रायगड जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघांसाठीची मतमोजणी शांततेत पार पडली. जिल्ह्य़ात शेकाप, सेना आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले, तर पनवेलची जागा जिंकत भाजपने प्रथमच खाते उघडले.
 अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शेकापचे सुभाष ऊर्फ पंडित पाटील विजयी झाले. त्यांना शिवसेनेच्या दळवी यांच्यापेक्षा तब्बल १६ हजार ९४ मते अधिक पडली. काँग्रेस उमेदवार मधुकर ठाकूर तिसऱ्या नंबरला फेकले गेले.
  पेण विधानसभा मतदारसंघावरही शेकापने आपले वर्चस्व कायम राखले आहे. धैर्यशील पाटील यांनी काँग्रेसच्या रवींद्र पाटलांचा पराभव केला आहे. त्यांना ६४ हजार ३६५ मते पडली, तर काँग्रेसच्या रवींद्र पाटील यांना ६० हजार ३४० मते मिळाली. शिवसेनेच्या किशोर जैन यांना ४४ हजार २५१ मते मिळाली. महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले तब्बल २१ हजार २११ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या माणिक जगताप यांचा पराभव केला.
कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड १ हजार ९०० मतांनी विजयी झाले. सुरेश लाड यांना ५७ हजार १३ मते पडली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे महेंद्र थोरवे यांना ५५ हजार ११३ मते मिळाली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश करणाऱ्या प्रशांत ठाकूर यांनी मतदारसंघावर आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले आहे. मतमोजणीत सुरुवातीच्या पिछाडीनंतर जोरदार मुसंडी मारत त्यांनी शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांचा १३ हजार २१५ मतांनी पराभव केला. प्रशांत ठाकूर यांना १ लाख २५ हजार १४२ मते पडली, तर शेकापच्या बाळाराम पाटील यांना १ लाख ११ हजार ९२७ मते मिळाली. शिवसेनेच्या वासुदेव घरत यांना १७ हजार ९५३ मते मिळाली. उरण विधानसभा मतदारसंघात शेकापच्या विवेक पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला. या मतदारसंघातून शिवसेनेचे मनोहर भोईर अवघ्या ८४६ मतांनी विजयी झाले. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या लढतीत, शिवसेना उमेदवार रवी मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. अखेरच्या फेरीपर्यंत चाललेल्या या लढतीत राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे हे केवळ ७७ मतांनी विजयी झाले. शिवसेनेने पोस्टल बॅलेटची पुन्हा मोजणी करण्याची मागणी केल्याने निकाल राखून ठेवण्यात आला. राष्ट्रवादीच्या अवधूत तटकरे यांना ६१ हजार ३८, तर शिवसेनेच्या रवी मुंडे यांना ६० हजार ९६१ मते मिळाली. भाजपच्या कृष्णा कोबनाक यांना ११ हजार २९५ मते मिळाली. कृष्णा कोबनाक यांच्या बंडखोरीचा फटका सेनेला या मतदारसंघात बसला.