आघाडीत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे शेवटच्या क्षणी काँग्रेसचे नेतृत्व नमते घेते, असा पर्वानुभव लक्षात घेता यंदा राष्ट्रवादीला जास्त जागा तसेच अन्य अटी मान्य करायच्या नाहीत ही आक्रमक भूमिका काँग्रेसने घेतली तरी त्यावर पक्ष कितपत ठाम राहतो यावरच सारे काही अवलंबून आहे.
राज्यातील आघाडीचे जागावाटप आणि उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक नवी दिल्लीत पार पडली. राष्ट्रवादीने १४४ जागांची मागणी केली असली तरी १२४ पेक्षा जास्त जागा सोडता येणार नाहीत, असे अहमद पटेल यांनी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना आधीच कळविले आहे. आजच्या बैठकीत राष्ट्रवादीबरोबरील आघाडी आणि जागावाटप यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या कलाने घेऊ नये, असाच एकूण पक्षात मतप्रवाह होता. ताकद वाढली म्हणून वाढीव जागांवर राष्ट्रवादीने दावा केला असला तरी आठवरून खासदारांचे संख्याबळ चापर्यंत घटले म्हणजे ताकद वाढली कुठे, असाच पक्षाच्या नेत्यांचा सूर होता. राष्ट्रवादीत सहभागी होणाऱ्या अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या आमदारांसाठी मतदारसंघ सोडावेत ही राष्ट्रवादीची अट मान्य करण्यास काँग्रेसने नकार दिला आहे.  तसेच निकालानंतर राज्यातील समीकरणे काही बदलू शकतात, असाही शंकेचा सूर होता. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत आघाडीबाबत आम्ही आग्रही आहोत व तुटल्यास काँग्रेसला जबाबदार धरण्याची खेळी केल्याकडे काँग्रेसचे नेते लक्ष वेधीत आहेत.
गेल्या दहा वर्षांत आघाडीच्या संदर्भातील बहुकेत सारे निर्णय हे शरद पवार यांच्या कलाने घेतले गेले. परिणामी आघाडीत पवार यांचाच वरचष्मा राहतो, असा अर्थ काढला जातो. काँग्रेसने १२४ जागांपेक्षा जास्त जागा सोडणार नाही, असा पवित्रा घेतला असला तरी चर्चेद्वारेआणखी ४-५ जागा सोडल्या जाऊ शकतात. काँग्रेसने फारच ताणून धरल्यास आघाडीचे भवितव्य कठीण असल्याचे बोलले जाते. पण सध्याच्या परिस्थितीत उभयतांना आघाडीची आवश्यकता आहे. २००४ मध्ये आघाडीसाठी सोनिया गांधी या पवार यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. यंदा मात्र पवार हे सोनियांच्या निवासस्थानी गेले. यावरूनच राष्ट्रवादीला आघाडीची गरज असल्याचा अर्थ काँग्रेस नेते काढीत आहेत.
आकडय़ांचा खेळ
काँग्रेसने १२४ पेक्षा जास्त  जागा देता येणार नाहीत, असा पवित्रा घेतला असला तरी आणखी चार ते पाच जागा सोडण्याची तयारी आहे. पण राष्ट्रवादीने १३२ ते १३४ जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. १२४ ते १३४ या दरम्यान राष्ट्रवादीने मध्यमार्ग काढावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेसचे दिल्लीतील नेते कितपत नेमते घेतात यावरही आघाडीचे भवितव्य ठरेल.
राज्यातील १४० उमेदवारांची काँग्रेसची यादी तयार
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेससोबतची जागावाटपाची चर्चा सुरू असली तरी काँग्रेसने आपण दावा केलेल्या जागांवरील उमेदवारांची यादी तयार केली आहे. शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या निवडणूक समितीच्या बैठकीत ६० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, तर आधी ८० नावे निश्चित झाली आहेत. पितृपक्ष संपताच काँग्रेसकडून १४० उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. आघाडीबाबतची अनिश्चितता कायम असताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शनिवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मधुसूदन मिस्त्री, ऑस्कर फर्नान्डिस, मल्लिकार्जून खरगे, माहेन प्रकाश, सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, अंबिका सोनी, वीरप्पा मोईली, मोहसिना किदवई, पक्ष प्रवक्ते जनार्दन द्विवेदी उपस्थित होते.