भविष्यात बिगर गांधी घराण्यातील नेता काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो, असे विधान करीत माजी वित्तमंत्री पी. चिदंम्बरम यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आधी दिग्विजय सिंग, आता चिदंम्बरम, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी शंका घेणाऱ्या पक्षातील नेत्यांची यादी वाढत चालली आहे.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी हे लक्ष्य झाले आहेत. पक्षाचे विविध नेतेच राहुल गांधी यांच्या विरोधात बोलू लागले. राहुल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दिग्विजय सिंग यांनी सर्वात आधी तोफ डागली. पणजीमध्ये बोलताना दिग्विजय सिंग यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी शंका उपस्थित केली होती. राहुल गांधी यांनी सरकारमध्ये जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मांडले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका करण्यात येत असतानाच माजी वित्तमंत्री पी. चिदंम्बरम यांनी बॉम्बच टाकला.
चिदंम्बरम हे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात. नंतर सोनिया गांधींनीही त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या. गांधी घराण्याशी निकटचे मानले गेले तरी  चिदंम्बरम यांनी राहुल यांच्या नेतृत्वाबद्दल शंका घेतली आहे. सोनिया गांधी पक्षाध्यक्षपदी असल्या तरी पक्षाची सूत्रे त्यांनी राहुल यांच्याकडे सोपविली आहेत, असे चिदंम्बरम यांनी त्या मुलाखतीत म्हटले आहे.
पराभवामुळे खचलेल्या काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याच्या उद्देशाने पक्षात नवे नेतृत्व पुढे आणावे, अशी चर्चा आहे. हे नेतृत्व ‘स्टॉप गॅप’ असावे, असाही मतप्रवाह आहे. आणिबाणीच्या काळात काँग्रेसचे अध्यक्षपद देवेंद्र बारुआ यांच्याकडे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोपविले होते. या पाश्र्वभूमीवर पक्षाचे अध्यक्षपद बिगर गांधी घराण्याकडे जाऊ शकते हे विधान बोलके आहे.
पी. चिदंम्बरम यांनी गृहमंत्री असताना मोदी यांच्यामागे चौकश्यांचे शुक्लकाष्ठ लावले होते. यातून भाजपने आता चिदंम्बरम यांना अडचणीत आणण्याची खेळी केली आहे.  चिदंम्बरम यांच्या मागेही चौकशा लावल्या जाण्याची चिन्हे आहेत. या पाश्र्वभूमीवर स्वत:च्या बचावासाठीच चिदम्बरम यांनी काँग्रेस नेतृत्वावर तोफ डागल्याची चर्चा आहे.