दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले आणि जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या लाटा उसळू लागल्या. ढोल-ताशांचा गजर सुरू झाला. ‘भारत माता की जय’ घोषणा विमानतळ परिसरात दुमदुमू लागल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, एकनाथ खडसे व पक्षाच्या केंद्रीय तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांनी शहा यांचे स्वागत केल्यानंतर आपल्या छोटेखानी भाषणात शहा यांनी पुन्हा ‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चा नारा दिला, आणि ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला..
पक्षाचे झेंडे लावलेल्या मोटारसायकलींचा ताफा, त्यामागे मोटारींचा ताफा आणि ‘झेड’ सुरक्षेच्या गराडय़ात असलेली अमित शहा यांची मोटार अध्र्या तासातच विमानतळावरून विनोद तावडे यांच्या निवासस्थानी विलेपार्ले येथे पोहोचली. तावडे यांचे निवासस्थान हे भाजपच्या आजच्या राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान बनले. पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. विधानसभा निवडणुकीच्या आखणीवर चर्चा झाली. शहा यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते रात्री दिल्लीत परतणार होते. पण कालच कार्यक्रमात बदल करण्यात आला, तेव्हाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार हे निश्चित झाले होते. रंगशारदा येथेच ही भेट होईल, असे संकेतही मिळत होते, पण काल रात्री उद्धव ठाकरे यांनी शहा यांना ‘मातोश्री’ भेटीचे निमंत्रण दिले आणि या निमंत्रणाचा स्वीकार करावा असे तावडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरले. त्याच अनुषंगाने बैठकीत युतीबाबत चर्चा झाली.
महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, या इष्र्येने निवडणूक लढविण्याचे आदेश शहा यांनी याआधीच दिले आहेत. मात्र, युती तोडून स्वबळावर लढावे किंवा नाही, यावर प्रदेश भाजपच्या नेत्यांची मते अजमावण्यावर आज शहा यांचा भर होता. मुंबई आणि मराठवाडय़ात युती फायदेशीर होईल, असा सूर उमटला, आणि स्वबळाचा विचार मागे पडला. उद्धव ठाकरे यांचे निमंत्रण शहा यांनी स्वीकारले असून रात्री मातोश्रीवर ते सदिच्छा भेट देणार आहेत, असे विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले. आजवर पक्षाचे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जात असत. त्यामुळे अगोदर शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली अर्पण करून मगच मातोश्रीवर सदिच्छा भेट द्यावी असा निर्णय झाला, आणि उद्धव ठाकरे यांना तसे कळविण्यात आले.
तावडे यांच्या निवासस्थानी बैठक आटोपून बाहेर पडताच अमित शहा यांना पत्रकार आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा गराडा पडला. पण नम्रपणे नमस्कार करून काहीच न बोलता, केवळ बोटांनी विजयाची खूण करीत शहा यांनी कॅमेऱ्यासमोर ‘पोझ’ दिली, आणि मोटारींचा ताफा वरळीच्या दिशेने निघाला. खासदार पूनम महाजन यांच्या निवासस्थानी आयोजित भोजनाअगोदर जवळच असलेल्या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन शहा यांनी मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले, त्यांच्यासमवेत काही वेळ व्यतीत केला, आणि पूनम महाजन यांच्याकडील भोजनाचा कार्यक्रम आटोपताच लालबागचा राजाचे दर्शन घेऊन ते षण्मुखानंदमधील कार्यकर्ता मेळाव्याकडे रवाना झाले.
आपल्या दिवसभराच्या कार्यक्रमात प्रसार माध्यमांपासून दूरच राहिलेले अमित शहा कार्यकर्त्यांमध्ये मात्र चांगलेच रमलेले दिसत होते. विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांशी चर्चा करतानाही ते प्रसन्न होते. विलेपार्ले ते वरळी आणि नंतरच्या प्रवासातही, रस्तोरस्तीच्या स्वागत फलकांवरील ‘अब महाराष्ट्र, सब महाराष्ट्र’ या घोषणेमुळे तर ते खूपच प्रभावित दिसत होते.