News Flash

प्रचार संपला.. आता बंदोबस्त आणि प्रतीक्षा

बुधवारच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तब्बल ४११९ उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत २३३१ मतदान केंद्रे ‘संवेदनशील’ तर ६२६ केंद्रे ‘अतिसंवेदनशील’ म्हणून

| October 14, 2014 03:53 am

बुधवारच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तब्बल ४११९ उमेदवार रिंगणात उतरल्याने चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत २३३१ मतदान केंद्रे ‘संवेदनशील’ तर ६२६ केंद्रे ‘अतिसंवेदनशील’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवारांमधील संघर्ष आणि निवडणुकीत नक्षलवाद्यांकडून येणाऱ्या अडथळयांचा धोका लक्षात घेऊन राज्य पोलिसांच्या मदतीला केंद्राच्या ३२० तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
२८८ जगांसाठी ३८४३ पुरूष तर २७६ महिला असे ४,११९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा ८ कोटी ३५ लाख ३८ हजार ११४ मतदार फैसला करणार आहेत. यावेळी सर्वात मोठा मतदार संघ चिंचवड ठरला असून तेथे ४ लाख ८४ हजार  मतदार आहेत. तर सर्वात छोटा मतदार संघ मुंबईतील वडाळा हा येथे १ लाख ९६ हजार मतदार आहेत. या निवडणुकीत तब्बल ८३ मतदार संघात १५ पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून सर्वाधिक ३९ उमेदवार नांदेड दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. तर अकोला आणि गुहागर येथे सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी ५ उमेदवार आहेत.  
प्रचारादरम्यान तापलेले राजकीय वातावरण आणि प्रत्यक्ष मतदानादिवशी होणारे वाद, संघर्ष लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने राज्यात २३३१ संवेदनशील तर ६२६ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. नक्षलवादी हल्यांचा धोका असलेल्या गडचिरोली जिल्हयात सर्वाधिक ४५५ मतदान केंद्रे संवेदनशील व अतिसंवेदनशील असून मुंबईतही ३४१ मतदान केंद्रे सेवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. परभणी जिल्हयात ४३ तर सोलापूर ग्रामीण विभाग आणि नांदेड जिल्ह्य़ात प्रत्येकी २० मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
सिंधुदुर्गात एकही केंद्र संवेदनशील नाही
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक ९७ मतदान केंद्रे संवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात यावेळी एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य पोलिसांच्या मदतीला केंद्रीय सुरक्षा जवानांच्या ३२० तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. तर या प्रक्रियेसाठी ५ लाख ८४ हजार  कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
२० कोटी रुपयांची रोकड जप्त
 प्रचारादरम्यान विविध उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभने दाखविणे, पैसे वाटल्याप्रकरणी राज्यभरात १४७ गुन्हे दाखल करण्यात आले असून २०कोटी ३४ लाखाची रोकड, २ कोटींच्या विविध भेटवस्तू आणि २ लाख ७२ हजार लिटर दारू जप्त करण्यात आल्याची माहिती आयोगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत ४० हजार पोलीस तैनात
मुंबई : मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले असून ४० हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) धनंजय कमलाकर यांनी सोमवारी या विशेष मोहिमेची माहिती दिली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शहरात ३५ हजार कर्मचारी आणि साडेचार हजार अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय राखीव दलाच्या १७ कंपन्या, राज्य राखीव पोलीस दलाच्या १२ कंपन्या आणि १३ हजार होमगार्डस तैनात करण्यात आलेले आहेत. गुजरात, राजस्थान आणि बिहार आदी राज्यांतूनही अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे.
 आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात तब्बल १६,३३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून ९३ जणांना तडीपार करण्यात आले तर ३,४१५ अजामीनपात्र आणि ३,२१४ जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली आहेत. तसेच ७,५०८ जणांना समन्स बजावण्यात आले आहे. विविध प्रकारचे ६० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. फरारी असलेल्या ७७ आरोपींना या काळात अटक करण्यात आली असून विविध गुन्ह्यांतील ११७ ‘वाँटेड’ आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाकांबदी करून पोलिसांनी तब्बल १ लाख ७७ हजार वाहने तपासली आणि त्यापैकी १०,८५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहरात १,६७९ ‘कोंम्बिग ऑपरेशन्स’ करण्यात आले असून ७ हजार हॉटेल्स आणि ५ हजार लॉजेसची तपासणी करण्यात आली. विविध ठिकाणी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या मदतीने तब्बल १ कोटी ८७ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. तसेच ५७ बेकायदा शस्त्रे जप्त करण्यात आली. बेकायदा मद्यविक्रीचे १६३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
१७ हजार पोलीस करणार मतदान
बंदोबस्ताला असल्याने पोलिसांना मतदानास मुकावे लागत होते. यासाठी त्यांना टपालाद्वारे मतदानाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाने पुढाकार घेतला होता. त्यानुसार १७ हजार पोलिसांनी अर्ज भरले असून त्यांना टपालाद्वारे मतदान करता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 3:53 am

Web Title: amid tight security ahead of maharashtra polls
Next Stories
1 प्रचार उमेदवारांचा, विचार स्वत:च्या मतदारसंघाचा
2 मतदान केंद्रांवरही होणार सुहास्य स्वागत!
3 सुराज्य हाही जन्मसिद्ध हक्कच – मोदी
Just Now!
X