभाव पडणार नाही.
भारिप-बहुजन महासंघ
भारिप-बहजन महासंघाचा अकोला जिल्ह्य़ात प्रभाव आहे. मागील निवडणुकीत स्वबळावर दोन आमदार निवडून आले होते. दोन-तीन मतदारसंघांत निर्णायक लढत दिली होती. बुलढाणा जिल्ह्य़ातील एक-दोन मतदारसंघांत पक्षाचे प्राबल्य आहे. दोन मोठय़ा आघाडीतील मतविभाजनाचा भारिपलाही फायदा होऊ शकतो.
रिपब्लिकन सेना
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना पहिल्यांदाच निवडणुकीत उतरली आहे. सोबत संविधा मोर्चा नावाने ओबीसी संघटना व अन्य लहान पक्ष आहेत. मात्र फार मोठा प्रभाव पडेल, अशी परिस्थिती नाही.
समाजवादी पक्ष
समाजवादी पक्षाचा मुस्लीमबहुल मतदारसंघात प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र हा प्रभाव कमी झाल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीतही फार मोठे यश मिळेल, असे नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटना
भाजपबरोबर जाण्याच्या निर्णयाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्य़ातील राधानगरी, कागल, करवीर मतदारसंघात पक्षाचा प्रभाव आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष
मागील निवडणुकीत रासपने मराठवाडय़ात एक जागाजिंकली होती. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील तीन-चार मतदारसंघांत पक्षाची चांगली बांधणी आहे. भाजपचा प्रभाव असेल तिथे रासपला फायदा होऊ शकतो. एकटय़ा रासपचे प्राबल्य विजयासाठी पुरेसे ठरणार नाही.
रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)
शिवसेनेबरोबर जायचे की भाजपबरोबर याचा अजून रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) निर्णय घेतला नाही. आठवले गटाचे राज्यभर कार्यकर्ते आहेत, परंतु निवडून येण्यासाठी त्यांचे प्रभावक्षेत्र निश्चित नाही. ज्या पक्षाबरोबर रिपाइं जाईल, त्यांच्या मतांमध्ये भर पडेल, परंतु रिपाइंला मित्रपक्षाचा किती फायदा होईल, हे सांगता येणार नाही.