‘बेलापूर शिवसेनेचेच’ असा नारा देत भारतीय जनता पक्षाच्या तोळामासा अस्तित्वाचे आणि ताकदीचे जाहीर वाभाडे काढणारे पत्रक नवी मुंबईतील शिवसेना नेत्यांनी प्रसिद्ध केल्याने ठाणे जिल्ह्य़ात शिवसेना-भाजप युतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या या तीन पानी पत्रकात भाजपवर सडकून टीका करण्यात आली असून हा मतदारसंघ भाजपला सोडणे म्हणजे पालकमंत्री गणेश नाईकांना मोकळे रान दिल्यासारखे होईल, अशी भाषा यामध्ये वापरण्यात आली आहे. एकीकडे शिवसेनेच्या या लेटरबॉम्बमुळे भाजपचे स्थानिक नेते खवळले आहेत, तर दुसरीकडे जिल्ह्य़ातील अन्य नेत्यांनी या पत्रकाच्या प्रती ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये वाटण्यास सुरुवात केली आहे. असली भाषा वापरणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत अद्दल घडवा, असा ‘सूचक’ संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. या पत्रकाची प्रत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.
जागावाटपात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाणे जिल्ह्य़ात भारतीय जनता पक्षाची ताकद शिवसेनेच्या तुलनेत अगदीच तोळामासा असली तरी जिल्ह्य़ातील २४ मतदारसंघांपैकी १० मतदारसंघांवर या पक्षाने दावा केला आहे. ठाण्यासारखा शिवसेनेचा बालेकिल्लाही भाजपला हवा आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावरही या दोन पक्षांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर या पत्रकामुळे मित्रपक्षांमधील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. ‘बेलापूर शिवसेनेचे’च हा प्रचार ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
यासंबंधी विठ्ठल मोरे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उशिरापर्यंत दूरध्वनी उचलला नाही. ठाण्यातील भाजपचे नेते मिलिंद पाटणकर यांनी आपण या पत्रकाची तक्रार प्रदेश नेत्यांकडे केली असल्याचे स्पष्ट केले.
पत्रातील आक्षेप
*भाजपचे अस्तित्व आहे कुठे, असा सवाल करीत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मंदा म्हात्रेंवरही टीका
*स्वत:च्या मुलाला निवडून आणण्याची क्षमता नसलेल्या मंदाताई या गणेश नाईकांचा पराभव कसा करणार?
*भाजपचे पाच वर्षांपूर्वीचे उमेदवार सुरेश हावरे यांच्या मदतीला भाजपचे नेते का आले नाहीत?
*हावरे यांच्या पत्नीला खोटय़ा गुन्ह्य़ात अडकवून त्यांची छळवणूक सुरू होती तेव्हा भाजप नेते गणेश नाईकांपुढे गप्प का होते?