दिल्लीत पुन्हा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आम आदमी पक्ष असतानाच पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे संकेत दिलेत. अर्थात याबाबत अंतिम निर्णय पक्षच घेईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपने सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे तर काँग्रेसमध्येही तीच स्थिती आहे. यावेळी आपला लोकांचा स्पष्ट कौल मिळेल असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे. लोकांना आमची ४९ दिवसांची राजवट लक्षात आहे. त्यामुळे ते आम्हाला मतदान करतील असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. जनतेच्या आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा असताना, सत्तेतून पायउतार होणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असे केजरीवाल यांनी मान्य केले.
प्रथमच निवडणूक लढवताना आपने २८ जागा जिंकत सर्वानाच धक्का दिला होता. लोकसभा निवडणुकीत ४०० च्या वर जागा लढवणे ही रणनीतीमध्ये चूक झाली हे केजरीवाल यांनी मान्य केले. भाजप हाच दिल्लीत आपचा विरोधक असेल, काँग्रेसचे फारसे आव्हान नाही असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
‘केजरीवाल यांच्या तोडीचा नेता नाही’
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना आव्हान देईल असा चेहरा भाजपकडे नाही असा दावा आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी केला. अगदी दुसऱ्या फळीचे नेतृत्व त्यांच्याकडे नाही अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. काँग्रेसचा प्रभाव संपल्याने त्याचा फायदा आपला होईल असा दावाही यादव यांनी केला. लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होईल याची खात्री भाजपला नाही. त्यामुळेच निवडणुकांना ते विलंब लावत आहेत असा आरोप त्यांनी केला.
दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षातर्फे मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाणार नाही, तसेच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका नवीन वर्षांत घेण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. या निवडणुकीत भाजपची भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून असतील. मोदी यांच्या आक्रमक निवडणूक प्रचाराची आखणी भाजपने केली आहे. पंतप्रधान मोदी यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी दिल्लीतील निवडणूक जम्मू-काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांनंतर म्हणजेच २० डिसेंबरनंतर घेतल्या जाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.