News Flash

अमित शहा युतीबाबत स्वपक्षातील नेत्यांची मते आजमावणार

घटकपक्षांना जागा देऊन भाजप-शिवसेनेत निम्म्या जागा असे समान जागावाटप झाले, तर युती ठेवायची अन्यथा नाही, अशी भूमिका राज्यातील काही भाजप नेत्यांनी घेतली आहे.

| September 4, 2014 04:38 am

घटकपक्षांना जागा देऊन भाजप-शिवसेनेत निम्म्या जागा असे समान जागावाटप झाले, तर युती ठेवायची अन्यथा नाही, अशी भूमिका राज्यातील काही भाजप नेत्यांनी घेतली आहे. तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यासाठी आता उशीर झाला असल्याचे काही नेत्यांचे मत आहे. प्रदेश नेत्यांची मते आजमावून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.
शहा यांच्या पहिल्याच मुंबई भेटीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. या भेटीत महायुतीचे जागावाटप, प्रचार आणि अन्य महत्त्वाच्या बाबींवर ते प्रदेश नेत्यांची चर्चा करणार आहेत. ते दुपारी सव्वाबाराच्या सुमारास विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी जाणार असून तेथे प्रदेश सुकाणू समितीच्या नेत्यांशी त्यांची चर्चा होणार आहे.
पूनम महाजन यांचे ‘वजन’ वाढणार
सुकाणू समितीच्या चर्चेनंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव खासदार पूनम महाजन यांच्या वरळी येथील निवासस्थानी शहा भोजनासाठी जाणार आहेत. महाजन यांच्या घरी पुरणपोळी, मोदक, मसालेभात, भरली वांगी, आदी पदार्थाचा खास मराठमोळा बेत आहे आणि ‘दूध पाक’ या गोड पदार्थाचाही समावेश आहे. पहिल्याच मुंबई भेटीत शहा यांनी महाजन यांचे निमंत्रण स्वीकारल्यामुळे राजकीय तर्कवितर्क सुरू झाले असून पूनम महाजन यांच्यावर अधिक जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
मेळावा व गणेशदर्शन
शहा त्यानंतर ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी जाणार असून सायंकाळी ‘षण्मुखानंद’मध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करतील. नंतर, मलबार हिल येथे मंगलप्रभात लोढा यांच्या मंडळाच्या गणेशदर्शनासाठी जाऊन महाआरती करतील. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतल्यावर रात्री सव्वादहाच्या सुमारास वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. ते शुक्रवारी सकाळी नवी दिल्लीला जाणार आहेत.
जागावाटपाबाबत प्रदेश नेत्यांची काय मते आहेत, आता स्वबळावर लढण्याची परिस्थिती आहे का, भाजपला स्वबळावर सत्ता मिळविता येईल का, शिवसेनेने निम्म्या जागा न दिल्यास काय करायचे या प्रमुख मुद्यांवर शहा नेत्यांची मते घेणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 4:38 am

Web Title: amit shah to test party leaders opinions on bjp sena coalition
Next Stories
1 शिवसेनेच्या लेटरबॉम्बमुळे भाजप अस्वस्थ
2 नरेंद्र मोदी हेच मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य !
3 अनुदानित आश्रमशाळा : कायमस्वरूपी अतिरिक्त तुकडय़ांना मान्यता